माझा परिचय

Showing posts with label भूगोल. Show all posts
Showing posts with label भूगोल. Show all posts

Wednesday, 21 December 2022

वेदविज्ञानरंजन - १२ : पृथ्वी गोल आहे - भाग ४

 #वेदविज्ञानरंजन_१२ : पृथ्वी गोल आहे - भाग ४

मागील भागात आपण श्रीमद्भागवत पुराणातील पृथ्वी गोल आहे ह्याविषयीची माहिती पाहिली. आज आपण इतर  ग्रंथातील माहिती पाहू. 

पृथ्वी गोल आहे - भाग ४

वैदिक वाङ्मयातील जैमेनिय ब्राह्मण कांड १. २५४ ग्रंथात पृथ्वी गोलाकृती आहे असे लिहिलेले आहे. 

 स एष प्रजापतिः अग्निष्टोमः परिमण्डलो भूत्वा अनन्तो भूत्वा शये। तदनुकृतीदम् अपि अन्या देवताः परिमण्डलाः। परिमण्डल आदित्यः परिमण्डलः चन्द्रमाः, परिमण्डल आदित्यः, परिमण्डलः चन्द्रमाः, परिमण्डला द्यौः, परिमण्डलमन्तरिक्षम् परिमण्डला इयं पृथिवी |

परिमंडळ ह्याचा अर्थ सर्व बाजूंनी गोलाकार आच्छादन. परिमण्डला इयं पृथिवी असे स्पष्ट शब्दांत लिहिले आहे. पृथ्वीच्या सभोवार मंडलाकार वातावरण (Atmosphere) सुद्धा आहे

 संत ज्ञानेश्वर महाराज यांनी त्यांच्या भावार्थदीपिका ह्या ग्रंथांत अध्याय १० ओवी २६० सांगितले सांगितले आहे की 

पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा 

तरी हा भूगोलचि काखे सुवावा 

तैसा विस्तारू माझा पहावा 

तरी जाणावे माते 

 ह्या ओवीचा अर्थ आपण पाहू : 

पृथ्वीवरील परमाणूंचा झाडा  घ्यावयाचा असेल , (पृथ्वीवरील परामाणूंची गणती करायची असेल तर.....) तर सर्व भूगोलच बगलेत मारला पाहिजे . त्याप्रमाणे माझा विस्तार किती आहे हे समजून घ्यायचे असेल तर  मलाच जाणले पाहिजे. माऊली म्हणजे साक्षात परब्रह्म त्यांना तर सर्वच ज्ञात आहे. त्यांनी परमाणू आणि भूगोल असे शब्द लिहिले आहेत. म्हणजेच पृथ्वी गोल आहे आणि *परमाणूंची संकल्पना आपल्याला पाश्चात्यांनी शिकवायच्या आधीच ज्ञात होती असे सिद्ध होते. 

प्राचीन भूगर्भशास्त्र ग्रंथात खालील श्लोक आहे 

मृदम्ब्वग्न्यनिलाकाशपिण्डोऽयं पाञ्चभौतिकः ।

कपित्थफलवद्वृत्तः सर्वकेन्द्रेखिलाश्रयः ॥

स्थिरः परेशशक्त्येव सर्वगोळादधः स्थितः ।

मध्ये समन्तादण्डस्य *भूगोलो* व्योम्नि तिष्ठति

ह्याचा अर्थ पाहू :

मृद्(जमीन, भूमी ), अम्बु म्हणजे ( पाणी ), अग्नि (अग्नी ), अनिल (वायू ), आकाश (आकाश ) ह्या पाच महाभूतांपासून म्हणजे तत्वांपासून ही पृथ्वी तयार झाली आहे. कपित्थफलवद्वृत्तः म्हणजे कवठाच्या फळाप्रमाणे (वृत्त) गोल आहे. सर्वकेन्द्रेखिलाश्रयः म्हणजे पृथ्वीच्या केंद्राच्या आश्रयाने राहतात. म्हणजेच पृथ्वीचे केंद्र सर्वाना आपल्याकडे आकर्षून घेते. ह्याचा अर्थ पृथ्वीला गुरुत्वाकर्षण शक्ति आहे. 

स्थिरः परेशशक्त्येव सर्वगोळादधः स्थितः परेशाच्या म्हणजे परमेश्वराच्या म्हणजे सूर्याच्या शक्तीमुळे सर्व गोल म्हणजे सर्व ग्रह स्थिर आहेत म्हणजे सूर्याच्या आकर्षण शक्तीने बांधून ठेवले आहेत 

मध्ये समन्तादण्डस्य भूगोलो व्योम्नि तिष्ठति म्हणजे अण्डस्य समन्तात् भूगोल व्योम्नि मध्ये तिष्ठति. सर्व बाजूंनी जे अण्ड म्हणजे ब्रह्मांड आहे त्यात हा भूगोल म्हणजे ही पृथ्वी आहे. येथे पृथ्वी गोल आहे, ती ब्रह्मांडात आहे, तिच्यात गुरुत्व शक्ति आहे होता ह्या सर्व सिद्धांताचा अर्थबोध होतो. 

पृथ्वी गोल आहे ह्या माझ्या एकूण ४ लेखांमध्ये विविध दाखले देऊन मी हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की पृथ्वी गोल आहे हे आमच्याच ऋषींनी शोधून काढले आहे. तर मग, पृथ्वी गोल आहे हे आपण पाश्चात्य शास्त्रज्ञांकडून का शिकावे ? अजून किती दिवस आपण परकीयांचे लांगूलचालन करीत बसणार आहोत?  धडधडीत पुरावे समोर दिसत असून सुद्धा पाठ्यपुस्तकांत ही सर्व उदाहरणे का नाहीत? प्रत्येक वेळी परदेशी शास्त्रज्ञांनी सांगितले की आम्हाला का समजते? आपलेच भारतीय विद्वान, शास्त्रज्ञ आपली अस्मिता, स्वाभिमान हरवून बसले आहेत का? माझ्यासारखा एक साधा माणूस थोडा अभ्यास करून ही उदाहरणे शोधून काढू शकतो तर आपल्याकडील विद्वान, शास्त्रज्ञ मंडळी ह्यावर निश्चित अधिक संशोधन करू शकतात असे मला वाटते. 


🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

वेदविज्ञानरंजन - १० : पृथ्वी गोल आहे - भाग २

 वेदविज्ञानरंजन - १० : पृथ्वी गोल आहे - भाग २

ह्या भागात श्रीमद्भागवत पुराणांतील ह्या संबंधीचे वर्णन पाहू.

पृथ्वी गोल आहे - भाग २ 

श्रीमद्भागवत पुराण स्कंद ५ - अध्याय १६ (भुवनकोशवर्णनम् ) - श्लोक १, श्लोक ४ आणि श्लोक ५ मध्ये  पृथ्वी गोल आहे असे ठाम मत व्यक्त केले आहे.

श्लोक : १

उक्तस्त्वया *भूमण्डलायामविशेषो* यावदा-
दित्यस्तपति यत्र चासौ ज्योतिषां गणैश्चन्द्रमा वा
सहदृश्यते ॥ १ ॥


ह्याचा अन्वयार्थ पाहू :

यावत् आदित्यः तपति च यत्र असौ चन्द्रमाः ज्योतिषां गणैः सह वा दृश्यते भूमण्डलायामविशेषः त्वया उक्तः|

ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :

जितक्या दूरपर्यंत सूर्य प्रकाशतो आणि जेथे हा चंद्र नक्षत्रांच्या समूहांसह दिसतो भूमंडळाच्या लांबीरुंदीचा विशिष्ट विस्तार तुझ्याकडून सांगितला गेला. ॥१॥

श्लोक :४

न वै महाराज भगवतो मायागुणविभूतेः काष्ठां
मनसा वचसा वाधिगन्तुमलं विबुधायुषापि
पुरुषस्तस्मात्प्राधान्येनैव भूगोलकविशेषं
नामरूपमानलक्षणतो व्याख्यास्यामः ॥ ४ ॥

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

महाराज पुरुषः भगवतः मायागुणविभूतेः काष्ठां मनसा वा वचसा वै अधिगन्तुं विबुधायुषा अपि न अलं तस्मात् प्राधान्येन एव भूगोलकविशेषं नामरूपमानलक्षणतः व्याख्यास्यामः |

ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :

हे परीक्षित राजा! पुरुष परमेश्वराच्या मायेच्या गुणांच्या सामर्थ्याच्या अंताला मनाने किंवा वाणीने खरोखर जाणण्यास देवांच्या आयुष्याइतक्या काळानेहि समर्थ नाही तरीहि मुख्य मुख्य गोष्टी घेऊनच भूमंडलाचे ( भूगोलकविशेषम् ) विशेष वर्णन नावे, स्वरूपे, प्रमाण व लक्षणे ह्यांच्या योगाने आम्ही सांगतो. ॥४॥

श्लोक :५
यो वायं द्वीपः कुवलयकमलकोशाभ्यन्तरकोशो
नियुतयोजनविशालः समवर्तुलो यथा पुष्करपत्रम् ॥ ५ ॥


ह्याचा अन्वयार्थ पाहू :

यः वा अयं द्वीपः कुवलयकोशाभ्यन्तरकोशः नियुतयोजनविशालः यथा पुष्करपत्रं समवर्तुलः ||५ ||

ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :

जे खरोखर हे द्वीप भूमंडळरूपी  कमळाच्या आतील गाभ्याच्या घेरातील एक घेरच असे एक लक्ष योजने विस्ताराचे कमळाच्या पानाप्रमाणे सारखे वेटोळे ॥५॥

येथे भूगोल, समवर्तुळ असे शब्द योजले आहेत. त्यावरून पृथ्वी गोल होती हे त्याकाळी निश्चित ज्ञात होते हे लक्षात येते. पुढचा मुद्दा असा की त्या काळात एव्हढे प्रचंड ज्ञान कसे मिळविले? एक म्हणजे वेदकालीन विमानांमध्ये बसून (अंतराळात जाऊन ) त्यांनी पृथ्वीचे अवलोकन केले असणार किंवा योगबळाने हे सर्व ज्ञान ऋषींना प्राप्त झाले असणार. काहीतरी एक विधान मान्य करावेच लागेल. पृथ्वी गोल आहे ही केवळ कल्पना नाही किंवा ऋषींचा वेळ जात नव्हता म्हणून काहीतरी लिहिले असावे असे मानणे  हे चुकीचे आहे. ह्याच स्कंधातील पुढील श्लोकांत पृथ्वीवरील सात खंड, सात समुद्र ह्यांची अगदी लांबीरूंदीसहित माहिती दिलेली आहे. जिज्ञासूंनी मूळ श्रीमद्भागवत आवर्जून वाचावे.

श्रीमद्भागवत पुराणातील अजून एक उदाहरण पाहू :

स्कंद ५ - अध्याय २५ (श्रीसंकर्षण देवांचे विवरण आणि स्तुती ) (भूविवरविध्युपवर्णनम्) - श्लोक १ मध्ये पृथ्वीच्या भूगर्भातील आकर्षण शक्ती म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती यांचे रुपकात्मक वर्णन केले आहे. त्याकाळी सृष्टीतील तत्त्वांना देवतांची रूपके देण्याची पद्धत होती. खालील श्लोकात संकर्षण देवता म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती हिचे वर्णन आढळते.

श्लोक :१

तस्य मूलदेशे त्रिंशद्योजनसहस्रान्तरआस्ते या
वै कला भगवतस्तामसी समाख्याताऽनन्त इति
सात्वतीया द्रष्ट्टदृश्ययोःसङ्कर्षणमहमित्यभिमान-
लक्षणं यं सङ्कर्षणमित्याचक्षते ॥ १ ॥

ह्याचा अन्वयार्थ पाहू :

तस्य मूलदेशे त्रिंशद्योजनसहस्रान्तरे भगवतः या वै तामसी कला आस्ते सा अनंतः इति समाख्याता सात्वतीयाः यं संकर्षणं अहं इति अभिमानलक्षणं संकर्षणं इति आचक्षते |

ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :

त्या पाताळाच्या मूलप्रदेशी तीस योजने अंतरावर परमेश्वराची जी खरोखर तमोगुणी कला आहे, ती अनंत अशा नावाने प्रसिद्ध आहे, सात्विक तंत्रमार्गे जाणारे भगवद्‍भक्त ज्या अनंताला आकर्षण करणारा असा आहे, ‘मी आहे’ असा अभिमान आहे लक्षण ज्याचे असा संकर्षण असे म्हणतात. ॥१॥

इथे ऋषी सांगतात की पाताळाच्या खाली दूरवर पृथ्वीचा केंद्रबिंदू आहे तिथे जी शक्ती आहे (तामसी कला ) ती पृथ्वीवरील वस्तूंचे संकर्षण करते म्हणजेच त्यांना आकर्षून घेते.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १० मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही. माझी सर्व आचार्यांना विनंती आहे की भागवत सप्ताहात श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत. आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...