माझा परिचय

Thursday 22 December 2022

वेदविज्ञानरंजन - १७ : ध्वनीशास्त्र भाग - १

वेदविज्ञानरंजन - १७ : ध्वनीशास्त्र भाग - १

आज आपण ध्वनीशास्त्र समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या नाभीतून ध्वनी निर्माण होऊन आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात. ह्या सर्व प्रक्रियेचे शास्त्रोक्त विवेचन आपल्या  पुरातन ग्रंथांत विद्वानांनी केले आहे. ह्याची माहिती पाहू.

ऋग्वेद मंडल १ - सूक्त क्र १६४ - मंत्र ४५ मध्ये वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणे :

च॒त्वारि॒ वाक्परि॑मिता प॒दानि॒ तानि॑ विदुर्ब्राह्म॒णा ये म॑नी॒षिणः॑ ॥

गुहा॒ त्रीणि॒ निहि॑ता॒ नेङ्ग्॑यन्ति तु॒रीयं॑ वा॒चो म॑नु॒ष्या वदन्ति ||

वाचेचे चार प्रकार गणले आहेत, ते सर्व प्रकार जे ज्ञानसंपन्न ब्राह्मण (येथे ब्राह्मण म्हणजे जातीवाचक शब्द नसून ज्ञानी असा अर्थ आहे) आहेत त्यांना ठाऊक असतात. कारण पहिले तीन प्रकार गुप्त आहेत, ते समजण्यांत येत नाहींत, व मनुष्यें बोलतात तो चौथा प्रकार होय

आता ह्याचे सविस्तर विवेचन पाहू :

आता हे वाणीचे चार प्रकार कोणते? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार आहेत.


परा वाणी म्हणजे आपल्या नाभीतून उगम पावलेला ध्वनी. पश्यंती वाणी म्हणजे त्या ध्वनीचा शरीरातील वायूबरोबर झालेला संयोग आणि त्यातून निर्माण झालेली वाणी, मध्यमा वाणी म्हणजे गळ्यातील स्वरयंत्रातून उत्पन्न झालेली वाणी. हे तीन प्रकार आपल्या शरीराच्या आत घडतात त्यामुळे ते लक्षात येत नाहीत.  त्यानंतर जीभ, दात यांच्या मदतीने जी बोलण्याची क्रिया होते, जे शब्द कानी पडतात, तुम्ही आम्ही सर्वजण जे ऐकतो ती वैखरी वाणी होय. ही वैखरी वाणी आपण अनुभवू शकतो आणि ध्वनीमापक यंत्राने मोजता येऊ शकते.

पाणिनी (अंदाजे इ. स. पू. ७०० वर्षे ) हे एक महान व्याकरणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेच्या व्याकरणाचे नियम तयार केले. त्यांनी *शब्द आणि नाद*  ह्यांच्या उत्पत्तीसंदर्भात अतिशय उत्तम विवेचन केले आहे. 

आकाश वायु शरीरात् वक्त्रमुपैति नादः

स्थानान्तरेषु प्रविभाज्यमानो वर्णत्वं आगच्छति यः सः शब्दः ||

आपले शरीर हे पंचमहाभूतांनी तयार झालेले आहे. आकाश म्हणजे आपल्या शरीरातील पोकळी वायू म्हणजे आपल्या शरीरातील वायू म्हणजे श्वास आणि उच्छ्वास. जेव्हा ह्यांचा संयोग होतो तेव्हा नाद  तयार होतो. जेव्हा ह्या नादाचे स्थानांतरण होते म्हणजेच स्वरयंत्रातून तो नाद मुखात येतो त्यावेळी त्याचे शब्द तयार होतात आणि मुखावाटे बाहेर पडतात.

नाद, शब्द हे मनोरंजनासाठी उपयुक्त आहेतच पण त्यापुढे जाऊन आपल्याला आत्मरंजनाकडे जावयाचे आहे. म्हणूनच योग साधनेत प्रवीण असलेल्या ऋषीमुनींना ध्यानावस्थेत अनाहत नाद ऐकू येत असे. 

नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपञ्चवारम्।

उद्धर्तुकामः सनकादिसिद्धान् एतद्विमर्शे शिवसूत्रजालम् ॥

तांडवनृत्य समाप्त करण्याच्या वेळी नटराजाने म्हणजेच शिवाने सनकादि ऋषी यांची सिद्धी आणि कामना यांच्या पूर्ततेसाठी (ननाद ढक्कां नवपञ्चवारम् ) नऊ आण आणि पाच वेळा आपला डमरू वाजवला.  अशाप्रकारे चौदा वेळा डमरू वाजल्यामुळे  शिवसूत्रांचे जाळे म्हणजे (वर्णमाला) प्रगट झाली. 

ही वर्णमाला खालीलप्रमाणे :

१.अइउण् २. ऋलूक्, ३. एओङ्, ४. ऐऔच् ५. हयवरट् ६. लण् ७. अमङणनम् ८. झभञ् ९. घढधष् १०. जबगडदश् ११. खफछठथ चटतव १२. कपय् १३. शषसर् १४. हल्

ह्याचा अजून एक अर्थ असू शकतो. आपले शरीर म्हणजे डमरू आणि श्वासोच्छ्वास म्हणजे डमरूच्या दोन दोऱ्या. त्यांच्या सहाय्याने आपल्या शरीरात ध्वनीची निर्मिती होते. 

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...