माझा परिचय

Friday 31 March 2023

वेदविज्ञानरंजन_५०: श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ५

 

#वेदविज्ञानरंजन_५०

*टीप : प्रस्तुत लेख लेखकाच्या (श्री. वैभव दातार ) नावासह पुढे पाठवावा.*

🌺 *श्रीमद्भागवत ग्रंथातील वैज्ञानिक संदर्भ भाग - ५* 🌺

आधुनिक विज्ञानाच्या मदतीने आपण गर्भातील बाळाच्या वेगवेगळ्या अवस्था पाहू शकतो. परंतु अंदाजे इ.स.पू.५००० वर्षे आधी लिहिलेल्या श्रीमद्भागवत ह्या ग्रंथात गर्भातील बाळाच्या वेगवेगळ्या अवस्था वर्णन केल्या आहेत. अर्थात आधुनिक विज्ञानाने वर्णन केलेल्या अवस्था आणि श्रीमद्भागवत ग्रंथातील अवस्था ह्यांत थोडीफार तफावत आहे. महर्षी व्यास आणि शुकमुनी हे प्रसूतीतज्ज्ञ नव्हते तरीही त्यांनी गर्भातील बाळाच्या वेगवेगळ्या अवस्थांचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना खरोखर साष्टांग नमस्कार.

श्रीमद्भागवत स्कंध ३ अध्याय ३१

🚩
कर्मणा दैवनेत्रेण जन्तुर्देहोपपत्तये ।
स्त्रियाः प्रविष्ट उदरं पुंसो रेतःकणाश्रयः ॥ १ ॥
🚩

श्रीभगवान म्हणतात - जीव मनुष्यशरीरात जन्म घेण्यासाठी भगवंतांच्या प्रेरणेने आपल्या *पूर्वकर्मांनुसार पुरुषाच्या वीर्यकणाच्या आश्रयाने स्त्रीच्या उदरात प्रवेश करतो.*

🚩
कललं त्वेकरात्रेण पञ्चरात्रेण बुद्‍बुदम् ।
दशाहेन तु कर्कन्धूः पेश्यण्डं वा ततः परम् ॥ २ ॥
🚩

तेथे वीर्यकण एका रात्रीत स्त्रीच्या रजामध्ये मिसळून एकरूप बनतो. *पाच रात्रीत बुडबुडयासारखा होतो. दहा दिवसात बोरासारखा थोडासा कठीण होतो*. आणि त्यानंतर मांसपेशी किंवा अंडज प्राण्यांमधील अंडयाच्या रूपात त्याचे रूपांतर होते.

🚩
मासेन तु शिरो द्वाभ्यां बाह्वङ्घ्र्याद्यङ्गविग्रहः ।
नखलोमास्थिचर्माणि लिङ्गच्छिद्रोद् भवस्त्रिभिः ॥ ३ ॥
🚩

*एक महिन्यात त्याला डोके उत्पन्न होते, दोन महिन्यात हात, पाय इत्यादी अवयव तयार होतात आणि तीन महिन्यात नखे, रोम, हाडे, चामडे, उत्सर्जक इंद्रिये तसेच अन्य छिद्रे उत्पन्न होतात*.

🚩
चतुर्भिर्धातवः सप्त पञ्चभिः क्षुत्तृडुद्‍भवः ।
षड्भिर्जरायुणा वीतः कुक्षौ भ्राम्यति दक्षिणे ॥ ४ ॥
🚩

*चार महिन्यात त्यात मांसादी सात धातू उत्पन्न होतात. पाचव्या महिन्यात तहान-भूक लागू लागते आणि सहाव्या महिन्यात पापुद्रयाने लपेटला जाऊन तो उजव्या कुशीत फिरू लागतो*.

🚩
मातुर्जग्धान्नपानाद्यैः एधद् धातुरसम्मते ।
शेते विण्मूत्रयोर्गर्ते स जन्तुर्जन्तुसम्भवे ॥ ५ ॥
🚩

त्यावेळी *मातेने खाल्लेल्या अन्नपाणी इत्यादीपासून त्याच्या शरीरातील सर्व धातू पुष्ट* होऊ लागतात आणि तो कृमिकीटकांचे उत्पत्तिस्थान असलेल्या निकृष्ट मलमूत्राच्या खड्डयात पडून राहातो.

🚩
कृमिभिः क्षतसर्वाङ्गः सौकुमार्यात्प्रतिक्षणम् ।
मूर्च्छां आप्नोति उरुक्लेशः तत्रत्यैः क्षुधितैर्मुहुः ॥ ६ ॥
🚩

तो कोमल असतो, म्हणून जेव्हा तेथील भूक लागलेले किडे त्याच्या अंगप्रत्यंगाला टोचे मारू लागतात, तेव्हा अत्यंत क्लेश होऊन तो क्षणोक्षणी मूर्च्छित होतो.

🚩
कटुतीक्ष्णोष्णलवण रूक्षाम्लादिभिरुल्बणैः ।
मातृभुक्तैरुपस्पृष्टः सर्वाङ्गोत्थितवेदनः ॥ ७ ॥
🚩

*मातेने खाल्लेल्या कडवट, तिखट, गरम, खारट, कोरडे, आंबट इत्यादी उग्र पदार्थांच्या स्पर्शाने त्याच्या सर्व शरीराला पीडा होऊ लागते.*

🚩
उल्बेन संवृतस्तस्मिन् अन्त्रैश्च बहिरावृतः ।
आस्ते कृत्वा शिरः कुक्षौ भुग्नपृष्ठशिरोधरः ॥ ८ ॥
🚩

तो जीव मातेच्या *गर्भाशयात पापुद्रयाने झाकलेला आणि आंतडयांनी वेढलेला* असतो. त्याचे डोके पोटाकडे आणि पाठ व मान गोलाकार झालेली असते.

🚩
अकल्पः स्वाङ्गचेष्टायां शकुन्त इव पञ्जरे ।
तत्र लब्धस्मृतिर्दैवात् कर्म जन्मशतोद्‍भवम् ।
स्मरन् दीर्घमनुच्छ्वासं शर्म किं नाम विन्दते ॥ ९ ॥
🚩

पिंजर्‍यात बंद असलेल्या पक्ष्याप्रमाणे तो पराधीन आणि अवयवांची हालचाल करण्यास असमर्थ असतो. यावेळी अदृष्टामुळे त्याला *स्मरणशक्ती प्राप्त होते. तेव्हा आपली शेकडो जन्मातील कर्मे आठवून तो बेचैन होतो. श्वास कोंडलेल्या अवस्थेत त्याला कसली शांती मिळणार ?*

🚩
आरभ्य सप्तमान् मासात् लब्धबोधोऽपि वेपितः ।
नैकत्रास्ते सूतिवातैः विष्ठाभूरिव सोदरः ॥ १० ॥
🚩

*सातवा महिना सुरू झाल्यानंतर त्याच्यात ज्ञानशक्तीचा उगम* होतो, परंतु प्रसूतिवायूच्या हालचालीमुळे तो त्या पोटात उत्पन्न झालेल्या विष्ठेतील किडयांप्रमाणे एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. तो सतत हालचाल करतो.

🚩
एवं कृतमतिर्गर्भे दशमास्यः स्तुवन्नृषिः ।
सद्यः क्षिपत्यवाचीनं प्रसूत्यै सूतिमारुतः ॥ २२ ॥
🚩

तो दहा महिन्यांचा जीव गर्भातच जेव्हा अशा प्रकारे विवेकसंपन्न होऊन भगवंतांची स्तुती करतो, तेव्हा त्या *अधोमुख बालकाला प्रसूतीचे कारण वायू तत्काळ बाहेर येण्यासाठी ढकलून देतो.*

🚩
तेनावसृष्टः सहसा कृत्वावाक् शिर आतुरः ।
विनिष्क्रामति कृच्छ्रेण निरुच्छ्वासो हतस्मृतिः ॥ २३ ॥
🚩

त्याच्या ताबडतोब ढकलण्याने ते बालक अत्यंत व्याकूळ होऊन *खाली डोके करून मोठया कष्टाने बाहेर येते. त्यावेळी त्याची श्वासाची गती थांबते आणि त्याची पूर्वस्मृती नष्ट होते*.

🚩
पतितो भुव्यसृङ्‌मूत्रे विष्ठाभूरिव चेष्टते ।
रोरूयति गते ज्ञाने विपरीतां गतिं गतः ॥ २४ ॥
🚩

मातेच्या रक्त आणि मूत्रात जमिनीवर पडलेले ते बालक विष्ठेतील किडयाप्रमाणे तडफडते. त्याचे गर्भवासाच्या वेळचे सर्व ज्ञान नष्ट होते आणि ते देहाभिमानरूप अज्ञान-दशा प्राप्त होऊन वारंवार जोरजोराने रडू लागते.

असे म्हणतात की गर्भातील बालकाला सोSहं चे ज्ञान असते आणि बाहेर येताना स्मृती नष्ट होते त्यामुळे तो कोSहं असे विचारत राहतो. प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज ह्यांनी त्यांच्या दत्तमहात्म्य ह्या ग्रंथातील अकराव्या अध्यायात ह्याचे छान वर्णन केले आहे. जिज्ञासूंनी तो अध्याय अवश्य वाचावा.

आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १०, ११ मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने *भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही*. माझी *सर्व आचार्यांना विनंती* आहे की भागवत सप्ताहात *श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.* आज इथेच थांबतो.
श्रीमद्भागवत ग्रंथातील अजून काही वैज्ञानिक सिद्धांत आपण पुढील लेखात पाहूया.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण







No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...