वेदविज्ञानरंजन - ११ : पृथ्वी गोल आहे भाग - ३
आजच्या भागात पृथ्वीसंबंधीत श्रीमद्भागवत ग्रंथातील काही वैशिष्ट्ये पाहू.
पृथ्वी गोल आहे - भाग ३
श्रीमद्भागवत पुराण स्कंध ५ - अध्याय २५ (श्रीसंकर्षण देवांचे विवरण आणि स्तुती ) (भूविवरविध्युपवर्णनम्) - श्लोक २ आणि श्लोक १२
श्लोक :२
यस्येदं क्षितिमण्डले भगवतोऽनन्तमूर्तेः
सहस्रशिरस एकस्मिन्नेव शीर्षणि ध्रियमाणं
सिद्धार्थ इव लक्ष्यते ॥ २ ॥
यस्य अनंतमूर्तेः सहस्रशिरसः भगवतः एकस्मिन् एव शीर्षणि ध्रियमाणं इदं क्षितिमंडलं सिद्धार्थः इव उपलक्ष्यते |ज्या असंख्यस्वरूपी हजारो मस्तके असणार्या शेषावतारी भगवंताच्या एकाच मस्तकावर धारण केलेले हे पृथ्वीमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे अगदी अल्पसे दिसते. ॥२॥
ह्या भगवान अनंताची (शेषाची ) एक हजार मस्तके आहेत. ह्यापैकी एका मस्तकावर ठेवलेले हे क्षितिमंडल (क्षिती =पृथ्वी ) पृथ्वीमंडल ( गोल पृथ्वी ) मोहरीच्या दाण्याएवढी दिसते. (सिद्धार्थः इव उपलक्ष्यते) सिद्धार्थः म्हणजे अतिशय छोटा दाणा
मूर्धन्यर्पितमणुवत्सहस्रमूर्न्घो ।
भूगाेलं सगिरिसरित्समुद्रसत्वम् || १२||
अन्वयार्थ :
सगिरिसरित्समुद्रसत्त्वं भूगोलं सहस्रमूर्ध्नः मूर्धनि अणुवत् अर्पितं सहस्रजिह्वः कः आनंत्यात् अनिमितविक्रमस्य भूम्नः वीर्याणि अधिगणयेत् |पर्वत, नद्या, समुद्र व प्राणी ह्यांसह भूगोल हजार फणांच्या शेषाच्या मस्तकावर अणूसारखा ठेवला आहे (तोलला आहे ) . इथे शेषावर पृथ्वी कशी काय आहे? अंतराळवीरांना तर शेष कुठेच दिसला नाही 😝 अशी टिंगल करण्यात येते. शेष शब्दाचा अर्थ नीट जाणून न घेतल्यामुळे झालेला हा गैरसमज आहे. तुम्हाला गणितातील निःशेष भागाकार ही संज्ञा माहिती असेल. भागाकार केल्यावर बाकी काहीच राहत नाही ती शून्य असते म्हणजेच शेष काही राहत नाही त्याला निःशेष भागाकार म्हणतात. ह्याचा अर्थ शेष म्हणजे उरलेले आणि निःशेष म्हणजे न उरलेले किंवा संपलेले.
आता इथे शेष म्हणजे अंतराळ कारण आपल्या आकाशगंगेत ग्रह,नक्षत्र, तारे व्यापलेले आहेत. आणि जे काही उरलेले आहे म्हणजे शेष आहे ते म्हणजे अंतराळ, अंतरिक्ष. आपण नीट अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की आपल्या ब्रह्मांडांत अनेक आकाशगंगा आहेत. येथे सहस्रमूर्ध्नः हा शब्द अनेक (हजारो )ह्या अर्थी योजला आले. आपण इंटरनेट वर आकाशगंगा (Galaxy ) पाहतो. त्यात आकाशगंगा सर्पिलाकृती म्हणजे सापाच्या आकृतीसारख्या दिसतात. वेटोळे घातलेला साप आहे असा भास होतो. हबल ह्या दूर्बिणीद्वारे नासाने आकाशगंगांची छायाचित्रे टिपली आहेत. आपले आधुनिक विज्ञान सुद्धा हेच सांगते की अनेक आकाशगंगा आहेत. अंतराळात हा भूगोल म्हणजे पृथ्वी अगदी अणू एव्हढी आहे. ह्याचा अर्थ अणू ही संकल्पना भारतीयांना कणाद ऋषींच्या आधीपासून ज्ञात होती. कणाद ऋषींनी अणूवर विस्तृत भाष्य केले आहे ते पुढे कधीतरी पाहूच.
आपल्याकडे श्रीमद्भागवत ग्रंथाचे अनेक भागवत सप्ताह होतात त्यात स्कंध १० मध्ये भगवान श्रीकृष्ण चरित्र आहे. सर्व ठिकाणी तेच सांगितले जात असल्याने आणि इतर स्कंध त्यामानाने दुर्लक्षित असल्याने इतर स्कंधांतील भागवतातील विज्ञानाकडे आपले लक्ष जात नाही. माझी सर्व आचार्यांना विनंती आहेत की भागवत सप्ताहात श्रीकृष्णचरित्राबरोबरच इतर स्कंधांत असलेले वैज्ञानिक दाखलेसुद्धा जरूर सांगावेत.
पहा किती विचार केला आहे आपल्या ऋषींनी! अतिप्रचंड विस्तार असलेल्या ह्या ब्रह्मांडातील एक भूगोल हा अगदी छोट्या कणा एवढा म्हणजेच अणूएवढाच दिसतो. इथे हा भूगोल तोलला आहे म्हणजे balance केलेला आहे कारण पृथ्वीचे स्वतःचे गुरूत्वबल, सूर्याचे आणि इतर ग्रहांचे पृथ्वीवर असणारे आकर्षण बल यांचा तोल (balance) साधून पृथ्वी शेषावर (अंतराळात ) परिभ्रमण करीत आहे. माझा हा लेख वाचून तुम्हाला समजेल की प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून ती गोष्ट आपल्या प्राचीन ग्रंथांत लिहिली आहे.ह्यापुढे जर कोणीही पृथ्वीचा भार शेषावर आहे ह्यासंदर्भात हेटाळणी केली तर त्याला सडेतोड उत्तर द्या.
एव्हढा स्पष्ट दाखला श्रीमद्भागवत पुराणांत देऊन सुद्धा आपल्याकडील विद्वान शास्त्रज्ञांच्या मनात ह्यावर अधिक संशोधन करावे असे येत नाही का? आपण असे किती दिवस पाश्चात्य वैज्ञानिकांचे गोडवे गाण्यात धन्यता मानणार आहोत? असो. ह्यापुढे तरी आपल्या धर्मग्रंथांचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करावा ही नम्र विनंती.
🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩
No comments:
Post a Comment