#वेदविज्ञानरंजन_१२ : पृथ्वी गोल आहे - भाग ४
मागील भागात आपण श्रीमद्भागवत पुराणातील पृथ्वी गोल आहे ह्याविषयीची माहिती पाहिली. आज आपण इतर ग्रंथातील माहिती पाहू.
पृथ्वी गोल आहे - भाग ४
वैदिक वाङ्मयातील जैमेनिय ब्राह्मण कांड १. २५४ ग्रंथात पृथ्वी गोलाकृती आहे असे लिहिलेले आहे.
स एष प्रजापतिः अग्निष्टोमः परिमण्डलो भूत्वा अनन्तो भूत्वा शये। तदनुकृतीदम् अपि अन्या देवताः परिमण्डलाः। परिमण्डल आदित्यः परिमण्डलः चन्द्रमाः, परिमण्डल आदित्यः, परिमण्डलः चन्द्रमाः, परिमण्डला द्यौः, परिमण्डलमन्तरिक्षम् परिमण्डला इयं पृथिवी |
परिमंडळ ह्याचा अर्थ सर्व बाजूंनी गोलाकार आच्छादन. परिमण्डला इयं पृथिवी असे स्पष्ट शब्दांत लिहिले आहे. पृथ्वीच्या सभोवार मंडलाकार वातावरण (Atmosphere) सुद्धा आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी त्यांच्या भावार्थदीपिका ह्या ग्रंथांत अध्याय १० ओवी २६० सांगितले सांगितले आहे की
पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा
तरी हा भूगोलचि काखे सुवावा
तैसा विस्तारू माझा पहावा
तरी जाणावे माते
ह्या ओवीचा अर्थ आपण पाहू :
पृथ्वीवरील परमाणूंचा झाडा घ्यावयाचा असेल , (पृथ्वीवरील परामाणूंची गणती करायची असेल तर.....) तर सर्व भूगोलच बगलेत मारला पाहिजे . त्याप्रमाणे माझा विस्तार किती आहे हे समजून घ्यायचे असेल तर मलाच जाणले पाहिजे. माऊली म्हणजे साक्षात परब्रह्म त्यांना तर सर्वच ज्ञात आहे. त्यांनी परमाणू आणि भूगोल असे शब्द लिहिले आहेत. म्हणजेच पृथ्वी गोल आहे आणि *परमाणूंची संकल्पना आपल्याला पाश्चात्यांनी शिकवायच्या आधीच ज्ञात होती असे सिद्ध होते.
प्राचीन भूगर्भशास्त्र ग्रंथात खालील श्लोक आहे
मृदम्ब्वग्न्यनिलाकाशपिण्डोऽयं पाञ्चभौतिकः ।
कपित्थफलवद्वृत्तः सर्वकेन्द्रेखिलाश्रयः ॥
स्थिरः परेशशक्त्येव सर्वगोळादधः स्थितः ।
मध्ये समन्तादण्डस्य *भूगोलो* व्योम्नि तिष्ठति
ह्याचा अर्थ पाहू :
मृद्(जमीन, भूमी ), अम्बु म्हणजे ( पाणी ), अग्नि (अग्नी ), अनिल (वायू ), आकाश (आकाश ) ह्या पाच महाभूतांपासून म्हणजे तत्वांपासून ही पृथ्वी तयार झाली आहे. कपित्थफलवद्वृत्तः म्हणजे कवठाच्या फळाप्रमाणे (वृत्त) गोल आहे. सर्वकेन्द्रेखिलाश्रयः म्हणजे पृथ्वीच्या केंद्राच्या आश्रयाने राहतात. म्हणजेच पृथ्वीचे केंद्र सर्वाना आपल्याकडे आकर्षून घेते. ह्याचा अर्थ पृथ्वीला गुरुत्वाकर्षण शक्ति आहे.
स्थिरः परेशशक्त्येव सर्वगोळादधः स्थितः परेशाच्या म्हणजे परमेश्वराच्या म्हणजे सूर्याच्या शक्तीमुळे सर्व गोल म्हणजे सर्व ग्रह स्थिर आहेत म्हणजे सूर्याच्या आकर्षण शक्तीने बांधून ठेवले आहेत
मध्ये समन्तादण्डस्य भूगोलो व्योम्नि तिष्ठति म्हणजे अण्डस्य समन्तात् भूगोल व्योम्नि मध्ये तिष्ठति. सर्व बाजूंनी जे अण्ड म्हणजे ब्रह्मांड आहे त्यात हा भूगोल म्हणजे ही पृथ्वी आहे. येथे पृथ्वी गोल आहे, ती ब्रह्मांडात आहे, तिच्यात गुरुत्व शक्ति आहे होता ह्या सर्व सिद्धांताचा अर्थबोध होतो.
पृथ्वी गोल आहे ह्या माझ्या एकूण ४ लेखांमध्ये विविध दाखले देऊन मी हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की पृथ्वी गोल आहे हे आमच्याच ऋषींनी शोधून काढले आहे. तर मग, पृथ्वी गोल आहे हे आपण पाश्चात्य शास्त्रज्ञांकडून का शिकावे ? अजून किती दिवस आपण परकीयांचे लांगूलचालन करीत बसणार आहोत? धडधडीत पुरावे समोर दिसत असून सुद्धा पाठ्यपुस्तकांत ही सर्व उदाहरणे का नाहीत? प्रत्येक वेळी परदेशी शास्त्रज्ञांनी सांगितले की आम्हाला का समजते? आपलेच भारतीय विद्वान, शास्त्रज्ञ आपली अस्मिता, स्वाभिमान हरवून बसले आहेत का? माझ्यासारखा एक साधा माणूस थोडा अभ्यास करून ही उदाहरणे शोधून काढू शकतो तर आपल्याकडील विद्वान, शास्त्रज्ञ मंडळी ह्यावर निश्चित अधिक संशोधन करू शकतात असे मला वाटते.
🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩
No comments:
Post a Comment