वेदविज्ञानरंजन- ३९
रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ५
रामायणातील जटायू मानव होता?
रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर दुःखित झालेले प्रभू श्रीराम आपल्या भाऊ लक्ष्मण ह्यासह रानावनात सीतेचा शोध घेऊ लागले. त्यावेळी त्यांना तेथे जखमी अवस्थेत विव्हळणारा जटायू पक्षी? दिसला. रावण आकाशातून उडणाऱ्या रथातून (विमानातून) सीतेला घेऊन दक्षिण दिशेकडे गेला अशी माहिती जटायूने श्रीरामांना दिली आणि रक्त, मांस ओकत तो जटायू गतप्राण झाला. त्यानंतर रामाने त्याचे और्ध्वोदेहिक आणि पिंडदान केले असे वाल्मीकी रामायण अरण्यकांड सर्ग क्र ६८ मध्ये लिहिले आहे.
एवमुक्त्वा चितां दीप्तामारोप्य पतगेश्वरम् ।
ददाह रामो धर्मात्मा स्वबन्धुमिव दुःखितः ॥ ३१ ॥
असे म्हणून धर्मात्मा श्रीरामचंद्रांनी दुःखी होऊन पक्षिराजाच्या शरीरास चितेवर ठेवले आणि त्यास अग्नि देऊन आपल्या बंधुच्या संस्कारांप्रमाणेच त्यांचा दाहसंस्कार केला. ॥३१॥
रामोऽथ सहसौमित्रिर्वनं गत्वा स वीर्यवान् ।
स्थूलान् हत्वा महारोहीननुतस्तार तं द्विजम् ॥ ३२ ॥
रोहिमांसानि चोद्धृ्त्य पेशीकृत्य महायशाः ।
शकुनाय ददौ रामो रम्ये हरितशाद्वले ॥ ३३ ॥
त्यानंतर लक्ष्मणासहित पराक्रमी श्रीरामांनी वनात जाऊन मोठमोठे महारोही (कंदमूल विशेष) कापून आणले आणि त्यांना जटायुसाठी अर्पित करण्याच्या उद्देशाने पृथ्वीवर दर्भ (कुश) पसरले. महायशस्वी श्रीरामांनी रोहीचा गर काढून त्याचा पिंड बनविला आणि त्या सुंदर हरित कुशांच्यावर जटायुला पिण्डदान केले. ॥३२-३३॥
यत् यत् प्रेतस्य मर्त्यस्य कथयन्ति द्विजातयः ।
तत्स्वर्गगमनं पित्र्यं तस्य रामो जजाप ह ॥ ३४ ॥
ब्राह्मणलोक परलोकवासी मनुष्यास स्वर्गाची प्राप्ती करविण्याच्या उद्देश्याने ज्या पितृसंबंधी मंत्रांचा जप आवश्यक सांगतात, त्या सर्वांचा जप भगवान् श्रीरामांनी केला. ॥३४॥
वरील सर्व लोकांचा अर्थ लक्षात घेता असे दिसून येते की प्रभू श्रीरामचद्रांनी जटायूचे अग्निसंस्कार केले, त्याचे पिंडदान केले, त्याला तिलांजली, जलांजली दिली आणि शुद्धीकरणासाठी गोदावरीत स्नान केले.* ह्याचा अर्थ असा होतो की जटायू हा पक्षी नसून मानव असावा. मानवासाठी अंत्यसंस्कार आणि इतर विधी आपल्या धर्मशास्त्रांत सांगितले आहेत. एका पक्षासाठी प्रभू श्रीरामचंद्र अंत्येष्टी आणि त्यानंतर पिंडदान वगैरै करतील असे वाटत नाही. आपल्याकडे आदिवासी जमात विविध प्रकारचे चित्र विचित्र पोषाख परिधान करते. त्याप्रमाणे जटायूने गिधाडासारखा दिसणारा पोषाख परिधान केला असण्याची शक्यता आहे. पंख असलेल्या पोषाखाच्या सहाय्याने जटायूने रावणाशी युद्ध केले आणि त्यात रावणाने त्याचे पंख छाटून टाकल्याने तो जखमी होऊन मरण पावला. जटायू हा पक्षी नसून माणूस असावा ह्या विधानाला पुष्टी देणारे अजून काही श्लोक रामायणात आहेत. ते आपण पाहू.
किष्किंधा कांड सर्ग क्र. ६० मध्ये संपाती आणि जटायू यांच्या मनुष्यरूपाचा स्पष्ट उल्लेख आहे. संपाती हा जटायूचा मोठा भाऊ एका निशांकर ऋषींच्या आश्रमात येतो त्यावेळी निशांकर ऋषी संपातीला म्हणतात -
सौम्य वैकल्यतां दृष्ट्वा रोम्णां ते नावगम्यते ।
अग्निदग्धाविमौ पक्षौ प्राणाश्चापि शरीरके ॥ १८ ॥
ते म्हणाले- ’सौम्य ! तुमचे केस गळून गेले आहेत आणि दोन्ही पंख जळून गेले आहेत. याचे कारण कळून येत नाही. इतके असूनही तुझ्या शरीरात प्राण टिकून राहिले आहेत. ॥१८॥
गृध्रौ द्वौ दृष्टपूर्वौ मे मातरिश्वसमौ जवे ।
गृध्राणां चैव राजानौ भ्रातरौ कामरूपिणौ ॥ १९ ॥
मी पूर्वी वायुसमान वेगवान् दोन गृध्रांना (गिधाडांना) पाहिलेले आहे. ते दोघे परस्परांचे भाऊ आणि इच्छानुसार रूप धारण करणारे होते. त्याच बरोबर ते गृध्रांचे राजे ही होते. ॥१९॥
येथे संपाती आणि जटायू यांना इच्छेनुसार रूप बदलता येत असे. म्हणजेच त्यांनी जो *धाडासारखा पोषाख परिधान केला होता तो त्यांना बदलता येणे शक्य होते.
ज्येष्ठोऽवितस्त्वं संपाते जटायुरनुजस्तव ।
*मानुषं रूपमास्थाय* गृह्णीतां चरणौ मम ॥ २० ॥
संपाति ! मी तुला ओळखले आहे. तू दोन्ही भावांमध्ये मोठा आहेस. जटायु तुझा लहान भाऊ होता. तुम्ही दोघे *मनुष्य रूप धारण करून माझा चरण-स्पर्श करीत होतात. ॥२०॥
येथे महर्षी वाल्मिकींनी स्पष्टपणे लिहिले आहे की संपाती आणि जटायू यांना मनुष्यरूप धारण करता येत होते कारण ते मनुष्यच होते. वाल्मीकी रामायणात जे सत्य आहे तेच लिहिले आहे आणि तेच मी तुम्हाला इथे सांगतोय. माझ्या स्वतःचे मी काहीही सांगत नाहिये. पुढील लेखांत जटायूविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. तूर्तास इथेच थांबतो.
टीप : वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून रामायणाचा अभ्यास करताना मी वरील मत मांडले आहे. माझ्या मताशी सगळेच सहमत असतील असेही नाही.
🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩
No comments:
Post a Comment