माझा परिचय

Monday 26 December 2022

वेदविज्ञानरंजन - ३८ : रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ६

 वेदविज्ञानरंजन_३८

रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ६

प्रभू श्रीरामचंद्र आणि लंकाधिपती रावण यांच्या युद्धात कुंभकर्ण ह्या अतिप्रचंड राक्षसाचा उल्लेख आला आहे. सहा महिने झोप घेतल्यावर कुंभकर्णाला राक्षससेनेने महत्प्रयासाने जागे केले आणि ते प्रचंड धूड रणांगणावर उभे ठाकले. त्या अवाढव्य आणि अजस्र राक्षसाला पाहून वानरसेना घाबरून पळू लागली. ते पाहून प्रभू श्रीरामचंद्र यांनी बिभिषणाला विचारले की हा राक्षस कोण आहे?

आचक्ष्व सुमहान् कोऽसौ रक्षो वा यदि वासुरः।

न मयैवंविधं भूतं दृष्टपूर्वं कदाचन ॥ ७ ॥

विभीषणा ! सांग बरे ! हा इतक्या मोठ्‍या शरीरयष्टीचा कोण पुरुष आहे ? कोणी राक्षस आहे अथवा असुर आहे ? मी पूर्वी अशा प्राण्याला कधी पाहिलेले नाही. ॥७॥

लंकेत यायच्या आधी श्रीरामांनी ताटिका, खर, दूषण, मारिच अशा अनेक राक्षसांना कंठस्नान घातले होते. त्यामुळे राक्षस कसे असतात, कसे दिसतात हे त्यांना पक्के ठाऊक होते. इथे मात्र कुंभकर्णाला पाहून श्रीराम म्हणतात की मी ह्याच्या आधी असा राक्षस कुठेच पाहिला नाही. इतर राक्षसांपेक्षा हा काहीतरी वेगळाच दिसतोच. हा यंत्रमानव असल्याने तो इतर राक्षसांपेक्षा निश्चित वेगळा दिसत असावा. 

उच्यन्तां वानराः सर्वे यंत्रमेतत् समुच्छ्रितम् ।

इति विज्ञाय हरयो भविष्यन्तीह निर्भयाः ॥ ३३ ॥

सर्व वानरांना हे सांगितले जावे की, ही कुणी व्यक्ती नाही; माया द्वारा निर्मित उंच यंत्रमात्र आहे. असे कळल्यावर वानर निर्भय होऊन जातील. ॥३३॥

प्रक्षिप्ताः कुम्भकर्णेन वक्त्रे पातालसंनिभे |

नासापुटाभ्यां निर्जग्मुः कर्णाभ्याम् चैव वानरा: ||

ह्या कुंभकर्णाचे तोंड म्हणजे जणू काही पाताळातील प्रचंड मोठे विवर असावे असे भासत होते. वानरसेना त्याच्या तोंडातून आत जाऊन नाकातून बाहेर येत होती. आता पहा सजीव प्राण्याच्या तोंडातून आत जाऊन नाकातून बाहेर येणे शक्य आहे का? त्यामुळे कुंभकर्ण हा यंत्रमानव असावा ह्याची शक्यता बळावते. 

वरील श्लोक बिभीषण श्रीरामांना उद्देशून म्हणतो. ह्यात बिभिषण सांगतो की हे प्रभो! ह्या प्रचंड धूडाला पाहून जे वानर भयभीत होऊन पळत आहेत त्यांना आपण सांगावे की कुंभकर्ण ही कोणीही व्यक्ती नाही. तर मायेद्वारा निर्माण करण्यात आलेले यंत्र आहे. हे कळल्यावर वानर घाबरणार नाहीत. येथे बिभीषण स्वतःच म्हणतोय की अतिप्रचंड विस्तार असलेला हा कुंभकर्ण म्हणजे एक यंत्र आहे. ज्यांच्याकडे रामायण आहे त्यांनी प्रस्तुत श्लोक आणि त्याचा अर्थ रामायणात नक्की वाचा. मी इथे माझ्या स्वतःचे वेगळे असे काही लिहीत नाहिये. असे जर असेल तर यंत्रमानव (Robot ) तयार करण्याचे आजच्यापेक्षा प्रगत तंत्र त्रेतायुगातील रावणाला अवगत होते. 

आता तुम्ही म्हणाल की कुंभकर्णाचे लग्न झाले होते. मग तो यंत्रमानव कसा? कुंभकर्णाच्या पत्नीचे नाव वज्रमाला होते तसेच त्यास मुलेदेखील होती. हनुमंताने युद्धात त्याच्या मुलांचा वध केला. हा जो काही अतिप्रचंड असा यंत्रमानव होता त्याच्या आत बसून कुंभकर्ण तो यंत्रमानव चालवित असावा. त्यामुळे त्या यंत्रमानवालासुद्धा कुंभकर्ण असेच नाव प्राप्त झाले असावे असे वाटते. 

युद्धासाठी उपयुक्त अशी सर्व यंत्रसामग्री रावणाकडे होती. विविध प्रकारचे अग्निबाण (Missiles ), युद्धात वापरली जाणारी अत्याधुनिक विमाने (Fighter planes ) रावणाचा मुलगा मेघनाद ह्यांच्याकडे होती आणि उत्तम प्रकारचे सर्व सोयींनी युक्त असे पुष्पक विमान रावणाकडे होते. अशा प्रकारची सुसज्ज यंत्रसामग्री असणार्‍या रावणाकडे यंत्रमानव असणे सहज शक्य आहे. 

टीप : वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून रामायणाचा अभ्यास करताना मी वरील मत मांडले आहे. माझ्या मताशी सगळेच सहमत असतील असेही नाही.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...