माझा परिचय

Saturday 18 March 2023

वेदविज्ञानरंजन_४९ - श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ४

 

#वेदविज्ञानरंजन_४९

*टीप : प्रस्तुत लेख लेखकाच्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावा.*

🌺 *श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ४* 🌺

*जगातील सर्वांत पहिला सरोगेट गर्भ कोणता?*

आधुनिक विज्ञानाने मान्य केलेली *सरोगेट मदर ही संकल्पना हजारो वर्षांपूर्वी श्रीमद्भागवत ग्रंथात मांडली आहे.*  सरोगेट मदर ह्याचा अर्थ *एका मातेच्या उदरात तयार झालेला जीव, गर्भ दुसर्‍या मातेच्या उदरात ठेवून त्याद्वारे त्याची प्रसूती करणे.*
सरोगसी म्हणजे एक स्त्री आणि दुसरे जोडपे किंवा एकल पालक (सिंगल पॅरेन्ट) यांच्यातील करार होय. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सरोगसी म्हणजे 'सरोगेट गर्भ'. जेव्हा पती-पत्नी मुलाला जन्म देऊ शकत नाहीत (किंवा जन्म देऊ इच्छित नाहीत) तेव्हा दुसऱ्या स्त्रिच्या पोटातून मुलाला जन्म देण्यास सरोगसी म्हणतात. *ज्या स्त्रिच्या गर्भाला मूल जन्माला घालण्यासाठी भाड्याने घेतले जाते, तिला सरोगेट मदर असे म्हणतात*

वासुदेव आणि देवकी ह्यांना कंसाने कारागृहात ठेवले होते. देवकीच्या पुत्राकडून आपले मरण आहे ह्याची कंसाला कल्पना होती त्यामुळे देवकी प्रसूत झाली की त्या बाळाला कंस अतिशय निर्दयतेने ठार मारीत असे. कंसाने देवकीची सहा मुले मारली. आता सातव्या वेळी देवकी गर्भवती राहिली.
🚩
सप्तमो वैष्णवं धाम यं अनन्तं प्रचक्षते ।
गर्भो बभूव देवक्या हर्षशोकविवर्धनः ॥ ५ ॥
🚩

तेव्हा देवकीच्या *सातव्या गर्भात भगवंतांचे अंशस्वरूप श्रीशेष, ज्यांना अनंत असेही म्हणतात, ते आले.* त्यामुळे देवकीला स्वाभाविकच आनंद झाला, पण कंस कदाचित यालाही मारील, या भितीने दुःखही झाले.

🚩
भगवान् अपि विश्वात्मा विदित्वा कंसजं भयम् ।
यदूनां निजनाथानां योगमायां समादिशत् ॥ ६ ॥
🚩
यादव कंसामुळे त्रस्त झाले आहेत असे पाहून विश्वात्मा *भगवंतांनी योगमायेला आज्ञा केली.*

🚩
गच्छ देवि व्रजं भद्रे गोपगोभिः अलंकृतम् ।
रोहिणी वसुदेवस्य भार्याऽऽस्ते नन्दगोकुले ।
अन्याश्च कंससंविग्ना विवरेषु वसन्ति हि ॥ ७ ॥
🚩

देवी ! कल्याणी ! *तू गोकुळात जा*. गवळी आणि गायी यांनी तो प्रदेश सुशोभित झाला आहे. तेथे नंदांच्या गोकुळात *वसुदेवांची पत्‍नी रोहिणी राहात आहे.* त्यांच्या इतर पत्‍न्याही कंसाच्या भितीने गुप्त जागी रहात आहेत.
🚩
देवक्या जठरे गर्भं शेषाख्यं धाम मामकम् ।
तत् संनिकृष्य रोहिण्या उदरे सन्निवेशय ॥ ८ ॥
🚩
सध्या माझा *शेष नावाचा अंश देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिला आहे. त्याला तेथून काढून तू रोहिणीच्या पोटात नेऊन ठेव.* इथे वरवर पाहता ही एक कविकल्पना किंवा अशक्य गोष्ट वाटते. आपलेच हिंदू लोक ह्या गोष्टीची टिंगल करताना मी ऐकले आहे. कसे काय शक्य आहे बुवा? असा गर्भ एका गर्भाशयातून दुसर्‍या गर्भाशयात नेऊन ठेवता येतो का? आपल्या पुराणांत काहीही वाट्टेल ते लिहिले असते असे ऐकू येते. पण आता आधुनिक विज्ञाने सिद्ध केले आहे की असे करता येते. त्यामुळे आत्ता जर ही गोष्ट शक्य आहे तर द्वापारयुगात योगमायेने हे काम उत्तमरीत्या पार पाडले होते. देवकीच्या गर्भातून काढून म्हणजे त्याचे संकर्षण करून रोहिणीच्या गर्भात स्थापन केला म्हणून बलरामास *संकर्षण* असे म्हणतात.

🚩
सन्दिष्टैवं भगवता तथेत्योमिति तद्वचः ।
प्रतिगृह्य परिक्रम्य गां गता तत् तथाकरोत् ॥ १४ ॥
🚩
जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा केली, तेव्हा योगमायेने *जशी आपली आज्ञा* असे म्हणून त्यांचे म्हणणे शिरोधार्य मानले आणि त्यांना प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर आली आणि भगवंतांनी जसे सांगितले तसे तिने केले. येथे योगमाया म्हणजे आजच्या भाषेत प्रसूतीतज्ज्ञ स्त्री होय. धर्मग्रंथांतील कथांचे वैज्ञानिक पद्धतीने अर्थ लावल्यास आपल्याला अनेक गोष्टी समजू शकतात.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩


संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...