वेदविज्ञानरंजन - १० : पृथ्वी गोल आहे - भाग २
ह्या भागात श्रीमद्भागवत पुराणांतील ह्या संबंधीचे वर्णन पाहू.
पृथ्वी गोल आहे - भाग २
श्रीमद्भागवत पुराण स्कंद ५ - अध्याय १६ (भुवनकोशवर्णनम् ) - श्लोक १, श्लोक ४ आणि श्लोक ५ मध्ये पृथ्वी गोल आहे असे ठाम मत व्यक्त केले आहे.
श्लोक : १
उक्तस्त्वया *भूमण्डलायामविशेषो* यावदा-
दित्यस्तपति यत्र चासौ ज्योतिषां गणैश्चन्द्रमा वा
सहदृश्यते ॥ १ ॥
ह्याचा अन्वयार्थ पाहू :
यावत् आदित्यः तपति च यत्र असौ चन्द्रमाः ज्योतिषां गणैः सह वा दृश्यते भूमण्डलायामविशेषः त्वया उक्तः|
ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :
जितक्या दूरपर्यंत सूर्य प्रकाशतो आणि जेथे हा चंद्र नक्षत्रांच्या समूहांसह दिसतो भूमंडळाच्या लांबीरुंदीचा विशिष्ट विस्तार तुझ्याकडून सांगितला गेला. ॥१॥
श्लोक :४
न वै महाराज भगवतो मायागुणविभूतेः काष्ठां
मनसा वचसा वाधिगन्तुमलं विबुधायुषापि
पुरुषस्तस्मात्प्राधान्येनैव भूगोलकविशेषं
नामरूपमानलक्षणतो व्याख्यास्यामः ॥ ४ ॥
ह्याचा अन्वयार्थ पाहू :
महाराज पुरुषः भगवतः मायागुणविभूतेः काष्ठां मनसा वा वचसा वै अधिगन्तुं विबुधायुषा अपि न अलं तस्मात् प्राधान्येन एव भूगोलकविशेषं नामरूपमानलक्षणतः व्याख्यास्यामः |
ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :
हे परीक्षित राजा! पुरुष परमेश्वराच्या मायेच्या गुणांच्या सामर्थ्याच्या अंताला मनाने किंवा वाणीने खरोखर जाणण्यास देवांच्या आयुष्याइतक्या काळानेहि समर्थ नाही तरीहि मुख्य मुख्य गोष्टी घेऊनच भूमंडलाचे ( भूगोलकविशेषम् ) विशेष वर्णन नावे, स्वरूपे, प्रमाण व लक्षणे ह्यांच्या योगाने आम्ही सांगतो. ॥४॥
श्लोक :५
यो वायं द्वीपः कुवलयकमलकोशाभ्यन्तरकोशो
नियुतयोजनविशालः समवर्तुलो यथा पुष्करपत्रम् ॥ ५ ॥
ह्याचा अन्वयार्थ पाहू :
यः वा अयं द्वीपः कुवलयकोशाभ्यन्तरकोशः नियुतयोजनविशालः यथा पुष्करपत्रं समवर्तुलः ||५ ||
ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :
जे खरोखर हे द्वीप भूमंडळरूपी कमळाच्या आतील गाभ्याच्या घेरातील एक घेरच असे एक लक्ष योजने विस्ताराचे कमळाच्या पानाप्रमाणे सारखे वेटोळे ॥५॥
येथे भूगोल, समवर्तुळ असे शब्द योजले आहेत. त्यावरून पृथ्वी गोल होती हे त्याकाळी निश्चित ज्ञात होते हे लक्षात येते. पुढचा मुद्दा असा की त्या काळात एव्हढे प्रचंड ज्ञान कसे मिळविले? एक म्हणजे वेदकालीन विमानांमध्ये बसून (अंतराळात जाऊन ) त्यांनी पृथ्वीचे अवलोकन केले असणार किंवा योगबळाने हे सर्व ज्ञान ऋषींना प्राप्त झाले असणार. काहीतरी एक विधान मान्य करावेच लागेल. पृथ्वी गोल आहे ही केवळ कल्पना नाही किंवा ऋषींचा वेळ जात नव्हता म्हणून काहीतरी लिहिले असावे असे मानणे हे चुकीचे आहे. ह्याच स्कंधातील पुढील श्लोकांत पृथ्वीवरील सात खंड, सात समुद्र ह्यांची अगदी लांबीरूंदीसहित माहिती दिलेली आहे. जिज्ञासूंनी मूळ श्रीमद्भागवत आवर्जून वाचावे.
श्रीमद्भागवत पुराणातील अजून एक उदाहरण पाहू :
स्कंद ५ - अध्याय २५ (श्रीसंकर्षण देवांचे विवरण आणि स्तुती ) (भूविवरविध्युपवर्णनम्) - श्लोक १ मध्ये पृथ्वीच्या भूगर्भातील आकर्षण शक्ती म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती यांचे रुपकात्मक वर्णन केले आहे. त्याकाळी सृष्टीतील तत्त्वांना देवतांची रूपके देण्याची पद्धत होती. खालील श्लोकात संकर्षण देवता म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती हिचे वर्णन आढळते.
श्लोक :१
तस्य मूलदेशे त्रिंशद्योजनसहस्रान्तरआस्ते या
वै कला भगवतस्तामसी समाख्याताऽनन्त इति
सात्वतीया द्रष्ट्टदृश्ययोःसङ्कर्षणमहमित्यभिमान-
लक्षणं यं सङ्कर्षणमित्याचक्षते ॥ १ ॥
ह्याचा अन्वयार्थ पाहू :
तस्य मूलदेशे त्रिंशद्योजनसहस्रान्तरे भगवतः या वै तामसी कला आस्ते सा अनंतः इति समाख्याता सात्वतीयाः यं संकर्षणं अहं इति अभिमानलक्षणं संकर्षणं इति आचक्षते |
ह्याचा मराठी भाषेत अर्थ पाहू :
त्या पाताळाच्या मूलप्रदेशी तीस योजने अंतरावर परमेश्वराची जी खरोखर तमोगुणी कला आहे, ती अनंत अशा नावाने प्रसिद्ध आहे, सात्विक तंत्रमार्गे जाणारे भगवद्भक्त ज्या अनंताला आकर्षण करणारा असा आहे, ‘मी आहे’ असा अभिमान आहे लक्षण ज्याचे असा संकर्षण असे म्हणतात. ॥१॥
इथे ऋषी सांगतात की पाताळाच्या खाली दूरवर पृथ्वीचा केंद्रबिंदू आहे तिथे जी शक्ती आहे (तामसी कला ) ती पृथ्वीवरील वस्तूंचे संकर्षण करते म्हणजेच त्यांना आकर्षून घेते.
आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १० मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही. माझी सर्व आचार्यांना विनंती आहे की भागवत सप्ताहात श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत. आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.
🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩
No comments:
Post a Comment