माझा परिचय

Sunday 25 December 2022

वेदविज्ञानरंजन - ३५ - रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ३

 #वेदविज्ञानरंजन_३५

रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ३

जनकनंदिनी सीतेच्या शोधार्थ वानरसेनेला वानरराज सुग्रीव यांनी चारही दिशांना पाठवले आणि पृथ्वीच्या भौगोलिक प्रदेशांचे वर्णन केले होते ह्याची माहिती आपण घेतली. त्यावेळी श्रीरामांनी सुग्रीवाला विचारले की तुला सर्व भौगोलिक प्रदेशांची माहिती कशी काय मिळाली? त्यावर सुग्रीव म्हणाले की वाली माझा पाठलाग करीत होता तेव्हा मी संपूर्ण पृथ्वी फिरलो. त्यासंबंधीचे श्लोक पाहू.

किष्किंधा कांड सर्ग ४६, श्लोक १

गतेषु वानरेंद्रेषु रामः सुग्रीवमब्रवीत् ।

कथं भवान् विजानीते सर्वं वै मण्डलं भुवः ॥ १ ॥ 

ते समस्त वानरयूथपती निघून गेल्यावर श्रीराम सुग्रीवाला विचारतात, " हे सख्या!  तू समस्त भूमंडलातील स्थानांचा परिचय कसा जाणतोस?" 

ह्या इथे भूमंडल असा शब्द श्रीरामांनी योजला आहे म्हणजे पृथ्वी चपटी नसून गोल होती हे रामायणकाळी ज्ञात होते. 

किष्किंधा कांड सर्ग ४६, श्लोक १२, १३

ततोऽहं वालिना तेन सोऽनुबद्धः प्रधावितः ।

नदीश्च विविधाः पश्यन् वनानि नगराणि च ॥ १२ ॥

आदर्शतलसंकाशा ततो वै पृथिवी मया ।

अलातचक्रप्रतिमा दृष्टा गोष्पदवत् कृता ॥ १३ ॥

वाली माझ्या मागे लागला होता आणि मी जोरजोराने पळून चाललो होतो. त्यावेळी मी वेगवेगळ्या नद्या, वने आणा देश पाहत संपूर्ण पृथ्वी गाईच्या खुराप्रमाणे समजून तिची परिक्रमा केली. पळून जाताना मला ही पृथ्वी दर्पण आणि अलातचक्राप्रमाणे दिसली.

दर्पण म्हणजे आरशासारखी पृथ्वी दिसली असे वर्णन आहे म्हणजे पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात जलसाठे तीन चतुर्थांश पाणी असल्याने आणि त्रेतायुगात ते पाणी आरशासारखे स्वच्छ आल्याने त्यात प्रतिबिंब दिसत असावे. त्यामुळे सुग्रीवाने आरशाची उपमा योजिली असावी. तसेच सुग्रीवाला ही पृथ्वी अलातचक्राप्रमाणे दिसली असेही वर्णन केले आहे. अलातचक्र म्हणजे एखादे जळत असलेले लाकूड गोलाकार फिरविले तर जसे अग्नीचे तेजस्वी वर्तुळ दिसते तसे चक्र होय. उदबत्ती हातात धरून आपण गोलाकार फिरविली तर एक तेजस्वी वर्तुळ आपल्याला दिसते. त्याप्रमाणे सुग्रीवाला संपूर्ण पृथ्वी गोलाकार भासली. म्हणजेच पृथ्वी गोल आहे ह्याचे वर्णन रामायणात केले आहे.

किष्किंधा कांड सर्ग ४६, श्लोक  २४

एवं मया तदा राजन् प्रत्यक्षमुपलक्षितम् ।

पृथिवीमण्डलं सर्वं गुहामस्यागतस्तः ॥ २४ ॥ 

वानरराज सुग्रीव म्हणतो, " हे प्रभो! अशा प्रकारे मी त्या दिवसांत समस्त भूमंडलास प्रत्यक्ष पाहिले होते त्यानंतर ऋष्यमूक पर्वतांतील गुहेत मी आलो.

पृथ्वी गोल आहे ह्याचा प्रत्यक्ष पुरावा ( आँखो देखा हाल ) सुग्रीव याने दिला आहे. असे असताना अजून कुठला पुरावा आवश्यक आहे?

संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचे श्रेय Ferdinand Magellan (September 1591) ह्याला दिलेले आहे. वास्तविक पाहता त्याचे श्रेय वानरराज सुग्रीव यांना मिळायला हवे कारण संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा \ परिक्रमा केल्याचे वर्णन आणि त्याचा स्पष्ट पुरावा रामायणात आहे.

रामायणातील प्रवचनांमध्ये फक्त रामकथा सांगितली जाते. त्यातील विज्ञान सांगितले जात नाही त्यामुळे रामायणातील वैज्ञानिक संदर्भ प्रकाशात येत नाहीत ही आपली शोकांतिका आहे.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...