माझा परिचय

Wednesday 21 December 2022

वेदविज्ञानरंजन - १६ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग ४

 वेदविज्ञानरंजन_३६ : पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग ४

पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे आणि सूर्याभोवती फिरणे, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ति, पृथ्वीवरील अक्षवृत्ते, रेखावृत्ते यांची संकल्पना इत्यादी विविध विषयांवर आपले वेद, पुराणे आणि ऋषींनी लिहिलेले ग्रंथ ह्यांच्यातील उदाहरणे गेल्या ३ भागांत आपण पाहिली. आजच्या भागात अजून काही उदाहरणे आपण पाहणार आहोत आणि पृथ्वीचे परिवलन - परिभ्रमण  ह्या विषयावरील शेवटचा भाग आहे

 पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण - भाग ४

अथर्ववेदात म्हटले आहे की पृथ्वी सूर्यापासून निर्माण झाली. खालील मंत्रात हे स्पष्टपणे लिहिले आहे. 

अथर्ववेद १८.३.२५ ते १८.३.३५ - 

बाहुच्युता पृथिवी द्यामिवोपरि |

आपण बरेचदा पदच्युत असा शब्द वाचतो म्हणजे पदावरून पडलेला, ढळलेला. येथे बाहू म्हणजे हात आणि च्युत म्हणजे पडणे, ढळणे. बाहुच्युता म्हणजे हातातून पडलेली, ढळलेली

हातातून पडलेली, निर्माण झालेली पृथ्वी कोणाच्या हातातून? सूर्याच्या हातातून. वेदकालीन वाङ्मयात निसर्गातील, विश्वातील शक्तींना देवता मानून त्या पद्धतीने लिखाण केले आहे त्यामुळे सूर्यास देव मानून म्हणजे ज्याला हात,पाय असे अवयव आहेत असे समजून त्याच्या हातातून पृथ्वी निर्माण झाली आहे असे म्हणावयाचे आहे. आधुनिक विज्ञान सुद्धा हेच सांगते की पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्यापासून निर्माण झाले आहेत.

 पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण ह्या संदर्भात खालील मंत्र आहे. 

अथर्ववेद १२.१.३७

याप सर्पं विजमाना विमृग्वरी यस्यामासन्नग्रयो ये अप्सवन्त :|

परा दस्यून् ददती देवपीयूनिन्द्रं वृणाना पृथिवी न वृत्रम् ||

येथे विजमाना अपसर्प - जी हलत डुलत चालते ती पृथ्वी असा अर्थ आहे. म्हणजे पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते ह्याचे स्पष्ट उदाहरण ह्यातून मिळते. 

खालील मंत्रात पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र यांचे चक्र सुरु राहते असे सांगितले आहे. 

ऋग्वेद ६.९.१

अहश्च कृष्णमहरर्जुनं च विवर्तते रजसी वेद्याभिः |

कृष्णं अह: कृष्ण वर्णाची रात्र, च अर्जुनं च अहः शुक्ल वर्णाचा दिन रजसी वेद्याभिः विवर्तेते, आपल्या योजनेनुसार वारंवार संचार* करतात म्हणजे चक्राकार होतात. दिवस, रात्र यांचे चक्र अव्याहत सुरू आहे.

आत्तापर्यंत बर्‍याच लेखांमध्ये आपण सूर्य, ग्रह, तारे, पृथ्वी यांची वर्णने वाचली. आधुनिक विज्ञानाने जे सिद्धांत अगदी अलीकडे मांडले आहेत त्याच्या कितीतरी आधी हजारो वर्षे आपल्या वेदांनी हे सिद्धांत मांडले आहेत हे आपण सप्रमाण सिद्ध केले आहे आता एक प्रश्न उरतो की ह्या सर्व ग्रहांचे, तार्‍यांचे इतके अचूक निरीक्षण कसे केले असेल??  ह्याची उत्तरे 3 प्रकारे देता येतील.

पहिला प्रकार म्हणजे योगसाधनेच्या बळावर सूक्ष्मरूपाने नश्वर देहाबाहेर येऊन मनोवेगाने त्या ठिकाणी जाऊन, माहिती घेऊन पुन्हा देहात प्रवेश करणे.  हे फक्त आणि फक्त यौगिक क्रियांच्या माध्यामातून शक्य आहे. आधुनिक विज्ञानाने आजपर्यंत ह्यावर विशेष संशोधन केलेले नाही. परंतु ह्याचा अर्थ ही पद्धत अस्तित्त्वातच नाही असे म्हणणे चुकीचे आहे.

दुसरे उत्तर म्हणजे प्रत्यक्ष अंतराळ प्रवास (space travel ) करून ग्रह, तारे ह्यासंदर्भात माहिती मिळविली असण्याची शक्यता आहे. वेदकाळी अंतराळयाने अस्तित्वात होती आणि त्याद्वारे प्रवास शक्य होता ह्याची अनेक उदाहरणे आहेत. ह्याची माहिती मी माझ्या ह्या लेखमालिकेअंतर्गत पुढे कधीतरी नक्कीच देईन.

तिसरे उत्तर म्हणजे उत्तम प्रकारच्या दुर्बिणींच्या मदतीने ग्रह, तारे यांचे निरीक्षण करणे शक्य आहे. पुरातन काळी दुर्बिणी अस्तित्वात होत्या आणि त्या कशा प्रकारे तयार करायच्या ह्याचे ज्ञान होते हे खालील श्लोकांतून समजते

मनो: वाक्यं समाधाय तेन शिल्पीन्द्रः शाश्वत:|

यन्त्रं चकार सहसा दृष्ट्यर्थ्यं दूरदर्शनम्||

पलल-अग्नौ दग्धमृदां कृत्वा काचम् अनश्वरं|

शोधयित्वा तु शिल्पीन्द्रो निर्मलीक्रियया च सः||

चकार बलवत् स्वच्छं पातनं सूपविष्कृतम्|

वंशपर्व-समाकारं धातुदण्डप्रकल्पितम्|

तत् -पश्याद्-अग्र-मध्येषु मुकुरं च विवेश सः|

येथे शिल्पीन्द्र म्हणजे कारागीर, इंजिनिअर यांना उद्देशून म्हटले आहे की

यन्त्रं चकार सहसा दृष्ट्यर्थ्यं दूरदर्शनम् |

दूरचे पाहण्यासाठी (दूरदर्शनम् ) एखादे यंत्र तयार करावे.

पलल-अग्नौ दग्धमृदां कृत्वा काचम् अनश्वरं

म्हणजे अग्नी आणि वाळू (मृदा ) यांच्या पासून काच तयार करावीत जी न फुटणारी असेल.

शोधयित्वा तु शिल्पीन्द्रो निर्मलीक्रियया च सः |

त्यावर कारागिरीने योग्य ती प्रक्रिया करावी आणी काच तयार करावी.

चकार बलवत् स्वच्छं पातनं सूपविष्कृतम् |

येथे सूपविष्कृतम् ह्याचा अर्थ ओतकाम असा घ्यावा कारण काच तयार व्हायच्या आधी ती द्रवरूपात असते.

वंशपर्व-समाकारं धातुदण्डप्रकल्पितम्|

तत् -पश्याद्-अग्र-मध्येषु मुकुरं च विवेश सः|

एक धातूचा दंड घ्यावा म्हणजे नळी घ्यावी. त्या नळीच्या सुरुवातीच्या टोकाला, मध्यभागी आणि शेवटच्या टोकाला आतील बाजूने काच, भिंग (मुकुरं ) बसवावे म्हणजे दूरची वस्तू स्पष्टपणे पाहता येईल.  अशाप्रकारे दुर्बीण तयार करावी.

आपल्या पूर्वसुरींनी अनेकविध प्रकारचे ज्ञान ग्रंथांत लिहून ठेवले आहे. परंतु, ते संस्कृत भाषेत असल्याने आपल्याला समजत नाही. माझी नवीन पिढीला, शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जशा परदेशी भाषा शिकतो, त्याचप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग असलेली संस्कृत भाषा आवर्जून शिका तर आणि तरच नवीन ज्ञानाची दालने आपल्याला उघडणे शक्य आहे.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...