वेदविज्ञानरंजन - ४०
रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ६
माझ्या मागच्या लेखात #वेदविज्ञानरंजन_३९ जटायू हा पक्षी असावा का मानव असावा? ह्याची आपण माहिती घेतली. ह्या भागात आपण जटायूचा मोठा भाऊ संपाती ह्याची माहिती घेऊ. सीतेचा शोध करण्यासाठी वानरसेनेची एक तुकडी दक्षिण दिशेकडे आली असता तेथे त्यांना पंख जळालेल्या अवस्थेतील संपाती भेटला. तेथे त्याने वानरसेनेला स्वतःची कथा सांगितली. संपाती आणि निशांकर ऋषी ह्यांची भेट आणि त्यावेळचा वृत्तांत आपण पाहू. त्यावर संपाती निशांकर ऋषींना त्याचे आणि जटायूचे पंख कसे जळाले ह्याची कथा सांगतो. वाल्मिकी रामायण सर्ग क्र. ६१ मध्ये खालील श्लोक आहेत.
अप्यावां युगपत् प्राप्तौ अपश्याव महीतले ।
रथचक्रप्रमाणानि नगराणि पृथक् पृथक् ॥ ५ ॥
निश्चय करून आम्ही बरोबरच आकाशात जाऊन पोहोंचलो. तेथून पृथ्वीवरील भिन्न भिन्न नगरात आम्ही रथाच्या चाकां (प्रमाणे) एवढे दिसू लागलो.
तूर्णमुत्पत्य चाकाशं आदित्यपथमास्थितौ ।
आवामालोकयावस्तद् वनं शाद्वलसंस्थितम् ॥ ७ ॥
त्याहूनही उंच उडून आम्ही तात्काळ सूर्याच्या मार्गावर जाऊन पोहोचलो. तेथून खाली दृष्टि टाकून जेव्हा दोघांनी पाहिले तेव्हा येथील जंगले हिरव्यागार गवतासारखी दिसत होती. ॥७॥
उपलैरिव सञ्छन्ना दृश्यते भूः शिलोञ्चयैः ।
आपगाभिश्च संवीता सूत्रैरिव वसुंधरा ॥ ८ ॥
पर्वतांमुळे ही भूमी जणु हिच्यावर दगड, शीळा अंथरले गेले आहेत अशी भासत होती आणि नद्यांनी झाकलेली भूमी जणु त्यांना सुधाग्यांनी गुंडाळेले गेले आहे अशा प्रमाणे भासत होती. ॥८॥
सामान्यपणे गिधाडे जास्तीत जास्त २४,००० फुटांवरून उडतात. मोठी मोठी नगरे रथांच्या चाकाप्रमाणे दिसणे, पर्वत छोट्या दगडांप्रमाणे दिसणे. मोठीमोठी जंगले छोट्या गवताप्रमाणे दिसणे, नद्या ह्या सुताइतक्या छोट्या दिसणे, तेव्हढ्या उंचीवरून शक्य नाही. त्यासाठी विमानासारख्या यंत्रात बसुन अधिक उंच जावे लागते विमाने साधारणपणे ३१,००० ते ३८,००० फुटांवरून उडतात.
तुल्यपृथ्वीप्रमाणेन भास्करः प्रतिभाति नौ ॥ १३ ॥
असेही संपाती सांगतो. ह्याचा अर्थ की ते दोघे उडत इतक्या उंचीवर गेले की तिथे सूर्य हा पृथ्वीसारखा दिसू लागला. आता सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्यात गोलाकार रचना हेच साम्य आहे. त्या दोघांना सूर्य आणा आणि पृथ्वी गोल दिसले असावेत ह्याचा अर्थ एखाद्या उडणाऱ्या यंत्रात बसून (Flying Machine ) किंवा space shuttle मध्ये बसुन ते दोघे अंतराळात गेले असावेत,कारण तेथूनच पृथ्वी आणि सूर्य सारखे दिसतात. जटायू आणि संपाती ह्यांच्याकडे असलेल्या विमानातून त्यांनी प्रवास केला होता असा येथे निष्कर्ष निघतो. ह्यावरून त्रेतायुगात सुद्धा विमाने होती आणि प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात होते असे आपण समजू शकतो. रामायणातील विमाने हा विषय घेऊन आपण पुन्हा कधीतरी भेटू. तूर्तास इथेच थांबतो.
No comments:
Post a Comment