माझा परिचय

Saturday 11 March 2023

वेदविज्ञानरंजन - ४८:श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ३

 

#वेदविज्ञानरंजन_४८


*श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ३*

          *डायनॉसोर - अजस्र प्राणी*

पृथ्वीवर डायनॉसोर सारखे अजस्र प्राणी काही लाख वर्षांपूर्वी वावरत होते असे आधुनिक विज्ञान सांगते. भूगर्भ शास्त्रज्ञांनी जमिनीखाली दडलेले डायनॉसोर सारख्या प्राण्यांचे सांगाडे शोधून काढून त्यांचे विविध प्रकार आणि त्यांची कालनिश्चिती केली आहे. परंतु, *डायनॉसोर सारखे अजस्र प्राणी प्रत्यक्ष पाहिल्याची नोंद* पाश्चिमात्य देशांनी केलेली नाही. जगातील सर्वात श्रेष्ठ असलेल्या आपल्या *सनातन धर्मात श्रीमद्भागवत स्कंध १० अध्याय ६४* मध्ये असा प्राणी पाहिल्याचा उल्लेख आहे.

🚩
एकदोपवनं राजन् जग्मुर्यदुकुमारकाः ।
विहर्तुं साम्बप्रद्युम्न चारुभानुगदादयः ॥ १ ॥
🚩
श्रीशुकदेव सांगतात -
श्रीशुक म्हणातात- परीक्षिता ! एके दिवशी सांब, प्रद्युम्न, चारुभानू, गद इत्यादी यदुवंशी राजकुमार फिरण्यासाठी उपवनात गेले.

🚩
क्रीडित्वा सुचिरं तत्र विचिन्वन्तः पिपासिताः ।
जलं निरुदके कूपे ददृशुः सत्त्वमद्‌भुतम् ॥ २ ॥
🚩

तेथे पुष्कळा वेळापर्यंत खेळ खेळल्याने त्यांना तहान लागली. तेव्हा ते इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागले. त्यांना एका पाणी नसलेल्या विहिरीत *एक विचित्र प्राणी* दिसला. त्याला विचित्र प्राणी म्हंटले आहे कारण असा प्राणी त्यांनी ह्याआधी कधीच पाहिला नव्हता.

🚩
कृकलासं गिरिनिभं वीक्ष्य विस्मितमानसाः ।
तस्य चोद्धरणे यत्‍नं चक्रुस्ते कृपयान्विताः ॥ ३ ॥
🚩

तो प्राणी म्हणजे *पर्वताच्या आकाराचा एक सरडा* होता. त्याला पाहून ते *आश्चर्यचकित* झाले. त्यांना त्याची दया येऊन ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्‍न करू लागले. *डायनॉसोर म्हणजे प्रचंड आकाराचा सरड्यासारखा दिसणारा प्राणी होता हे जीवाश्म पुराव्यांवरून आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे.* Hollywood मध्ये Jurassic Park नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी होता आणि त्यावेळी तो खूप गाजला होता. परंतु, *कोणत्याही पाश्चिमात्य देशांतील ग्रंथात डायनॉसोर सारख्या प्राण्याला प्रत्यक्ष पाहिल्याचा उल्लेख नाही. परंतु, तो श्रीमद्भागवत पुराणांतील स्कंधात आहे.*

🚩
चर्मजैस्तान्तवैः पाशैः बद्ध्वा पतितमर्भकाः ।
नाशक्नुवन् समुद्धर्तुं कृष्णायाचख्युरुत्सुकाः ॥ ४ ॥
🚩
परंतु ती मुले जेव्हा त्या विहिरीत पडलेल्या सरड्याला कातडी दोराने बांधूनही बाहेर काढू शकले नाहीत, तेव्हा कुतूहलाने जाऊन त्यांनी ती गोष्ट श्रीकृष्णांना सांगितली.

🚩
तत्रागत्यारविन्दाक्षो भगवान् विश्वभावनः ।
वीक्ष्योज्जहार वामेन तं करेण स लीलया ॥ ५ ||
🚩
जगाचे जीवनदाते कमलनयन भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीपाशी आले. त्या सरड्याला पाहून आपल्या *डाव्या हाताने सहज त्यांनी त्याला बाहेर काढले*. येथे श्रीकृष्णाच्या शक्तीची कल्पना आपल्याला येते. एकतर त्यांनी डाव्या हाताने खेचून त्याला बाहेर काढले असावे किंवा डाव्या हातात पकडून त्याला उचलून बाहेर काढले असावे. काहीही जरी असले तरी पर्वताच्या आकाराएव्हढ्या अजस्र प्राण्याला बाहेर काढायचे असेल तर श्रीकृष्णाचा डावा हात तेव्हढाच शक्तिशाली आणि मोठा असला पाहिजे. ह्यावरून असा तर्क करता येतो की पर्वताच्या आकाराच्या सरड्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णाने विराट रूप घेतले असावे. त्यामुळे त्यांनी त्या सरड्याला सहज, अलगद बाहेर काढले. महाभारत युद्धात अर्जुनाला श्रीकृष्णाने विराट रूप दाखवले होते. त्याचप्रमाणे ह्यावेळी सुद्धा विराट रूप घेतले असावे असे वाटते.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...