माझा परिचय

Friday 31 March 2023

वेदविज्ञानरंजन_५०: श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ५

 

#वेदविज्ञानरंजन_५०

*टीप : प्रस्तुत लेख लेखकाच्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावा.*

🌺 *श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ५* 🌺

आधुनिक विज्ञानाच्या मदतीने आपण गर्भातील बाळाच्या वेगवेगळ्या अवस्था पाहू शकतो. परंतु अंदाजे इ.स.पू.५००० वर्षे आधी लिहिलेल्या श्रीमद्भागवत ह्या ग्रंथात गर्भातील बाळाच्या वेगवेगळ्या अवस्था वर्णन केल्या आहेत. अर्थात आधुनिक विज्ञानाने वर्णन केलेल्या अवस्था आणि श्रीमद्भागवत ग्रंथातील अवस्था ह्यांत थोडीफार तफावत आहे. महर्षी व्यास आणि शुकमुनी हे प्रसूतीतज्ज्ञ नव्हते तरीही त्यांनी गर्भातील बाळाच्या वेगवेगळ्या अवस्थांचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना खरोखर साष्टांग नमस्कार.

श्रीमद्भागवत स्कंध ३ अध्याय ३१

🚩
कर्मणा दैवनेत्रेण जन्तुर्देहोपपत्तये ।
स्त्रियाः प्रविष्ट उदरं पुंसो रेतःकणाश्रयः ॥ १ ॥
🚩

श्रीभगवान म्हणतात - जीव मनुष्यशरीरात जन्म घेण्यासाठी भगवंतांच्या प्रेरणेने आपल्या *पूर्वकर्मांनुसार पुरुषाच्या वीर्यकणाच्या आश्रयाने स्त्रीच्या उदरात प्रवेश करतो.*

🚩
कललं त्वेकरात्रेण पञ्चरात्रेण बुद्‍बुदम् ।
दशाहेन तु कर्कन्धूः पेश्यण्डं वा ततः परम् ॥ २ ॥
🚩

तेथे वीर्यकण एका रात्रीत स्त्रीच्या रजामध्ये मिसळून एकरूप बनतो. *पाच रात्रीत बुडबुडयासारखा होतो. दहा दिवसात बोरासारखा थोडासा कठीण होतो*. आणि त्यानंतर मांसपेशी किंवा अंडज प्राण्यांमधील अंडयाच्या रूपात त्याचे रूपांतर होते.

🚩
मासेन तु शिरो द्वाभ्यां बाह्वङ्घ्र्याद्यङ्गविग्रहः ।
नखलोमास्थिचर्माणि लिङ्गच्छिद्रोद् भवस्त्रिभिः ॥ ३ ॥
🚩

*एक महिन्यात त्याला डोके उत्पन्न होते, दोन महिन्यात हात, पाय इत्यादी अवयव तयार होतात आणि तीन महिन्यात नखे, रोम, हाडे, चामडे, उत्सर्जक इंद्रिये तसेच अन्य छिद्रे उत्पन्न होतात*.

🚩
चतुर्भिर्धातवः सप्त पञ्चभिः क्षुत्तृडुद्‍भवः ।
षड्भिर्जरायुणा वीतः कुक्षौ भ्राम्यति दक्षिणे ॥ ४ ॥
🚩

*चार महिन्यात त्यात मांसादी सात धातू उत्पन्न होतात. पाचव्या महिन्यात तहान-भूक लागू लागते आणि सहाव्या महिन्यात पापुद्रयाने लपेटला जाऊन तो उजव्या कुशीत फिरू लागतो*.

🚩
मातुर्जग्धान्नपानाद्यैः एधद् धातुरसम्मते ।
शेते विण्मूत्रयोर्गर्ते स जन्तुर्जन्तुसम्भवे ॥ ५ ॥
🚩

त्यावेळी *मातेने खाल्लेल्या अन्नपाणी इत्यादीपासून त्याच्या शरीरातील सर्व धातू पुष्ट* होऊ लागतात आणि तो कृमिकीटकांचे उत्पत्तिस्थान असलेल्या निकृष्ट मलमूत्राच्या खड्डयात पडून राहातो.

🚩
कृमिभिः क्षतसर्वाङ्गः सौकुमार्यात्प्रतिक्षणम् ।
मूर्च्छां आप्नोति उरुक्लेशः तत्रत्यैः क्षुधितैर्मुहुः ॥ ६ ॥
🚩

तो कोमल असतो, म्हणून जेव्हा तेथील भूक लागलेले किडे त्याच्या अंगप्रत्यंगाला टोचे मारू लागतात, तेव्हा अत्यंत क्लेश होऊन तो क्षणोक्षणी मूर्च्छित होतो.

🚩
कटुतीक्ष्णोष्णलवण रूक्षाम्लादिभिरुल्बणैः ।
मातृभुक्तैरुपस्पृष्टः सर्वाङ्गोत्थितवेदनः ॥ ७ ॥
🚩

*मातेने खाल्लेल्या कडवट, तिखट, गरम, खारट, कोरडे, आंबट इत्यादी उग्र पदार्थांच्या स्पर्शाने त्याच्या सर्व शरीराला पीडा होऊ लागते.*

🚩
उल्बेन संवृतस्तस्मिन् अन्त्रैश्च बहिरावृतः ।
आस्ते कृत्वा शिरः कुक्षौ भुग्नपृष्ठशिरोधरः ॥ ८ ॥
🚩

तो जीव मातेच्या *गर्भाशयात पापुद्रयाने झाकलेला आणि आंतडयांनी वेढलेला* असतो. त्याचे डोके पोटाकडे आणि पाठ व मान गोलाकार झालेली असते.

🚩
अकल्पः स्वाङ्गचेष्टायां शकुन्त इव पञ्जरे ।
तत्र लब्धस्मृतिर्दैवात् कर्म जन्मशतोद्‍भवम् ।
स्मरन् दीर्घमनुच्छ्वासं शर्म किं नाम विन्दते ॥ ९ ॥
🚩

पिंजर्‍यात बंद असलेल्या पक्ष्याप्रमाणे तो पराधीन आणि अवयवांची हालचाल करण्यास असमर्थ असतो. यावेळी अदृष्टामुळे त्याला *स्मरणशक्ती प्राप्त होते. तेव्हा आपली शेकडो जन्मातील कर्मे आठवून तो बेचैन होतो. श्वास कोंडलेल्या अवस्थेत त्याला कसली शांती मिळणार ?*

🚩
आरभ्य सप्तमान् मासात् लब्धबोधोऽपि वेपितः ।
नैकत्रास्ते सूतिवातैः विष्ठाभूरिव सोदरः ॥ १० ॥
🚩

*सातवा महिना सुरू झाल्यानंतर त्याच्यात ज्ञानशक्तीचा उगम* होतो, परंतु प्रसूतिवायूच्या हालचालीमुळे तो त्या पोटात उत्पन्न झालेल्या विष्ठेतील किडयांप्रमाणे एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. तो सतत हालचाल करतो.

🚩
एवं कृतमतिर्गर्भे दशमास्यः स्तुवन्नृषिः ।
सद्यः क्षिपत्यवाचीनं प्रसूत्यै सूतिमारुतः ॥ २२ ॥
🚩

तो दहा महिन्यांचा जीव गर्भातच जेव्हा अशा प्रकारे विवेकसंपन्न होऊन भगवंतांची स्तुती करतो, तेव्हा त्या *अधोमुख बालकाला प्रसूतीचे कारण वायू तत्काळ बाहेर येण्यासाठी ढकलून देतो.*

🚩
तेनावसृष्टः सहसा कृत्वावाक् शिर आतुरः ।
विनिष्क्रामति कृच्छ्रेण निरुच्छ्वासो हतस्मृतिः ॥ २३ ॥
🚩

त्याच्या ताबडतोब ढकलण्याने ते बालक अत्यंत व्याकूळ होऊन *खाली डोके करून मोठया कष्टाने बाहेर येते. त्यावेळी त्याची श्वासाची गती थांबते आणि त्याची पूर्वस्मृती नष्ट होते*.

🚩
पतितो भुव्यसृङ्‌मूत्रे विष्ठाभूरिव चेष्टते ।
रोरूयति गते ज्ञाने विपरीतां गतिं गतः ॥ २४ ॥
🚩

मातेच्या रक्त आणि मूत्रात जमिनीवर पडलेले ते बालक विष्ठेतील किडयाप्रमाणे तडफडते. त्याचे गर्भवासाच्या वेळचे सर्व ज्ञान नष्ट होते आणि ते देहाभिमानरूप अज्ञान-दशा प्राप्त होऊन वारंवार जोरजोराने रडू लागते.

असे म्हणतात की गर्भातील बालकाला सोSहं चे ज्ञान असते आणि बाहेर येताना स्मृती नष्ट होते त्यामुळे तो कोSहं असे विचारत राहतो. प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज ह्यांनी त्यांच्या दत्तमहात्म्य ह्या ग्रंथातील अकराव्या अध्यायात ह्याचे छान वर्णन केले आहे. जिज्ञासूंनी तो अध्याय अवश्य वाचावा.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण







Saturday 18 March 2023

वेदविज्ञानरंजन_४९ - श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ४

 

#वेदविज्ञानरंजन_४९

*टीप : प्रस्तुत लेख लेखकाच्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावा.*

🌺 *श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ४* 🌺

*जगातील सर्वांत पहिला सरोगेट गर्भ कोणता?*

आधुनिक विज्ञानाने मान्य केलेली *सरोगेट मदर ही संकल्पना हजारो वर्षांपूर्वी श्रीमद्भागवत ग्रंथात मांडली आहे.*  सरोगेट मदर ह्याचा अर्थ *एका मातेच्या उदरात तयार झालेला जीव, गर्भ दुसर्‍या मातेच्या उदरात ठेवून त्याद्वारे त्याची प्रसूती करणे.*
सरोगसी म्हणजे एक स्त्री आणि दुसरे जोडपे किंवा एकल पालक (सिंगल पॅरेन्ट) यांच्यातील करार होय. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सरोगसी म्हणजे 'सरोगेट गर्भ'. जेव्हा पती-पत्नी मुलाला जन्म देऊ शकत नाहीत (किंवा जन्म देऊ इच्छित नाहीत) तेव्हा दुसऱ्या स्त्रिच्या पोटातून मुलाला जन्म देण्यास सरोगसी म्हणतात. *ज्या स्त्रिच्या गर्भाला मूल जन्माला घालण्यासाठी भाड्याने घेतले जाते, तिला सरोगेट मदर असे म्हणतात*

वासुदेव आणि देवकी ह्यांना कंसाने कारागृहात ठेवले होते. देवकीच्या पुत्राकडून आपले मरण आहे ह्याची कंसाला कल्पना होती त्यामुळे देवकी प्रसूत झाली की त्या बाळाला कंस अतिशय निर्दयतेने ठार मारीत असे. कंसाने देवकीची सहा मुले मारली. आता सातव्या वेळी देवकी गर्भवती राहिली.
🚩
सप्तमो वैष्णवं धाम यं अनन्तं प्रचक्षते ।
गर्भो बभूव देवक्या हर्षशोकविवर्धनः ॥ ५ ॥
🚩

तेव्हा देवकीच्या *सातव्या गर्भात भगवंतांचे अंशस्वरूप श्रीशेष, ज्यांना अनंत असेही म्हणतात, ते आले.* त्यामुळे देवकीला स्वाभाविकच आनंद झाला, पण कंस कदाचित यालाही मारील, या भितीने दुःखही झाले.

🚩
भगवान् अपि विश्वात्मा विदित्वा कंसजं भयम् ।
यदूनां निजनाथानां योगमायां समादिशत् ॥ ६ ॥
🚩
यादव कंसामुळे त्रस्त झाले आहेत असे पाहून विश्वात्मा *भगवंतांनी योगमायेला आज्ञा केली.*

🚩
गच्छ देवि व्रजं भद्रे गोपगोभिः अलंकृतम् ।
रोहिणी वसुदेवस्य भार्याऽऽस्ते नन्दगोकुले ।
अन्याश्च कंससंविग्ना विवरेषु वसन्ति हि ॥ ७ ॥
🚩

देवी ! कल्याणी ! *तू गोकुळात जा*. गवळी आणि गायी यांनी तो प्रदेश सुशोभित झाला आहे. तेथे नंदांच्या गोकुळात *वसुदेवांची पत्‍नी रोहिणी राहात आहे.* त्यांच्या इतर पत्‍न्याही कंसाच्या भितीने गुप्त जागी रहात आहेत.
🚩
देवक्या जठरे गर्भं शेषाख्यं धाम मामकम् ।
तत् संनिकृष्य रोहिण्या उदरे सन्निवेशय ॥ ८ ॥
🚩
सध्या माझा *शेष नावाचा अंश देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिला आहे. त्याला तेथून काढून तू रोहिणीच्या पोटात नेऊन ठेव.* इथे वरवर पाहता ही एक कविकल्पना किंवा अशक्य गोष्ट वाटते. आपलेच हिंदू लोक ह्या गोष्टीची टिंगल करताना मी ऐकले आहे. कसे काय शक्य आहे बुवा? असा गर्भ एका गर्भाशयातून दुसर्‍या गर्भाशयात नेऊन ठेवता येतो का? आपल्या पुराणांत काहीही वाट्टेल ते लिहिले असते असे ऐकू येते. पण आता आधुनिक विज्ञाने सिद्ध केले आहे की असे करता येते. त्यामुळे आत्ता जर ही गोष्ट शक्य आहे तर द्वापारयुगात योगमायेने हे काम उत्तमरीत्या पार पाडले होते. देवकीच्या गर्भातून काढून म्हणजे त्याचे संकर्षण करून रोहिणीच्या गर्भात स्थापन केला म्हणून बलरामास *संकर्षण* असे म्हणतात.

🚩
सन्दिष्टैवं भगवता तथेत्योमिति तद्वचः ।
प्रतिगृह्य परिक्रम्य गां गता तत् तथाकरोत् ॥ १४ ॥
🚩
जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा केली, तेव्हा योगमायेने *जशी आपली आज्ञा* असे म्हणून त्यांचे म्हणणे शिरोधार्य मानले आणि त्यांना प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर आली आणि भगवंतांनी जसे सांगितले तसे तिने केले. येथे योगमाया म्हणजे आजच्या भाषेत प्रसूतीतज्ज्ञ स्त्री होय. धर्मग्रंथांतील कथांचे वैज्ञानिक पद्धतीने अर्थ लावल्यास आपल्याला अनेक गोष्टी समजू शकतात.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

Saturday 11 March 2023

वेदविज्ञानरंजन - ४८:श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ३

 

#वेदविज्ञानरंजन_४८


*श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ३*

          *डायनॉसोर - अजस्र प्राणी*

पृथ्वीवर डायनॉसोर सारखे अजस्र प्राणी काही लाख वर्षांपूर्वी वावरत होते असे आधुनिक विज्ञान सांगते. भूगर्भ शास्त्रज्ञांनी जमिनीखाली दडलेले डायनॉसोर सारख्या प्राण्यांचे सांगाडे शोधून काढून त्यांचे विविध प्रकार आणि त्यांची कालनिश्चिती केली आहे. परंतु, *डायनॉसोर सारखे अजस्र प्राणी प्रत्यक्ष पाहिल्याची नोंद* पाश्चिमात्य देशांनी केलेली नाही. जगातील सर्वात श्रेष्ठ असलेल्या आपल्या *सनातन धर्मात श्रीमद्भागवत स्कंध १० अध्याय ६४* मध्ये असा प्राणी पाहिल्याचा उल्लेख आहे.

🚩
एकदोपवनं राजन् जग्मुर्यदुकुमारकाः ।
विहर्तुं साम्बप्रद्युम्न चारुभानुगदादयः ॥ १ ॥
🚩
श्रीशुकदेव सांगतात -
श्रीशुक म्हणातात- परीक्षिता ! एके दिवशी सांब, प्रद्युम्न, चारुभानू, गद इत्यादी यदुवंशी राजकुमार फिरण्यासाठी उपवनात गेले.

🚩
क्रीडित्वा सुचिरं तत्र विचिन्वन्तः पिपासिताः ।
जलं निरुदके कूपे ददृशुः सत्त्वमद्‌भुतम् ॥ २ ॥
🚩

तेथे पुष्कळा वेळापर्यंत खेळ खेळल्याने त्यांना तहान लागली. तेव्हा ते इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागले. त्यांना एका पाणी नसलेल्या विहिरीत *एक विचित्र प्राणी* दिसला. त्याला विचित्र प्राणी म्हंटले आहे कारण असा प्राणी त्यांनी ह्याआधी कधीच पाहिला नव्हता.

🚩
कृकलासं गिरिनिभं वीक्ष्य विस्मितमानसाः ।
तस्य चोद्धरणे यत्‍नं चक्रुस्ते कृपयान्विताः ॥ ३ ॥
🚩

तो प्राणी म्हणजे *पर्वताच्या आकाराचा एक सरडा* होता. त्याला पाहून ते *आश्चर्यचकित* झाले. त्यांना त्याची दया येऊन ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्‍न करू लागले. *डायनॉसोर म्हणजे प्रचंड आकाराचा सरड्यासारखा दिसणारा प्राणी होता हे जीवाश्म पुराव्यांवरून आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे.* Hollywood मध्ये Jurassic Park नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी होता आणि त्यावेळी तो खूप गाजला होता. परंतु, *कोणत्याही पाश्चिमात्य देशांतील ग्रंथात डायनॉसोर सारख्या प्राण्याला प्रत्यक्ष पाहिल्याचा उल्लेख नाही. परंतु, तो श्रीमद्भागवत पुराणांतील स्कंधात आहे.*

🚩
चर्मजैस्तान्तवैः पाशैः बद्ध्वा पतितमर्भकाः ।
नाशक्नुवन् समुद्धर्तुं कृष्णायाचख्युरुत्सुकाः ॥ ४ ॥
🚩
परंतु ती मुले जेव्हा त्या विहिरीत पडलेल्या सरड्याला कातडी दोराने बांधूनही बाहेर काढू शकले नाहीत, तेव्हा कुतूहलाने जाऊन त्यांनी ती गोष्ट श्रीकृष्णांना सांगितली.

🚩
तत्रागत्यारविन्दाक्षो भगवान् विश्वभावनः ।
वीक्ष्योज्जहार वामेन तं करेण स लीलया ॥ ५ ||
🚩
जगाचे जीवनदाते कमलनयन भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीपाशी आले. त्या सरड्याला पाहून आपल्या *डाव्या हाताने सहज त्यांनी त्याला बाहेर काढले*. येथे श्रीकृष्णाच्या शक्तीची कल्पना आपल्याला येते. एकतर त्यांनी डाव्या हाताने खेचून त्याला बाहेर काढले असावे किंवा डाव्या हातात पकडून त्याला उचलून बाहेर काढले असावे. काहीही जरी असले तरी पर्वताच्या आकाराएव्हढ्या अजस्र प्राण्याला बाहेर काढायचे असेल तर श्रीकृष्णाचा डावा हात तेव्हढाच शक्तिशाली आणि मोठा असला पाहिजे. ह्यावरून असा तर्क करता येतो की पर्वताच्या आकाराच्या सरड्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णाने विराट रूप घेतले असावे. त्यामुळे त्यांनी त्या सरड्याला सहज, अलगद बाहेर काढले. महाभारत युद्धात अर्जुनाला श्रीकृष्णाने विराट रूप दाखवले होते. त्याचप्रमाणे ह्यावेळी सुद्धा विराट रूप घेतले असावे असे वाटते.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

Wednesday 1 March 2023

वेदविज्ञानरंजन - ४७ : श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - २

 

#वेदविज्ञानरंजन_४७

*टीप : प्रस्तुत लेख लेखकाच्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावा.*

🌺 *श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग -  २

आजच्या लेखात आपण *समय यात्रा म्हणजेच time travel* ह्या आधुनिक *वैज्ञानिक सिद्धांताची माहिती* घेणार आहोत. श्रीमद्भागवत ग्रंथातील
स्कंध ९ अध्याय ३ मध्ये खालील श्लोक दिले आहेत. त्याचा आपण अभ्यास करूया.
🚩
तस्य पुत्रशतं जज्ञे ककुद्मि ज्येष्ठमुत्तमम् ।
ककुद्मी रेवतीं कन्यां स्वामादाय विभुं गतः ॥ २९ ॥
🚩
सत्ययुगात *काकुद्मी नावाचा राजा* होता. त्याची *कन्या रेवती अतिशय सुंदर आणि सदाचारसंपन्न* होती. काकुद्मी राजाने तिच्यासाठी *योग्य वरसंशोधन* सुरू केले. परंतु, संपूर्ण पृथ्वीवर कन्या रेवतीसाठी *सुयोग्य वर न मिळाल्याने तो चिंतातुर* झाला.
🚩
कन्यावरं परिप्रष्टुं ब्रह्मलोकमपावृतम् ।
आवर्तमाने गान्धर्वे स्थितोऽलब्धक्षणः क्षणम् ॥ ३० ॥
🚩
आपल्या मुलीचे नशीब लिहिणाऱ्या ब्रह्म देवालाच विचारावे ह्या उद्देशाने *काकुद्मी आपली कन्या रेवती हिच्यासह अतिवेगाने ब्रह्मलोकी गेला* आणि ब्रह्मदेवासमोर उभा राहिला. त्यावेळी ब्रह्मदेवासमोर *गंधर्वांचे गायन चालू असल्याने काकुद्मीला थोडा वेळ तिथे थांबावे लागले.*
🚩
तदन्त आद्यमानम्य स्वाभिप्रायं न्यवेदयत् ।
तच्छ्रुत्वा भगवान् ब्रह्मा प्रहस्य तमुवाच ह ॥ ३१ ॥
🚩
त्यानंतर काकुद्मीने ब्रह्मदेवाला त्याचे येण्याचे प्रयोजन सांगितले आणि *पृथ्वीवरील कोणता वर रेवतीसाठी योग्य आहे?* अशी विचारणा केली.
🚩
अहो राजन् निरुद्धास्ते कालेन हृदि ये कृताः ।
तत्पुत्रपौत्रनप्तॄणां गोत्राणि च न शृण्महे ॥ ३२ ॥
🚩
त्यावेळी ब्रह्मदेव त्याला म्हणाला, हे राजन्! तुझ्या रेवतीसाठी मी ज्या वराला योजले होते तो *वर काळगतीत नष्ट झाला आहे. त्याचा वंश, नातलग आणि गोत्रसुद्धा कालौघात संपले आहे. आता तर सत्तावीस चतुर्युगे संपून द्वापारयुग चालू झाले आहे.*
🚩
कालोऽभियातस्त्रिणवचतुर्युगविकल्पितः ।
तद् गच्छ देवदेवांशो बलदेवो महाबलः ॥ ३३ ॥
🚩
देवादिधेव परमेश्वराचा अंश असलेल्या *बलरामाने आता पृथ्वीवर अवतार* घेतला आहे.
🚩
कन्यारत्‍नमिदं राजन् नररत्‍नाय देहि भोः ।
भुवो भारावताराय भगवान् भूतभावनः ॥ ३४ ॥
🚩
पृथ्वीवरील सज्जनांचा भार हलका करण्यासाठी त्याने अवतार घेतला असून तो *श्रीकृष्णांचा मोठा भाऊ आहे. त्याला तू तुझी कन्या दे.*
🚩
अवतीर्णो निजांशेन पुण्यश्रवणकीर्तनः ।
इत्यादिष्टोऽभिवन्द्याजं नृपः स्वपुरमागतः ।
त्यक्तं पुण्यजनत्रासाद्‍ भ्रातृभिर्दिक्ष्ववस्थितैः ॥ ३५ ॥
🚩
सुतां दत्त्वानवद्याङ्‌गीं बलाय बलशालिने ।
बदर्याख्यं गतो राजा तप्तुं नारायणाश्रमम् ॥ ३६ ॥
🚩
ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाची आज्ञा घेऊन *काकुद्मी रेवतीसह पृथ्वीवर आला तर त्याला सर्वच गोष्टी बदललेल्या दिसल्या आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलो आहोत असे त्याला वाटले.* त्यानंतर त्याने पुष्कळ शोध घेऊन  *बलरामाशी रेवतीचा विवाह लावून दिला*. त्यानंतर तपश्चर्या करण्यासाठी काकुद्मी बद्रिनारायणास निघून गेला.

वरवर पाहता ही एक *अतिरंजित कथा वाटत असली तरी ती एक सत्य घटना आहे* आणि त्यात खूप मोठा वैज्ञानिक सिद्धांत आहे. त्याचे विवेचन आपण पाहू.

*राजा काकुद्मी आणि रेवती दोघेही पृथ्वीवरून दुसऱ्या लोकात म्हणजे ब्रह्मलोकांत* गेले. ह्याचा अर्थ *विमान किंवा अंतराळयान ह्या सारख्या वाहनांत बसून त्यांनी प्रवास केला असणार. रामायण, महाभारत कालखंडात प्रगत विमाने अस्तित्वात होती ह्याचे अनेक लिखित पुरावे आहेत.*  ब्रह्मलोकात म्हणजे एखाद्या ग्रहावर काकुद्मी आणि रेवती *अंतराळ यानात बसून* गेल्याची शक्यता आहे.

H. G. Wells ह्या परदेशी व्यक्तीने The Time Machine नावाची कादंबरी इ. स. १८९५ मध्ये लिहिली होती. *सुमारास आईन्स्टाईन ह्यांनी सुद्धा time travel and theory of relativity असा सिद्धांत मांडला.* त्यांच्या सिद्धांतानुसार *एखाद्या व्यक्तीने जर अतिवेगाने, प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तर तेथे काळ थांबतो.* त्याला time contraction असे म्हणतात. प्रकाशाच्या वेगाने प्रवास करण्यासाठी अतिप्रचंड उर्जेची गरज असते. ह्या त्याच्या सिद्धांताला अनेक *शास्त्रज्ञांनी मान्यता* दिली आणि त्यावर इंग्रजी भाषेत चित्रपट सुद्धा निघाले. आता हा *सिद्धांत आईन्स्टाईन ह्या परदेशी शास्त्रज्ञाने सांगितल्यावर आपण त्याचा उदो उदो केला.* पण हीच गोष्ट *रूपकात्मक पद्धतीने आपल्याच श्रीमद्भागवत ग्रंथात लिहिली आहे हे आपणास माहिती नाही*. काकुद्मी आणि रेवती *दोघांनीही प्रकाशाच्या वेगाने, अतिवेगाने प्रवास केला असणार त्यामुळे त्या दोघांसाठी काळ थांबला.* परंतु, बाकीच्या जगासाठी मात्र काळ पुढे गेला असल्याने *सत्तावीस चतुर्युगांचे चक्र संपले* असे समजते. आधुनिक विज्ञानाने मांडलेल्या अनेक *सिद्धांताचा पाया, त्यांचे मूळ आपल्याच सनातन धर्मातील ग्रंथांत आहे असे आपल्या लक्षात येईल.*

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...