माझा परिचय

Wednesday 6 December 2023

वेदविज्ञानरंजन - ७७

 

#वेदविज्ञानरंजन_७७

*प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - १*

वाल्मीकी रामायण बालकांड, सर्ग क्र. ५ मध्ये अयोध्यापुरीच्या संपन्नतेचे वर्णन केले आहे. त्यात अयोधायापुरीत अनेक प्रकारची यंत्रे होती असा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्या संबंधी श्लोक खालीलप्रमाणे आहे.

🚩 कपाटतोरणवतीं सुविभक्तान्तरापणाम् ।
*सर्वयन्त्रायुधवतीमुषितां सर्वशिल्पिभिः ॥ १० ॥* 🚩

अयोध्यापुरी पुरी मोठमोठ्या फाटकांनी आणि तोरणांनी सुशोभित झालेली होती. तिच्यामध्ये पृथक् पृथक् बाजार होते. तेथे *सर्व प्रकारची यंत्रे* आणि अस्त्र शस्त्र संचित केलेली होती. त्या पुरीत सर्व कलांचे शिल्पी निवास करीत होते. ॥ १०

ह्या अयोध्या नगरीत अतिशय संपन्नता होती आणि सर्व कलांचे शिल्पी म्हणजे तंत्रज्ञ, अभियंते निवास करीत होते. ह्याचा अर्थ अभियांत्रिकीच्या विविध शाखा त्रेतायुगात सुद्धा आपल्या भारतात अस्तित्वात होत्या. विविध प्रकारची यंत्रे होती म्हणजे यंत्रशास्त्र अतिशय प्रगत अवस्थेत होते.

वाल्मीकी रामायण युद्धकांड, सर्ग क्र. २० मध्ये खालील श्लोक आहे.
🚩
हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य *यंत्रैः* परिवहन्ति च ॥ ६० ॥🚩

महाकाय महाबलाढ्‍य वानर हत्तींप्रमाणे मोठ मोठ्‍या शिळा आणि पर्वतांना उपटून *यंत्रांच्या द्वारा* (विशिष्ट साधनांच्या द्वारा) समुद्रतटावर घेऊन येत होते.

समुद्र सेतू बांधतानाचे हे वर्णन आहे. महाकाय वृक्ष, प्रचंड मोठ्या शिळा एका ठिकाणाहून दुसरीकडे किंवा समुद्रात आणण्यासाठी मोठ्या मोठ्या *यंत्रांचा उपयोग* होत असे असे प्रस्तुत श्लोकावरून स्पष्ट होते. आता ही यंत्रे म्हणजे जे. सी. बी. किंवा क्रेन सारखी यंत्रे असावीत कारण महाकाय वृक्ष आणि शिलाखंड उचलून समुद्रतटावर आणण्यासाठी तितकीच *मजबूत यंत्रे* हवीत.

वाल्मीकी रामायण, युद्धकांड सर्ग ४ मध्ये खालील श्लोक आहे.
🚩
*तत्रेषूपलयन्त्राणि बलवन्ति महान्ति च ।*
*आगतं परसैन्यं तु तैः तत्र प्रतिनिवार्यते ॥ १२ ॥*🚩

त्या दरवाजांवर मोठी विशाल आणि *प्रबळ यंत्रे* लावलेली आहेत, जी तीर आणि दगडांच्या गोळ्यांची वृष्टि करतात. त्यांच्या द्वारा आक्रमण करणार्‍या शत्रुसैन्याला पुढे येण्यापासून अडविले जाते.

समुद्रावरील सेतू पार करून सर्व वानरसेनेसहित प्रभू श्रीरामचंद्र लंकेत प्रवेश करतात. त्यावेळी हनुमान लंकेच्या युद्धसज्जतेचे वर्णन करतात. *लंकेच्या प्रवेशद्वारावर प्रचंड मोठी यंत्रे लावली आहेत* जी दगडांचा वर्षाव करतात. आता गोळ्यांचा वर्षाव करणारी यंत्रे म्हणजे तोफा किंवा तत्सम यंत्रे. आजच्या भाषेत आपण AK 47 ह्या बंदूकीतून बर्‍याच गोळ्या मारू शकतो. अशाप्रकारची यंत्रे रावणाकडे होती. आता अशाप्रकारची यंत्रे तयार करण्यासाठी आवश्यक ज्ञान नक्कीच रावणाकडे असणार.

थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्या *वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती. परंतु, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरविली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला.*  इंग्रजी {श्री. वैभव दातार, कल्याण } शिक्षणाचा उदो उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ, इतिहास आणि आपली सर्वभाषाजननी संस्कृत भाषा हे सर्व काही विसरत चाललो आहोत हीच आपली शोकांतिका आहे. तूर्तास इथेच थांबतो. *पुढील लेखांत अजून वैज्ञानिक संदर्भ पाहू.*

संकलन आणि लेखन - श्री. वैभव दातार, कल्याण (प्राच्यविद्या अभ्यासक ) 

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...