माझा परिचय

Wednesday 7 December 2022

वेदविज्ञानरंजन लेख

 

बापरे! वेद, उपनिषदे यांचा विषय? नको रे बाबा! आपल्याला काही कळायचे नाही त्यातले आणि त्याच्याशी काही देणेघेणे पण नाही... अशी वाक्ये आजकाल बर्‍याच ठिकाणी ऐकू येतात. आता असे ऐकल्यावर फार दुःख होते मनाला. आपले भारतीय नागरिक जर असे बोलू लागले तर कसे होणार? वेद, उपनिषदे यांविषयी एव्हढी अनास्था आणि भीती का?

हीच भीती आणि अनास्था कमी करण्यासाठी वेदविज्ञान दर्शन हा लेखन प्रपंच केला आहे. सामान्यतः अशी समजूत आहे की, वेद, उपनिषदे म्हणजे देव देव करणे, भक्ती करणे होय. परंतु, ही समजूत चुकीची आहे. माणसाने कसे जगावे, कसे असावे ह्याची शिकवण वेद देतात. अत्यंत उत्तम असे विज्ञान, त्यामागील रहस्य त्यांत सूत्रबद्धतेने गुंफली आहेत. वर वर पाहता एखादा श्लोक किंवा सूत्र हे ईश्वराविषयी प्रेम व्यक्त करणारे दिसते परंतु त्या श्लोकातील अक्षरांना विशिष्ट संख्या मानून जर गणित मांडले तर एखादे वैज्ञानिक रहस्य उलगडते, गणितातील एखादे सूत्र तयार होते. आपल्या प्राचीन ऋषींचे, वैज्ञानिकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्या काळी कुठलीही अत्याधुनिक साधने उपलब्ध नसताना ही सर्व वैज्ञानिक रहस्ये मांडली आहेत. त्यातील काही रहस्ये अशी आहेत की अजून आधुनिक विज्ञान तिथपर्यंत पोहोचू शकले नाही जगातील सर्वात प्राचीन ही हिंदू संस्कृती असल्याने साहाजिकच भारतात वैज्ञानिक रहस्यांची मुळे आहेत. ह्या लेख मालिकेद्वारे त्यातील काही रहस्यांचा शोध घेऊन त्याची उकल करण्याचा, श्लोकांचे, सूत्रांचे अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. वेदविज्ञानाचा ठाव घेणे म्हणजे महासागरातील मोती वेचण्यासारखे आहे. ते मोती वेचण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यात माझा खारीचा वाटा.

आता कोणी म्हणेल की एव्हढे जर प्रगत ज्ञान होते ते गेले कुठे? ह्याचे उत्तर असे की त्या काळी मौखिक परंपरा असल्याने त्यातील काही ज्ञान पुसले गेले. भारतावर आजपर्यंत अनेक आक्रमणे झाली. त्यामुळे हे सर्व ज्ञान काळाच्या पडद्याआड गेले आणी त्याची विस्मृती झाली. आपण ह्या लेखमालिकेद्वारे त्या वेदविज्ञानाची गोडी थोडीशी चाखण्याचा प्रयत्न करूया. ह्या लेखमालिकेत निश्चितच काही त्रुटी असतील त्यासाठी मला मोठ्या मनाने माफ करा. शेवटी समर्थ रामदास स्वामींच्या एका श्लोकाचा आधार घेतो :

 जे जे आपणांस ठावे | ते ते इतरांसी सांगावे |
शहाणे करुन सोडावे | सकळ जन ||

           जयतु वेदविज्ञानम् 

© वैभव दातार, कल्याण

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...