माझा परिचय

Saturday 28 January 2023

वेदविज्ञानरंजन - ४२ : महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - २

  महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - २



यथा *चन्द्रार्कसंयुक्तं* तमस्तदुपलभ्यते |

तद्वच्छरीरसंयुक्तः शरीरीत्युपलभ्यते ||२१||


ज्याप्रमाणे सूर्यग्रहणाच्या वेळी ( *चन्द्रार्कसंयुक्तं* ) अर्क म्हणजे सूर्य. चंद्राची सावली सूर्यावर पडते त्यामुळे सूर्य झाकोळला जातो म्हणजेच ती सावली संपूर्ण सूर्याला व्यापून राहते त्याचप्रमाणे आत्मा संपूर्ण शरीराला व्यापून राहतो. 


ह्यात सूर्यग्रहणाचा उल्लेख अगदी स्पष्टपणे केलेला आढळतो. नुसते सूर्यग्रहण होते असा उल्लेख करून सोडून दिलेले नाही. तर सूर्य - चंद्र - पृथ्वी ह्यांच्या सावल्यांच्या खेळामुळे ग्रहण होते ह्याचे स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आढळते. हिरोडोटस सारख्या पाश्चिमात्य शास्त्रज्ञांना पाहिले सूर्यग्रहण पाहिल्याचे श्रेय देण्यात आले आहे. त्यांचा काळ जास्तीत जास्त इ. स. पू. ५०० वर्षे इतका मागे जातो. परंतु महाभारत ज्याचा काळ अंदाजे इ. स. पू. ५००० वर्षांपेक्षा अधिक आहे त्याचे नाव कुठेच येत नाही. रामायण जे महाभारताच्या आधीच घडले होते, (त्रेतायुग) ज्याचा काळ अंदाजे इ.स.पू. १२००० वर्षांपेक्षा अधिक आहे ह्यात सुद्धा सूर्यग्रहणाचे उल्लेख आहेत. त्यामुळे आता तरी गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडून खरे सत्य जगासमोर मांडणे आवश्यक आहे. 

यथा *हिमवतः पार्श्वे पृष्ठं चन्द्रमसो* तथा |

न दृष्टपूर्वं मनुजैर्न च तन्नास्ति तावता |


मनुष्याला हिमालयाचा दुसरा पार्श्वभाग आणि चंद्राचा दुसरा पृष्ठभाग दिसत नाही परंतु, ह्याचा अर्थ असा होत नाही की हिमालयाला पार्श्वभाग आणि चंद्राला पृष्ठभाग नाही. अशाप्रकारे आत्मा डोळ्यांनी दिसत जरी नसला तरी त्याचे अस्तित्व आहे. 


चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळाएव्हढाच असल्याने चंद्राची कायम एक बाजू पृथ्वीच्या दिशेला असते. पृथ्वीवरून पाहण्याच्या विशिष्ट कोनामुळे चंद्राचा फक्त ५९% भाग पृथ्वीवरून दिसतो (पृथ्वीसन्मुख भाग ) असे आधुनिक विज्ञान सांगते. दुसरा भाग (पृथ्वीविन्मुख ) पृथ्वीवरून दिसू शकत नाही. आता असे पहा की आधुनिक विज्ञानाने सांगितलेलेच तत्त्व महाभारतात महर्षी व्यासांनी सांगितले आहे. फक्त किती % भाग पृथ्वीवरून दिसतो हे त्यांनी सांगितलेले नाही. आधुनिक विज्ञानाशी संबंधित इतकी अचूक माहिती ज्यांनी लिहिली त्या वेदव्यास ऋषींच्या चरणी आपण नतमस्तक व्हावयास हवे. 


महाभारत शांति पर्व अध्याय १५ श्लोक २६ मध्ये सूक्ष्मजीवांचा उल्लेख केला आहे.


सूक्ष्मयोनीनि भूतानि तर्कगम्यानि कानिचित् |

पक्ष्मणोSपि निपातेन येषां स्यात् स्कन्धपर्ययः ||२६ ||


वरील श्लोकाचा अर्थ आपण पाहू. 


असे अनेक सूक्ष्मजीव आहेत की ज्यांना अनुमानाने जाणता येते. मानवाच्या पापण्या लवतात न लवतात तोच ते सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि पुन्हा निर्माण होतात.


सूक्ष्मजीव म्हणजे डोळ्यांना न दिसणारे जीव. फक्त आणि फक्त सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारेच त्यांचा अभ्यास करणे शक्य आहे. त्यांचे आयुष्य खूपच अल्प म्हणजे काही क्षण किंवा मिनिटांपुरतेच असते असे आधुनिक विज्ञान सांगते. आधुनिक उपकरणांच्या मदतीने हा अभ्यास करता येतो. आजच्या विज्ञानाने सूक्ष्मवांविषयी जी माहिती दिली आहे तेच महाभारतात सांगितले आहे. त्यावेळी सूक्ष्मदर्शक यंत्र अस्तित्वात नव्हते असे मानले तर इतके अचूक वर्णन व्यास महर्षींनी कसे केले असेल? शिल्पभृगुसंहिता ह्या ग्रंथात दुर्बिण कशी तयार करतात ह्याची माहिती आहे. त्याकाळी दुर्बीण कशी तयार करतात ह्याची माहिती होती तर कदाचित सूक्ष्मदर्शक यंत्राची माहिती असावी असे वाटते. सूक्ष्मजीवांसारख्या विषयाला सुद्धा व्यासांनी स्पर्श केला आह. म्हणूनच म्हणतात की *व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्*

आज इथेच थांबतो पुढच्या भागात अजून माहिती वाचूया. तोपर्यंत जयतु वेदविज्ञानम् 

Friday 20 January 2023

वेदविज्ञानरंजन - ४१: महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - १

वेदविज्ञानरंजन - ४१

महाभारतातील वैज्ञानिक संदर्भ भाग - १

बृहस्पती आणि मनू ह्यांच्यातील संवाद भीष्म पितामह यांनी धर्मराज युधिष्ठिर यांना सांगितला आहे. तो संवाद महर्षी व्यास यांनी महाभारतात लिहून ठेवला आहे आणि त्याचा उल्लेख अध्याय क्रमांक २०३  मध्ये आहे. त्यावरील विवेचन पाहू.
महाभारत शांति पर्व, मोक्षधर्म पर्व अध्याय २०३ मध्ये श्लोक क्र. १५ पासून  श्लोक क्र. २३ पर्यंत चंद्र, सूर्य आणि खगोलीय घटनांचा मन, शरीर आणि आत्म्याशी कसा संबंध आहे हे उत्तम प्रकारे वर्णन केले आहे. त्याचा अर्थ आपण पाहू.

यथा चन्द्रो ह्यमावस्यामलिङ्गत्वान्न दृश्यते |
न च नाशोsस्य भवति तथा विद्धि शरीरिणम् ||१५|
|

अमावास्या तिथीस चंद्र प्रकाशहीन झाल्यामुळे दिसत नाही, परंतु त्याचे अस्तित्व नष्ट होत नाही, चंद्र नाश पावत नाही. त्याचप्रमाणे आत्मा अदृश्य रुपात असला (दिसत नसला) तरी त्याचे अस्तित्व असते. हे मान्य करावेच लागेल.


क्षीणकोशो ह्यमावस्यां चन्द्रमा न प्रकाशते |
तद्वन्मूर्तिविमुक्तोsसौ शरीरी नोपलभ्यते ||१६||


अमावास्या तिथीला चंद्र आपल्या प्रकाश्य स्थानापासून दूर जातो, आकाशात दिसत नाही. त्याचप्रमाणे देहधारी आत्मा शरीरापासून दूर गेल्यावर दृष्टिगोचर होत नाही, डोळ्यांना दिसत नाही.

अमावास्येला चंद्र दिसत नाही परंतु, त्याचे अस्तित्व असते हा खगोलशास्त्रीय सिद्धांत आहे. (अमा - सह, एकत्र आणि वस \ वास - रहाणे ) = अमावास्या.  ह्या तिथीस सूर्य आणि चंद्र यांचे परस्पर सान्निध्य असते त्यामुळे अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही. सूर्याचन्द्रमसोर्यः परः सन्निकर्षः सामावास्या |. सूर्य आणि चंद्राच्या परम सान्निध्याला अमावास्या असे म्हणावे. हा खगोलीय सिद्धांत महाभारतकाळी आपणास ज्ञात होता.

यथाSSकाशान्तरं प्राप्य चन्द्रमा भ्राजते पुनः |
तद्वल्लिङ्गान्तरं प्राप्य शरीरी भ्राजते पुनः ||१७ ||


पुन्हा तोच चंद्रमा दुसरीकडे आकाशात प्रगट होतो आणि पुन्हा प्रकाशित होतो. अशाप्रकारे जीवात्मा दुसरे शरीर धारण करून पुन्हा प्रगट होतो.

ह्यात आत्मा अमर, अविनाशी असून एक देह सोडून दुसर्‍या देहात प्रवेश करतो असे म्हटले अरे. वरकरणी हा तत्त्वज्ञान देणारा श्लोक वाटत असला तरी तयार मोठे खगोलीय सत्य दडलेले आहे. ह्यात असे म्हटले आहे की चंद्रमा दुसर्‍या आकाशात प्रगट होतो.  म्हणजेच जेव्हा भारतात दिवस असतो तेव्हा अमेरीकेत रात्र असते किंवा इतर काही देशांमध्ये रात्रच असते. वास्तविक चंद्र हा मावळत नाही, उगवत नाही तो आहे तिथेच असतो. परंतु, पृथ्वीचा परिवरनामुळे (स्वतःभोवती फिरणे )  आपल्या दिवस, रात्र  आणि इतर खगोलीय घटना दिसतात
तसेच तो दुसर्‍या देशात उगवतो म्हणजे अमेरिकेसारखी पृथ्वीवरील देश, तिथे तो प्रकाशित असो. आता मला सांगा की  महाभारत हे आपल्या भारतात घडले असल्याने भारताच्या विरुद्ध बाजूकडील देशांच्या भौगोलिक परिस्थितीचेसुद्धा ज्ञान महाभारतकाळी होते त्यामुळेच इथे अचूक आणि योग्य वर्णन ऋषींनी केले होते.

जन्म वृद्धिः क्षयश्चास्य पारत्यक्षेणोपलभ्यते |
सा तु चान्द्रमसी वृत्तिर्न तु तस्य शरीरिणः ||१८ ||


आपल्याला चंद्राच्या ज्या विविध कला दिसतात ह्या चंद्रामुळे घडत नाहीत कारण चंद्र हा पूर्णच असतो. चंद्रकोरीपासून पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमा आणि उलट क्रिया म्हणजे अमावास्या ह्या पृथ्वीच्या गतीमुळे प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे जन्म हा शरीराचा होतो. आत्म्याचा नाही. कारण आत्मा अविनाशी आहे, अमर आहे. म्हणूनच मृतात्म्यास श्रद्धांजली असे कधीही म्हणू नये. मृताच्या आत्म्यास किंवा गतात्म्यास श्रद्धांजली असे म्हणावे.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.  इंग्रजी शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो.


Friday 13 January 2023

वेदविज्ञानरंजन - ४० : रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ८

 वेदविज्ञानरंजन - ४०

रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ६

माझ्या मागच्या लेखात #वेदविज्ञानरंजन_३९ जटायू हा पक्षी असावा का मानव असावा? ह्याची आपण माहिती घेतली. ह्या भागात आपण जटायूचा मोठा भाऊ संपाती ह्याची माहिती घेऊ. सीतेचा शोध करण्यासाठी वानरसेनेची एक तुकडी दक्षिण दिशेकडे आली असता तेथे त्यांना पंख जळालेल्या अवस्थेतील संपाती भेटला. तेथे त्याने वानरसेनेला स्वतःची कथा सांगितली. संपाती आणि निशांकर ऋषी ह्यांची भेट आणि त्यावेळचा वृत्तांत आपण पाहू. त्यावर संपाती निशांकर ऋषींना त्याचे आणि जटायूचे पंख कसे जळाले ह्याची कथा सांगतो. वाल्मिकी रामायण सर्ग क्र. ६१ मध्ये खालील श्लोक आहेत.

अप्यावां युगपत् प्राप्तौ अपश्याव महीतले ।

रथचक्रप्रमाणानि नगराणि पृथक् पृथक् ॥ ५ ॥


निश्चय करून आम्ही बरोबरच आकाशात जाऊन पोहोंचलो. तेथून पृथ्वीवरील भिन्न भिन्न नगरात आम्ही रथाच्या चाकां (प्रमाणे) एवढे दिसू लागलो.

तूर्णमुत्पत्य चाकाशं आदित्यपथमास्थितौ ।

आवामालोकयावस्तद् वनं शाद्वलसंस्थितम् ॥ ७ ॥

त्याहूनही उंच उडून आम्ही तात्काळ सूर्याच्या मार्गावर जाऊन पोहोचलो. तेथून खाली दृष्टि टाकून जेव्हा दोघांनी पाहिले तेव्हा येथील जंगले हिरव्यागार गवतासारखी दिसत होती. ॥७॥

उपलैरिव सञ्छन्ना दृश्यते भूः शिलोञ्चयैः ।

आपगाभिश्च संवीता सूत्रैरिव वसुंधरा ॥ ८ ॥

पर्वतांमुळे ही भूमी जणु हिच्यावर दगड, शीळा अंथरले गेले आहेत अशी भासत होती आणि नद्यांनी झाकलेली भूमी जणु त्यांना सुधाग्यांनी गुंडाळेले गेले आहे अशा प्रमाणे भासत होती. ॥८॥

सामान्यपणे गिधाडे जास्तीत जास्त २४,००० फुटांवरून उडतात.  मोठी मोठी नगरे रथांच्या चाकाप्रमाणे दिसणे, पर्वत छोट्या दगडांप्रमाणे दिसणे. मोठीमोठी जंगले छोट्या गवताप्रमाणे दिसणे, नद्या ह्या सुताइतक्या छोट्या दिसणे, तेव्हढ्या उंचीवरून शक्य नाही. त्यासाठी विमानासारख्या यंत्रात बसुन अधिक उंच जावे लागते विमाने साधारणपणे ३१,००० ते ३८,००० फुटांवरून उडतात.

तुल्यपृथ्वीप्रमाणेन भास्करः प्रतिभाति नौ ॥ १३ ॥

असेही संपाती सांगतो. ह्याचा अर्थ की ते दोघे उडत इतक्या उंचीवर गेले की तिथे सूर्य हा पृथ्वीसारखा दिसू लागला. आता सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्यात गोलाकार रचना हेच साम्य आहे. त्या दोघांना सूर्य आणा आणि पृथ्वी गोल दिसले असावेत ह्याचा अर्थ एखाद्या उडणाऱ्या यंत्रात बसून (Flying Machine ) किंवा space shuttle मध्ये बसुन ते दोघे अंतराळात गेले असावेत,कारण तेथूनच पृथ्वी आणि सूर्य सारखे दिसतात. जटायू आणि संपाती ह्यांच्याकडे असलेल्या विमानातून त्यांनी प्रवास केला होता असा येथे निष्कर्ष निघतो. ह्यावरून त्रेतायुगात सुद्धा विमाने होती आणि प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात होते असे आपण समजू शकतो. रामायणातील विमाने हा विषय घेऊन आपण पुन्हा कधीतरी भेटू. तूर्तास इथेच थांबतो.

Sunday 8 January 2023

वेदविज्ञानरंजन - ३९ - रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ७

 

वेदविज्ञानरंजन- ३९

रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ५

रामायणातील जटायू मानव होता?

रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर दुःखित झालेले प्रभू श्रीराम आपल्या भाऊ लक्ष्मण ह्यासह रानावनात सीतेचा शोध घेऊ लागले. त्यावेळी त्यांना तेथे जखमी अवस्थेत विव्हळणारा जटायू पक्षी? दिसला. रावण आकाशातून उडणाऱ्या रथातून (विमानातून) सीतेला घेऊन दक्षिण दिशेकडे गेला अशी माहिती जटायूने श्रीरामांना दिली आणि रक्त, मांस ओकत तो जटायू गतप्राण झाला. त्यानंतर रामाने त्याचे और्ध्वोदेहिक आणि पिंडदान केले असे वाल्मीकी रामायण अरण्यकांड सर्ग क्र ६८ मध्ये लिहिले आहे.

एवमुक्त्वा चितां दीप्तामारोप्य पतगेश्वरम् ।
ददाह रामो धर्मात्मा स्वबन्धुमिव दुःखितः ॥ ३१ ॥

असे म्हणून धर्मात्मा श्रीरामचंद्रांनी दुःखी होऊन पक्षिराजाच्या शरीरास चितेवर ठेवले आणि त्यास अग्नि देऊन आपल्या बंधुच्या संस्कारांप्रमाणेच त्यांचा दाहसंस्कार केला. ॥३१॥

रामोऽथ सहसौमित्रिर्वनं गत्वा स वीर्यवान् ।
स्थूलान् हत्वा महारोहीननुतस्तार तं द्विजम् ॥ ३२ ॥

रोहिमांसानि चोद्धृ्त्य पेशीकृत्य महायशाः ।
शकुनाय ददौ रामो रम्ये हरितशाद्वले ॥ ३३ ॥ 

त्यानंतर लक्ष्मणासहित पराक्रमी श्रीरामांनी वनात जाऊन मोठमोठे महारोही (कंदमूल विशेष) कापून आणले आणि त्यांना जटायुसाठी अर्पित करण्याच्या उद्देशाने पृथ्वीवर दर्भ (कुश) पसरले. महायशस्वी श्रीरामांनी रोहीचा गर काढून त्याचा पिंड बनविला आणि त्या सुंदर हरित कुशांच्यावर जटायुला पिण्डदान केले. ॥३२-३३॥

यत् यत् प्रेतस्य मर्त्यस्य कथयन्ति द्विजातयः ।
तत्स्वर्गगमनं पित्र्यं तस्य रामो जजाप ह ॥ ३४ ॥

ब्राह्मणलोक परलोकवासी मनुष्यास स्वर्गाची प्राप्ती करविण्याच्या उद्देश्याने ज्या पितृसंबंधी मंत्रांचा जप आवश्यक सांगतात, त्या सर्वांचा जप भगवान्‌ श्रीरामांनी केला. ॥३४॥

वरील सर्व लोकांचा अर्थ लक्षात घेता असे दिसून येते की प्रभू श्रीरामचद्रांनी जटायूचे अग्निसंस्कार केले, त्याचे पिंडदान केले, त्याला तिलांजली, जलांजली दिली आणि शुद्धीकरणासाठी गोदावरीत स्नान केले.*  ह्याचा अर्थ असा होतो की  जटायू हा पक्षी नसून मानव असावा.  मानवासाठी अंत्यसंस्कार आणि इतर विधी आपल्या धर्मशास्त्रांत सांगितले आहेत. एका पक्षासाठी प्रभू श्रीरामचंद्र अंत्येष्टी आणि त्यानंतर पिंडदान वगैरै करतील असे वाटत नाही. आपल्याकडे आदिवासी जमात विविध प्रकारचे चित्र विचित्र पोषाख परिधान करते. त्याप्रमाणे जटायूने गिधाडासारखा दिसणारा पोषाख परिधान केला असण्याची शक्यता आहे. पंख असलेल्या पोषाखाच्या सहाय्याने जटायूने रावणाशी युद्ध केले आणि त्यात रावणाने त्याचे पंख छाटून टाकल्याने तो जखमी होऊन मरण पावला. जटायू हा पक्षी नसून माणूस असावा ह्या विधानाला पुष्टी देणारे अजून काही श्लोक रामायणात आहेत. ते आपण पाहू.

किष्किंधा कांड सर्ग क्र. ६० मध्ये संपाती आणि जटायू यांच्या मनुष्यरूपाचा स्पष्ट उल्लेख आहे. संपाती हा जटायूचा मोठा भाऊ एका निशांकर ऋषींच्या आश्रमात येतो त्यावेळी निशांकर ऋषी संपातीला म्हणतात -

सौम्य वैकल्यतां दृष्ट्‍वा रोम्णां ते नावगम्यते ।
अग्निदग्धाविमौ पक्षौ प्राणाश्चापि शरीरके ॥ १८ ॥

ते म्हणाले- ’सौम्य ! तुमचे केस गळून गेले आहेत आणि दोन्ही पंख जळून गेले आहेत. याचे कारण कळून येत नाही. इतके असूनही तुझ्या शरीरात प्राण टिकून राहिले आहेत. ॥१८॥

गृध्रौ द्वौ दृष्टपूर्वौ मे मातरिश्वसमौ जवे ।
गृध्राणां चैव राजानौ भ्रातरौ कामरूपिणौ ॥ १९ ॥

मी पूर्वी वायुसमान वेगवान् दोन गृध्रांना (गिधाडांना) पाहिलेले आहे. ते दोघे परस्परांचे भाऊ आणि इच्छानुसार रूप धारण करणारे होते. त्याच बरोबर ते गृध्रांचे राजे ही होते. ॥१९॥

येथे संपाती आणि जटायू यांना इच्छेनुसार रूप बदलता येत असे. म्हणजेच त्यांनी जो *धाडासारखा पोषाख परिधान केला होता तो त्यांना बदलता  येणे शक्य होते.

ज्येष्ठोऽवितस्त्वं संपाते जटायुरनुजस्तव ।
*मानुषं रूपमास्थाय* गृह्णीतां चरणौ मम ॥ २० ॥

संपाति ! मी तुला ओळखले आहे. तू दोन्ही भावांमध्ये मोठा आहेस. जटायु तुझा लहान भाऊ होता. तुम्ही दोघे *मनुष्य रूप धारण करून माझा चरण-स्पर्श करीत होतात. ॥२०॥

येथे महर्षी वाल्मिकींनी स्पष्टपणे लिहिले आहे की संपाती आणि जटायू यांना मनुष्यरूप धारण करता येत होते कारण ते मनुष्यच होते. वाल्मीकी रामायणात जे सत्य आहे तेच लिहिले आहे आणि तेच मी तुम्हाला इथे सांगतोय. माझ्या स्वतःचे मी काहीही सांगत नाहिये. पुढील लेखांत जटायूविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. तूर्तास इथेच थांबतो.

टीप : वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून रामायणाचा अभ्यास करताना मी वरील मत मांडले आहे. माझ्या मताशी सगळेच सहमत असतील असेही नाही.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...