माझा परिचय

Showing posts with label महाभारत. Show all posts
Showing posts with label महाभारत. Show all posts

Friday, 17 February 2023

वेदविज्ञानरंजन - ४५: महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ५


🌺 *महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ५* 🌺

मागील ४ लेखांमध्ये आपण महाभारतात उल्लेख केलेल्या विविध वैज्ञानिक संदर्भांची माहिती घेतली.  *आजच्या शेवटच्या लेखात आपण महाभारतातील गर्भविज्ञान* ह्याची थोडक्यात माहिती घेणार आहोत.

*महाभारत शांति पर्व अंतर्गत मोक्षधर्म पर्व अध्याय ३२०* मध्ये मनुष्यशरीरात *गर्भधारणा* कशी होते ह्याचे विवेचन केले आहे.

🚩 बिन्दुन्यासादयोSवस्था: *शुक्रशोणितसम्भवाः*
यासामेव निपातेन *कललं* नाम जायते ||११७||
🚩
वीर्य म्हणजे पुरूबीज आणि शोणितबीज म्हणजे स्त्रीबीज ह्यांच्या मिश्रणातून गर्भाशयात एक घटक तयार होतो त्याला *कलल* (Cellular level) असे म्हणतात.

🚩कललाद् बुद्बुदोत्पत्तिः पेशी च बुद्बुदात् स्मृता |
पेश्यास्त्वङ्गाभिनिर्वृत्तिर्नखरोमाणि चाङ्गतः ||११८ || 🚩

कलल पासून *बुडबुडा* निर्माण होतो. त्या बुडबुड्यापासून पुढे *पेशी आणि मांस* तयार होते. विविध अवयव तयार होतात, *नखे आणि केस* तयार होतात.

स्त्री - पुरुष ह्यांच्या संयोगातून स्त्रीच्या शरीरात गर्भधारणा होते हे आपल्याला ज्ञात आहेच. *आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने गर्भधारणेतील सर्व टप्पे आपण पाहू शकतो.*  परंतु, इ. स. पू. ५००० पेक्षासुद्धा अधिक पुरातन असलेल्या *महाभारतात ह्या ग्रंथात (द्वापार युग) गर्भधारणेच्या प्राथमिक अवस्थेतचे वर्णन* केले आहे. कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय, सोनोग्राफीशिवाय *गर्भधारणेतील प्राथमिक टप्पा म्हणजेच कलल - बुडबुडा - मांस, पेशी - अवयव निर्मिती ह्याचे अगदी योग्य वर्णन महर्षी व्यास ह्यांनी केले आहे. हे सर्व अचंबित करणारे आहे.*

महाभारत युद्धात अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वापरण्यात आली. महाभारतातील *ब्रह्मास्त्र म्हणजेच अणुबॉम्ब सदृश* होय. त्याकाळी उपयोगात येणारी अनेक शस्त्रास्त्रे आधुनिक शस्त्रास्त्रांशी मिळतीजुळती आहेत.

अर्जुनाचा पुत्र *अभिमन्यूला मातेच्या गर्भात प्राप्त झालेले ज्ञान म्हणजेच गर्भसंस्कार* आणि गर्भातील *बाळाच्या मेंदूची प्रगत अवस्था* ह्याचे वर्णन केलेले आपल्याला आढळते.

महाभारत हा ग्रंथ म्हणजे नुसती *कविकल्पना नाही तर प्रत्यक्ष घडलेला इतिहास* आहे. त्याचे पुरावे वेळोवेळी समोर येत असतात. महाभारत म्हणजे फक्त *कौरव - पांडव युद्ध आणि श्रीमद्भगवद्गीता नाही* तर अनेक *आधुनिक वैज्ञानिक संदर्भ आणि त्याची पाळेमुळे* आपल्याला महाभारत ह्या ग्रंथात सापडतात. महाभारत ह्या ग्रंथात *खगोलशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, भूगोल, स्थापत्यशास्त्र, युद्धकलाशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र* अशाप्रकारे अनेक विषय समाविष्ट आहेत. जगातील एकही असा विषय नाही जो महाभारतात नाही म्हणूनच *व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्*
अशी उक्ती आहे. म्हणजे जगातील सर्व ज्ञान व्यासांनी उष्टे केले आहे. ह्याचा अर्थ असा की व्यासांनी जगातील सर्व विषयांना स्पर्श केला आहे.
*महाभारत आणि विज्ञान* ह्या विषयावर माझ्या सर्व लेखांना आपल्यासारख्या जाणकार वाचकांनी *उत्तम प्रतिसाद दिला* त्याबद्दल *मी सर्वांचा ऋणी* आहे. *आजचा हा शेवटचा भाग पाठवून मी महाभारतावरील लेखांचा समारोप करीत आहे.* पुढच्या वेळी *नवीन विषय घेऊन पुन्हा भेटू.* तोपर्यंत *जयतु वेदविज्ञानम्*

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

Saturday, 11 February 2023

वेदविज्ञानरंजन - ४४: महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ४


🌺 *महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ४* 🌺

*चंद्र आणि पृथ्वी ह्यांचे रुपक वापरून अतिशय सुंदर तत्वज्ञान* महाभारतात व्यासांनी सांगितले आहे. आता ह्याविषयी अधिक माहिती घेऊ.
वेदव्यास ह्यांनी महाभारतात लिहिले आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर जे डाग आहेत ते डाग म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा नकाशा आहे.

🚩 यथा हि पुरुषः पश्येदादर्शे मुखमात्मानः |
एवं सुदर्शनद्वीपो दृश्यते चन्द्रमण्डले ||१६ || 🚩

ज्याप्रमाणे पुरूष आपले तोंड आरशात पाहतो,  म्हणजेच प्रतिबिंब पाहतो, त्याप्रमाणे *सुदर्शन द्वीप चंद्रावर* दिसतो (त्याचे प्रतिबिंब चंद्रावर दिसते ) म्हणजेच पृथ्वीवरील भूभागाचे *प्रतिबिंब* दिसते.

आता पृथ्वीचे प्रतिबिंब सूर्यावर कसे दिसेल? त्यासंबंधी पुढील श्लोक पाहू

🚩द्विरंशे पिप्पलस्तत्र द्विरंशे च शशो महान् |
सर्वौषधिसमावायः सर्वतः परिवारितः ||१७ ||🚩

त्याच्या *दोन अंशात पिंपळ ( पिंपळाची पाने ) आणि दोन अंशांत ससा* दिसतो. त्याच्या सर्व बाजूंनी औषधी वनस्पती आहेत.

ह्याचे विवेचन पाहू. चंद्राच्या पृष्ठभागावर जो डाग दिसतो तो ससा ह्या प्राण्याच्या आकारासारखा दिसतो हे आपल्याला माहितीच आहे. जणू काही *चंद्राच्या मांडीवर ससा आहे अशी कल्पना करून चंद्राला शशाङ्क* असे म्हणतात (अङ्क म्हणजे मांडी ) आता ह्या सश्याचे चित्र म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा नकाशा आहे. संपूर्ण पृथ्वीचा एकसंध नकाशा तुम्ही गूगल वर पाहिलात तर तो नकाशा ससा आणि पिंपळाच्या पानांसारखा दिसतो. ह्या लेखाबरोबर मी चित्र पाठविली आहेत.

* भीष्मपर्व जम्बूखण्डविनिर्माणपर्व अध्याय क्र. ५*

🚩 (स वै सुदर्शनद्वीपो दृश्यते शशवद् द्विधा )
यां तु पृच्छसि मां राजन् दिव्यामेतां शशाकृतिम्
पार्श्वे शशस्य द्वे वर्षे उक्ते ये दक्षिणोत्तरे
कर्णौ तु नागद्वीपश्च काश्यपद्वीप एव च 🚩

अशाप्रकारे मी सुदर्शन द्वीपाचे वर्णन केले. तो द्वीप म्हणजे पृथ्वीचे चित्र दोन भागांत विभागले आहे आणि चंद्रावरील डागांच्या स्वरुपात (सश्याचा आकार ) आपल्याला दिसतो. दक्षिण आणि उत्तर दिशेत स्थित (भारत आणि ऐरावत ) नावाचे जे दोन द्वीप सांगितले आहेत ते दोन्ही त्या सशाचे पार्श्वभाग आहेत. नागद्वीप आणि काश्यपद्वीप हे त्या सशाचे दोन कान आहेत.

🚩आपस्ततोSन्या विज्ञेयाः शेषः संक्षेप उच्यते ||१८ ||🚩

ह्या सर्व भूभागाव्यतिरिक्त उरलेली जागा जलमय समजावी. असेही स्पष्ट वर्णन आढळते. पृथ्वीवरील सर्व खंड, त्यांचा विस्तार आणि उरलेल्या भागात पाणी आहे ह्याचे अचूक ज्ञान महर्षी व्यास ह्यांना होते. *उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका अशा सर्व खंडांचे वर्णन, आणि त्यांचे आकार ह्यांचे वर्णन वेदव्यास ह्यांनी कसे काय केले असेल?*

ह्या सर्व खंडांच्या आकाराचे वर्णन करण्यासाठी ते उंचावरून म्हणजे आकाशातून किंवा अवकाशातून पहावे लागतील. आजकाल अवकाशातील उपग्रहांच्या सहाय्याने आपल्याला अचूक नकाशे तयार करता येतात. इथे २-३ गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. पृथ्वीच्या संपूर्ण भौगोलिक परिस्थितीची माहिती होण्यासाठी *पृथ्वीची प्रदक्षिणा* करणे आवश्यक आहे. म्हणजे वेदव्यास ह्यांनी पृथ्वीप्रदक्षिणा केली असणार. *खंडांच्या आकाराची कल्पना येण्यासाठी ते उंचावर जाऊन पहावे लागतील.* ह्याचा अर्थ *विमानासारख्या यंत्रात बसून वेदव्यास आकाशात किंवा अवकाशात गेले असावेत* कारण महाभारत काळी म्हणजे *अंदाजे इ. स. पू. ५००० वर्षे विमाने अस्तित्वात होती.*  हेही मान्य नसेल तर वेदव्यास ह्यांनी *योगबळावर सूक्ष्मरूपाने विश्वात संचार करून सर्व माहिती मिळविली असणार त्यातून भारतीय योगशास्त्र किती प्रगत होते हे मान्य करावेच लागेल.* अशाप्रकारे इथून पुढे जगाचा नकाशा सर्वप्रथम कोणी तयार केला? असा प्रश्न विचारल्यास, वेदव्यास ह्यांनी महाभारत ह्या ग्रंथात ह्या नकाशाची विस्तृत माहिती दिली आहे असे अभिमानाने सांगावे. आज इथेच थांबतो. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

Friday, 3 February 2023

वेदविज्ञानरंजन - ४३ : महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ३

 

#वेदविज्ञानरंजन_४३

🌺 *महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ३* 🌺

गेल्या शनिवारच्या लेखात आपण चंद्र- सूर्यग्रहण तसेच सूक्ष्मजीव ह्यांचा महाभारतातील उल्लेख ह्यावर माहिती घेतली होती. आज *पृथ्वीच्या आकारासंबंधी* अजून माहिती घेऊ
महाभारत भीष्मपर्व अंतर्गत *जम्बूखंडविनिर्मण पर्व* ह्यात सुदर्शन द्वीप म्हणजे *पृथ्वीचे वर्णन* केले आहे.

संजय धृतराष्ट्राला सांगतात की..

सुदर्शनं प्रवक्ष्यामि द्वीपं तु कुरुनन्दन |
*परिमण्डलो* महाराज द्वीपोSसौ चक्रसंस्थितः ||१३ ||

हे कुरुनन्दन! मी सुदर्शन नावाच्या द्वीपाचे म्हणजेच पृथ्वीचे वर्णन करतो. महाराज *पृथ्वी ही चक्रासारखी गोलाकार* आहे.

महाभारताचे लेखक वेदव्यास ह्यांनी संजय आणि धृतराष्ट्र ह्यांच्यातील वरील संवाद लिहून ठेवला आहे. येथे *पृथ्वी गोलाकार आहे* असे म्हटले आहे. आता पृथ्वी गोल आहे हे इतके अचूक विधान करण्यासाठी त्याची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे आणि ती *सर्व माहिती संजय ह्यांना होती.* पृथ्वी गोल आहे ह्याची माहिती *सर्वांत आधी अंदाजे इ.स.पू.५०० वर्षे ग्रीक तत्ववेत्त्यांना होती* असे आपल्याला गूगल सांगते. परंतु, आपल्या महाभारत ग्रंथात हीच माहिती एव्हढेच नव्हे तर *पृथ्वीवरील सर्व खंडांची पूर्ण वर्णन दिलेले आहे.* महाभारत हे अंदाजे इ. स. पू. ५००० वर्षांपूर्वी लिहिले गेले असल्याने *पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मांडण्याचा मान महाभारत ग्रंथास आणि वेदव्यास, संजय ह्यांना मिळायला हवा* . *रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ* ह्या माझ्या लेखमालिकेत मी लिहिले होते की पृथ्वी गोल आहे ह्याचा सर्व संदर्भ वाल्मीकी रामायण, किष्किंधा कांड ह्यात दिलेला असून *वानरराज सुग्रीव ह्यांनी पृथ्वी गोल आहे असा सिद्धांत*  मांडला आहे. आपले *वेद हे जगातील अत्यंत प्राचीन लिखित वाङ्मय* आहे. त्यातसुद्धा पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मांडला आहे. वेदविज्ञानरंजन ह्या लेखमालिकेअंतर्गत मी  *पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण ह्याचा वेदांतील उल्लेख* ह्या लेखांमध्ये पृथ्वी गोल आहे ह्याचा उल्लेख केला आहे. थोडक्यात काय तर वेद, रामायण, महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथांत पृथ्वी गोल आहे ह्याचा स्पष्ट उल्लेख असताना ह्याच्या *सिद्धांताचे श्रेय मात्र परदेशी वैज्ञानिकांना* दिले गेले. आपल्या स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली तरीही आपण अजूनही *गुलामगिरीच्या मानसिकतेत* आहोत. आपल्याच ग्रंथातील *अनेक वैज्ञानिक संदर्भ* आपण पुढे आणत नाही, ह्या सर्व ग्रंथांचा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करीत नाही. ह्याची *खूप खंत वाटते.*  आपला *सनातन धर्म हा विज्ञानावर आधारलेला असून अनेक वैज्ञानिक संदर्भ आपल्याला आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करताना सापडतात आणि आपण अचंबित* होतो. परंतु, त्याचा अभ्यास न करता आपण * परदेशी शास्त्रज्ञांचे गोडवे* गाण्यात धन्यता मानीत आहोत. ही सर्व माहिती *पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली तरच नवीन पिढीला समजेल* आणि त्यावर अधिक संशोधन होऊ शकेल.   ह्यासाठी *सरकार दरबारी पाठपुरावा* करणे आवश्यक आहे. तूर्तास आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना ही सर्व माहिती द्यावी आणि *रामायण, महाभारत असे ग्रंथ वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून वाचण्यास उद्युक्त* करावे.

महाभारतात चंद्र- पृथ्वी आणि चंद्रावरील डाग ह्यांची खूप छान माहिती मिळते. ती खालीलप्रमाणे

पश्यन्नपि यदा *लक्ष्म जगत् सोमे* न विन्दति
एवमस्ति न चोत्पन्नं न च तन्न परायणम् ||८|| 

चंद्रावर जो कलंक आहे ते पृथ्वीचे चिह्न आहे परंतु, ते फक्त पृथ्वीचे चिह्न आहे. प्रत्यक्ष पृथ्वी नाही.
त्याप्रमाणे प्रत्येकाला *मी आहे* ह्या स्वरुपात आत्म्याचे ज्ञान आहे परंतु, संपूर्ण आत्म्याचे यथार्थ ज्ञान नाही.

आपल्याला *चंद्रावर डाग दिसतात ते डाग म्हणजे चंद्रावर संपूर्ण पृथ्वीचा नकाशा आहे.*  चंद्रावर डाग हा फक्त पृथ्वीचा नकाशा आहे पण प्रत्यक्ष पृथ्वी नाही. याचाच अर्थ प्रत्येकाला स्व चे म्हणजे आत्म्याचे अगदी थोडे ज्ञान असते त्यावरून आत्म्याची कल्पना करता येते. परंतु, संपूर्ण आत्म्याचे ज्ञान होणे खूप कठीण आहे. *चंद्र आणि पृथ्वी ह्यांचे रुपक वापरून अतिशय सुंदर तत्वज्ञान* महाभारतात व्यासांनी सांगितले आहे. आता चंद्रावरील डाग हे पृथ्वीचा नकाशा कसा? ह्याची *रंजक माहिती आपण पुढील लेखात घेऊ.*  तोपर्यंत
जयतु वेदविज्ञानम् 


Saturday, 28 January 2023

वेदविज्ञानरंजन - ४२ : महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - २

  महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - २



यथा *चन्द्रार्कसंयुक्तं* तमस्तदुपलभ्यते |

तद्वच्छरीरसंयुक्तः शरीरीत्युपलभ्यते ||२१||


ज्याप्रमाणे सूर्यग्रहणाच्या वेळी ( *चन्द्रार्कसंयुक्तं* ) अर्क म्हणजे सूर्य. चंद्राची सावली सूर्यावर पडते त्यामुळे सूर्य झाकोळला जातो म्हणजेच ती सावली संपूर्ण सूर्याला व्यापून राहते त्याचप्रमाणे आत्मा संपूर्ण शरीराला व्यापून राहतो. 


ह्यात सूर्यग्रहणाचा उल्लेख अगदी स्पष्टपणे केलेला आढळतो. नुसते सूर्यग्रहण होते असा उल्लेख करून सोडून दिलेले नाही. तर सूर्य - चंद्र - पृथ्वी ह्यांच्या सावल्यांच्या खेळामुळे ग्रहण होते ह्याचे स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आढळते. हिरोडोटस सारख्या पाश्चिमात्य शास्त्रज्ञांना पाहिले सूर्यग्रहण पाहिल्याचे श्रेय देण्यात आले आहे. त्यांचा काळ जास्तीत जास्त इ. स. पू. ५०० वर्षे इतका मागे जातो. परंतु महाभारत ज्याचा काळ अंदाजे इ. स. पू. ५००० वर्षांपेक्षा अधिक आहे त्याचे नाव कुठेच येत नाही. रामायण जे महाभारताच्या आधीच घडले होते, (त्रेतायुग) ज्याचा काळ अंदाजे इ.स.पू. १२००० वर्षांपेक्षा अधिक आहे ह्यात सुद्धा सूर्यग्रहणाचे उल्लेख आहेत. त्यामुळे आता तरी गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडून खरे सत्य जगासमोर मांडणे आवश्यक आहे. 

यथा *हिमवतः पार्श्वे पृष्ठं चन्द्रमसो* तथा |

न दृष्टपूर्वं मनुजैर्न च तन्नास्ति तावता |


मनुष्याला हिमालयाचा दुसरा पार्श्वभाग आणि चंद्राचा दुसरा पृष्ठभाग दिसत नाही परंतु, ह्याचा अर्थ असा होत नाही की हिमालयाला पार्श्वभाग आणि चंद्राला पृष्ठभाग नाही. अशाप्रकारे आत्मा डोळ्यांनी दिसत जरी नसला तरी त्याचे अस्तित्व आहे. 


चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळाएव्हढाच असल्याने चंद्राची कायम एक बाजू पृथ्वीच्या दिशेला असते. पृथ्वीवरून पाहण्याच्या विशिष्ट कोनामुळे चंद्राचा फक्त ५९% भाग पृथ्वीवरून दिसतो (पृथ्वीसन्मुख भाग ) असे आधुनिक विज्ञान सांगते. दुसरा भाग (पृथ्वीविन्मुख ) पृथ्वीवरून दिसू शकत नाही. आता असे पहा की आधुनिक विज्ञानाने सांगितलेलेच तत्त्व महाभारतात महर्षी व्यासांनी सांगितले आहे. फक्त किती % भाग पृथ्वीवरून दिसतो हे त्यांनी सांगितलेले नाही. आधुनिक विज्ञानाशी संबंधित इतकी अचूक माहिती ज्यांनी लिहिली त्या वेदव्यास ऋषींच्या चरणी आपण नतमस्तक व्हावयास हवे. 


महाभारत शांति पर्व अध्याय १५ श्लोक २६ मध्ये सूक्ष्मजीवांचा उल्लेख केला आहे.


सूक्ष्मयोनीनि भूतानि तर्कगम्यानि कानिचित् |

पक्ष्मणोSपि निपातेन येषां स्यात् स्कन्धपर्ययः ||२६ ||


वरील श्लोकाचा अर्थ आपण पाहू. 


असे अनेक सूक्ष्मजीव आहेत की ज्यांना अनुमानाने जाणता येते. मानवाच्या पापण्या लवतात न लवतात तोच ते सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि पुन्हा निर्माण होतात.


सूक्ष्मजीव म्हणजे डोळ्यांना न दिसणारे जीव. फक्त आणि फक्त सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारेच त्यांचा अभ्यास करणे शक्य आहे. त्यांचे आयुष्य खूपच अल्प म्हणजे काही क्षण किंवा मिनिटांपुरतेच असते असे आधुनिक विज्ञान सांगते. आधुनिक उपकरणांच्या मदतीने हा अभ्यास करता येतो. आजच्या विज्ञानाने सूक्ष्मवांविषयी जी माहिती दिली आहे तेच महाभारतात सांगितले आहे. त्यावेळी सूक्ष्मदर्शक यंत्र अस्तित्वात नव्हते असे मानले तर इतके अचूक वर्णन व्यास महर्षींनी कसे केले असेल? शिल्पभृगुसंहिता ह्या ग्रंथात दुर्बिण कशी तयार करतात ह्याची माहिती आहे. त्याकाळी दुर्बीण कशी तयार करतात ह्याची माहिती होती तर कदाचित सूक्ष्मदर्शक यंत्राची माहिती असावी असे वाटते. सूक्ष्मजीवांसारख्या विषयाला सुद्धा व्यासांनी स्पर्श केला आह. म्हणूनच म्हणतात की *व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्*

आज इथेच थांबतो पुढच्या भागात अजून माहिती वाचूया. तोपर्यंत जयतु वेदविज्ञानम् 

Friday, 20 January 2023

वेदविज्ञानरंजन - ४१: महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - १

वेदविज्ञानरंजन - ४१

महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - १

बृहस्पती आणि मनू ह्यांच्यातील संवाद भीष्म पितामह यांनी धर्मराज युधिष्ठिर यांना सांगितला आहे. तो संवाद महर्षी व्यास यांनी महाभारतात लिहून ठेवला आहे आणि त्याचा उल्लेख अध्याय क्रमांक २०३  मध्ये आहे. त्यावरील विवेचन पाहू.
महाभारत शांति पर्व, मोक्षधर्म पर्व अध्याय २०३ मध्ये श्लोक क्र. १५ पासून  श्लोक क्र. २३ पर्यंत चंद्र, सूर्य आणि खगोलीय घटनांचा मन, शरीर आणि आत्म्याशी कसा संबंध आहे हे उत्तम प्रकारे वर्णन केले आहे. त्याचा अर्थ आपण पाहू.

यथा चन्द्रो ह्यमावस्यामलिङ्गत्वान्न दृश्यते |
न च नाशोsस्य भवति तथा विद्धि शरीरिणम् ||१५|
|

अमावास्या तिथीस चंद्र प्रकाशहीन झाल्यामुळे दिसत नाही, परंतु त्याचे अस्तित्व नष्ट होत नाही, चंद्र नाश पावत नाही. त्याचप्रमाणे आत्मा अदृश्य रुपात असला (दिसत नसला) तरी त्याचे अस्तित्व असते. हे मान्य करावेच लागेल.


क्षीणकोशो ह्यमावस्यां चन्द्रमा न प्रकाशते |
तद्वन्मूर्तिविमुक्तोsसौ शरीरी नोपलभ्यते ||१६||


अमावास्या तिथीला चंद्र आपल्या प्रकाश्य स्थानापासून दूर जातो, आकाशात दिसत नाही. त्याचप्रमाणे देहधारी आत्मा शरीरापासून दूर गेल्यावर दृष्टिगोचर होत नाही, डोळ्यांना दिसत नाही.

अमावास्येला चंद्र दिसत नाही परंतु, त्याचे अस्तित्व असते हा खगोलशास्त्रीय सिद्धांत आहे. (अमा - सह, एकत्र आणि वस \ वास - रहाणे ) = अमावास्या.  ह्या तिथीस सूर्य आणि चंद्र यांचे परस्पर सान्निध्य असते त्यामुळे अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही. सूर्याचन्द्रमसोर्यः परः सन्निकर्षः सामावास्या |. सूर्य आणि चंद्राच्या परम सान्निध्याला अमावास्या असे म्हणावे. हा खगोलीय सिद्धांत महाभारतकाळी आपणास ज्ञात होता.

यथाSSकाशान्तरं प्राप्य चन्द्रमा भ्राजते पुनः |
तद्वल्लिङ्गान्तरं प्राप्य शरीरी भ्राजते पुनः ||१७ ||


पुन्हा तोच चंद्रमा दुसरीकडे आकाशात प्रगट होतो आणि पुन्हा प्रकाशित होतो. अशाप्रकारे जीवात्मा दुसरे शरीर धारण करून पुन्हा प्रगट होतो.

ह्यात आत्मा अमर, अविनाशी असून एक देह सोडून दुसर्‍या देहात प्रवेश करतो असे म्हटले अरे. वरकरणी हा तत्त्वज्ञान देणारा श्लोक वाटत असला तरी तयार मोठे खगोलीय सत्य दडलेले आहे. ह्यात असे म्हटले आहे की चंद्रमा दुसर्‍या आकाशात प्रगट होतो.  म्हणजेच जेव्हा भारतात दिवस असतो तेव्हा अमेरीकेत रात्र असते किंवा इतर काही देशांमध्ये रात्रच असते. वास्तविक चंद्र हा मावळत नाही, उगवत नाही तो आहे तिथेच असतो. परंतु, पृथ्वीचा परिवरनामुळे (स्वतःभोवती फिरणे )  आपल्या दिवस, रात्र  आणि इतर खगोलीय घटना दिसतात
तसेच तो दुसर्‍या देशात उगवतो म्हणजे अमेरिकेसारखी पृथ्वीवरील देश, तिथे तो प्रकाशित असो. आता मला सांगा की  महाभारत हे आपल्या भारतात घडले असल्याने भारताच्या विरुद्ध बाजूकडील देशांच्या भौगोलिक परिस्थितीचेसुद्धा ज्ञान महाभारतकाळी होते त्यामुळेच इथे अचूक आणि योग्य वर्णन ऋषींनी केले होते.

जन्म वृद्धिः क्षयश्चास्य पारत्यक्षेणोपलभ्यते |
सा तु चान्द्रमसी वृत्तिर्न तु तस्य शरीरिणः ||१८ ||


आपल्याला चंद्राच्या ज्या विविध कला दिसतात ह्या चंद्रामुळे घडत नाहीत कारण चंद्र हा पूर्णच असतो. चंद्रकोरीपासून पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमा आणि उलट क्रिया म्हणजे अमावास्या ह्या पृथ्वीच्या गतीमुळे प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे जन्म हा शरीराचा होतो. आत्म्याचा नाही. कारण आत्मा अविनाशी आहे, अमर आहे. म्हणूनच मृतात्म्यास श्रद्धांजली असे कधीही म्हणू नये. मृताच्या आत्म्यास किंवा गतात्म्यास श्रद्धांजली असे म्हणावे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.  इंग्रजी शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो.


Monday, 12 December 2022

वेदविज्ञानरंजन - २

 वेदविज्ञानरंजन_२

गुरुत्वाकर्षण सिद्धांत


गुरुत्वाकर्षण सिद्धांत दर्शविणारी ऋग्वेदातील खालील ऋचा पाहू : ऋग्वेद मंडल ८ सूत्र १२ मंत्र २८ 


यदा ते हर्य्यता हरी वावृधाते दिवेदिवे |

आदित्ते विश्वा भुवनानि येमिरे ||


ह्याचा अर्थ खालील प्रमाणे :


जेव्हा (यदा ते ) ते सर्व ग्रह (विश्वा भुवनानि ) कालपरत्वे (दिवेदिवे ) गतिमान होऊन (हर्य्यता हरी ) सूर्याच्या निकट असतात , तेव्हा त्यांच्या गतीत वाढ होते ( वावृधाते ) तेव्हा (आदित्ते ) त्यावेळी ते ग्रह सूर्याकडून आपापल्या कक्षेत आणि स्थानात स्थापन केले जातात. 


ह्यातून खालील चार वैज्ञानिक तत्त्वांचा बोध होतो. 


१. सूर्य आणि ग्रह यांच्या मध्ये गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे. 

There is a gravitational force in between planets and the Sun


२. ग्रहांची कक्षा स्थिर असते 

Planets are moving in an orbit. 


 ३. सूर्य स्थिर असून इतर ग्रह त्याभोवती फिरतात*. 

The Sun is steady and planets are revolving around it


४. ग्रहांची परिभ्रमण गती आणि त्यांचे सूर्यापासूनचे अंतर ह्यांचे प्रमाण व्यस्त असते. 


The motion of planet is such that 

Velocity of planets is in inverse relation with the distance in between the plane and the Sun


वरील सूत्रात गुरुत्वाकर्षण सिद्धांत आणि सूर्य स्थिर असून सर्व ग्रह त्याभोवती फिरतात असे सांगितले आहे. येथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणारे ग्रह ह्यांचे ज्ञान ऋग्वेदकालीन ऋषींना कसे होते? एकतर सूक्ष्म शरीर धारण करून योगबळाने पृथ्वीच्या बाहेर अवकाशात जाऊन त्यांनी हे सर्व पाहिले असावे किंवा त्याकाळी अवकाशयाने अस्तित्वात असणार ज्याच्यामध्ये अवकाशप्रवास करून सर्व निरीक्षणे नोंदवली असण्याची शक्यता आहे. वेदकालीन अवकाशयाने हा माझा एक स्वतंत्र लेख ह्या लेखमालिकेत पुढे येईलच. 


पिप्पलाद ऋषींनी प्रश्नोपनिषद ह्या ग्रंथात गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला आहे. 


 पायूपस्थे अपानम् (प्रश्नोपनिषद ३.४) 

पृथिव्यां या देवता सैषा पुरुषस्यापानमवष्टभ्य (प्रश्नोपनिषद ३.८ ) 

तसेच आद्य शंकराचार्य ह्यांनी प्रश्नोपनिषद यांवर जे शांकरभाष्य लिहिले आहे त्यात ते म्हणतात 

तथा पृथिव्यां अभिमानिनी या देवता सैषा पुरुषस्य अपानवृत्तीं आकृष्य अपकर्षेण अनुग्रहं कुर्वती वर्तते |

अन्यथा हि शरीरं गुरुत्वात् पतेत् सावकाशे वा उद्गच्छेत् |


ह्याचा अर्थ असा की अपान वायूमुळे मलमूत्र शरीरातून बाहेर पडते. पृथ्वी आपल्या आकर्षण शक्तीमुळे सर्वांना धरून ठेवते. नाहीतर सर्व आकाशात उडून जातील. 

 

Earth is having its own force of attraction dute to which objects are being hold on the surface of the earth. Otherwise object will be fly in the sky


वराहमिहीर यांनी आपल्या पंचसिद्धांतिका ग्रंथात गुरुत्वाकर्षण सिद्धांताचा उल्लेख केला आहे. 


पंचमहामूतमयस्तारागण पंजरे महीगोलः|

खेयस्कान्तान्तःस्थो लोह इवावस्थितो वृत्त: ||


ह्याचा मराठी भाषेत अर्थ पुढीलप्रमाणे 


ज्याप्रमाणे दोन लोहचुंबकांमध्ये लोखंड तुकडा ठेवला असता तो अधांतरी राहतो त्याप्रमाणे तारासमूहात पृथ्वीगोल विशिष्ट शक्तीमुळे (गुरुत्वाकर्षण शक्ती ) अधांतरी राहतो वराहमिहीर यांनी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि त्याचबरोबर चुंबकत्वसुद्धा स्पष्ट केले आहे. म्हणजेच त्याकाळी चुंबकत्वाचे (Magnetizum ) सुद्धा ज्ञान अवगत होते. तसेच महीगोलः असा शब्दप्रयोग केला आहे. म्हणतच पृथ्वी गोल आहे हेही त्या काळी ज्ञात होते. 


When an iron piece is hold in between two magnets then it it Wil be balanced by the magnetic force by the two magnets. In the same way the earth is balanced by gravitational force in the space


महर्षी पतंजली यांनी त्यांच्या व्याकरणमहाभाष्य ह्या ग्रंथात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आहे. 


 लोष्ठः क्षिप्तो बाहुवेगं गत्वा नैव तिर्यक् गच्छति नोर्ध्वमारोहति | पृथिवीविकारः पृथिवीमेव गच्छति आन्तर्यतः |



जर मातीचे ढेकूळ (लोष्ठः ) (माती असलेला घट्ट तुकडा ) आकाशाच्या दिशेने वर फेकला तर तो तुकडा त्याचा वेग पूर्ण झाल्यावर क्षणभर थांबतो, आणखी वर जात नाही (नोर्ध्वमारोहति ) . ह्याचे कारण असे की पृथ्वीचा विकार (पृथिवीविकारः) (गुरुत्वाकर्षण शक्ती ) मुळे तो तुकडा पुन्हा खाली येऊन पृथ्वीवर पडतो (पृथिवीमेव गच्छति)


When a piece of soil is thrown in the sky then after some time it's velocity decreases. It becomes steady for a while and then falls on earth due to the gravitational force of Earth


महाभारतातील शांतिपर्वात अध्याय क्र. २६१ मध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांचा संवाद आहे त्यातील श्लोक क्रमांक ३ मध्ये भीष्म पितामह म्हणतात :


भूमेः स्थैर्यं गुरुत्वं च काठिन्यं प्रसवात्मता |

गन्धोः भारश्च शक्तिश्च संघातः स्थापना धृतिः ||


ह्याचा अर्थ पुढीलप्रमाणे 

हे युधिष्ठिरा! स्थिरता, गुरुत्वाकर्षण, कठोरता, उत्पादकता, गंध, भार, शक्ती, घट्टपणा , स्थापना हे भूमीचे गुण आहेत.


वरील श्लोकातील भूमीचा दुसरा गुण गुरुत्व म्हणजेच गुरुत्वाकर्षण आहे असे स्वतः भीष्म सांगत आहेत. 


ह्या आधीच्या लेखातील आणि प्रस्तुत लेखातील विविध उदाहरणांचा विचार करता असे लक्षात येते की न्यूटनच्या कितीतरी शतके आधीच वेद, उपनिषदे यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला आहे. परंतु त्यांचा कुठेच उल्लेख नाही. सर्व श्रेय मात्र न्यूटनलाच दिले गेले, कारण त्याने गुरुत्वाकर्षणाचे सूत्र मांडले

परंतु गुरुत्वाकर्षणाची मूळ संकल्पना मात्र युरोपीय नसून भारतीयच आहे आणि ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

आपल्या भारत देशाचे, शिक्षण अभ्यासक्रमाचे (मेकॉले प्रणीत शिक्षणपद्धती) हे दुर्दैव आहे की जाणीवपूर्वक वेदांतील विज्ञान नजरेआड केले गेले. माझी शालेय शैक्षणिक विभागाला विनंती आहे की गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे श्रेय न्यूटनला जरी दिले गेले असले तरीही शालेय विज्ञान पुस्तकात वर उल्लेख केलेल्या वेद, उपनिषदे यांतील गुरुत्वाकर्षण सूत्राचा सुद्धा उल्लेख करावा. म्हणजेच आपल्या पूर्वजांचे, वेदांचे ज्ञान किती सखोल होते हे सर्वांना समजेल आणि त्याचा प्रसार होईल. तूर्तास इथेच थांबतो. 

                    🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...