माझा परिचय

Tuesday, 20 December 2022

वेदविज्ञानरंजन - ६ प्राचीन भारतीय यंत्रमानव

 


वेदविज्ञानरंजन-६

आजच्या लेखात आपण यंत्रमानव ( Robot ) ह्याविषयी माहिती घेऊ. पहिला आधुनिक रोबो तयार करण्याचे श्रेय George. C. Devol यांना सर्व जगाने दिलेले आहे. नेहमीप्रमाणे भारत सुद्धा परदेशी शास्त्रज्ञांचे गोडवे गाण्यात धन्यता मानीत आहे. आता आपण भारतीय पुरातन ग्रंथांमध्ये रोबो ची संकल्पनाच कोणी आणी कशी मांडली ह्याचा धांडोळा घेऊया.

राजा भोज याने समरांगण सूत्रधार हा ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथात अध्याय क्र. ३१ -  यंत्रविधान नावाचा अध्याय आहे. त्यात रोबो कसा असतो आणि कायकाय कामे करू शकतो याचे खूप छान वर्णन केले आहे. रोबो साठी स्त्रीपुरूषप्रतिमायंत्र असा शब्द भोज राजाने योजला आहे. ह्याचे वर्णन करणारे खालील श्लोक आपण पाहू.

दृग्ग्रीवातलहस्तप्रकोष्ठबाहूरुहस्तशाखादि |
सच्छिद्र वपुरखिलं तत्सन्धिषु खण्डशो घटयेत् ||१||

श्लिष्टं कीलकविधिना दारुमयं सृष्टचर्मणा गुप्तम् |
पुंसो अथवा युवत्या रूपं कृत्वातिरमणीयम् ||२ || 

डोळे, मान, तळहात, प्रकोष्ठ forearm, बाहू upperarm, मांड्या, हस्तशाखा (बोटे?), इ. असलेली छिद्रांसहित पूर्ण तनू तुकड्यांमध्ये घडवावी. ती काष्ठमय तनू योग्य कीलकांनी (खिळे, रिवेट वगैरे) जोडून सृष्टचर्माने (सिंथेटिक लेदरने?) झाकून पुरुषाचे किंवा युवतीचे अतिरमणीय रूप साकारावे

 रन्ध्रगतैः प्रत्यङ्गं विधिना नाराचसङ्गतैः सूत्रैः |
ग्रीवाचलनप्रसरणविकुंचनादीनि विदधाति ||३ || 

छिद्रांतून ओवलेल्या प्रत्येक अंग जोडणाऱ्या नाराचसंगत सूत्रांनी यथाविधि मानेच्या प्रसरण, विकुंचन, इ. हालचाली नेमून द्याव्यात.
येथे रोबो कसा तयार करावा ह्याची कृती थोडक्यात दिली आहे

करग्रहणतांबूलप्रदानजलसेचनप्रणामादि

आदर्शप्रतिलोकनवीणावाद्यादि च करोति ||४|| 

करग्रहण, तांबूल प्रदान, जलसेचन, प्रणाम, आरशात पाहणे, वीणावादन, इ. गोष्टी ती तनू करते

येथे रोबो काय काय गोष्टी करू शकतो ह्याचे वर्णन केले आहे. कोणी पाहुणे आले की त्यांचे स्वागत करणे, त्यांना पानसुपारी देणे त्यांना नमस्कार करून त्यांच्या समोर वीणावादन करणे. पाश्चात्यांनी तयार केलेला आधुनिक रोबो वीणावादन करु शकतो का किंवा इतर वाद्ये वाजवू शकतो का हे मला माहिती नाही. जर तसे नसेल तर भोज राजाचा रोबो निश्चित प्रगत असला पाहिजे.

एवमन्यदपि चेद्दशमेतत् कर्म विस्मयविधायि विधत्ते |
जृम्भितेन विधिना निजबुद्धेः कृष्टमुक्तगुण चक्रवशेन ||५||

अशीच अन्यही विस्मयकारक कामे साधता येतात. जृम्भितविधीने (जबडा उघडणे), आणि खेचणार्या सैल सोडणार्या गुणचक्राच्या (गियर?) साहाय्याने अशा गोष्टी साधता येतात

 पुंसो दारुजमूर्ध्वं रुपं कृत्वा निकेतनद्वारि |

तत्करयोजितदण्डं निरुणद्धि प्रवेशतां वर्त्म ||६|| 

असा लाकडी पुरुष पुतळा घराच्या दारी ठेवला की त्याच्या हातातील दंड प्रवेशणार्यांचा मार्ग अडवतो. 

येथे सुरक्षा रक्षक म्हणजेच security guard म्हणून रोबोचा उपयोग कसा करावा हे सांगितले आहे.

खड्गहस्तमथ मुद्गरहस्तं कृन्तहस्तमथवा |
यदि तत् स्यात् |

तन्निहन्ति विशतो निशि चौरान् द्वारि संवृतमुखम् प्रसभेन ||७||

हाती खड्ग, मुद्गर, कुन्त जर असेल तर तो पुतळा रात्री शिरणार्या चोरांना दारापाशीच सामोरा जाऊन   त्यांच्याशी दोन हात करून त्यांना मारतो

ये चापाद्या ये शतघ्न्यादयो अस्मिन्नुष्टग्रीवाद्याश्च दुर्गस्य गुप्त्यै |

ये क्रीडाद्याः क्रीडनार्थं च राज्ञां सर्वेपि स्युर्योगतस्ते गुणानाम् ||८||

जे धनुर्धारी आणि तोफाधारी आणि उंटाच्या मानेसारखे दुर्गाच्या गुप्तीवर आणि क्रीडेसाठी क्रीडा करणारे ते सर्व गुणवान् राजांचे/राजांकडे असावेत.

अशा प्रकारचे रोबो म्हणजेच स्त्रीपुरूषप्रतिमायंत्र राजांनी तयार करून घ्यावेत आणि आपल्या राजवाड्यात प्रवेशद्वारावर, बुरुजांवर ठेवावेत. जेणेकरुन आलेल्या चोरांपासून रक्षण होईल.

साधारण आजपासून हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या ह्या ग्रंथात रोबोचे यथायोग्य वर्णन केले आहे. समरांगण सूत्रधार हा अतिशय अद्वितीय ग्रंथ असून त्यात जनित्र कसे असावे, LIFT म्हणजे उद्वाहन कसे तयार करावे विविध यंत्रे कशी तयार करावीत ह्याची सुंदर माहिती दिलेली आहे.

नेहमीप्रमाणे आपल्याच नाकर्तेपणामुळे आपला हा समृद्ध वारसा आपण विसरत चाललो आहोत  पाश्चात्यांपेक्षा कितीतरी प्रगत विज्ञान आपल्याकडे असून सुद्धा आपण काही करू शकलो नाही. माझी सर्व शास्त्रज्ञांना विनंती आहे की ह्या संदर्भात अधिक संशोधनावर भर द्यावा आणि सरकारने शालेय शिक्षणात ह्याचा अंतर्भाव करावा.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

संस्कृत श्लोक भाषांतर : श्री. राजेंद्र दातार, बदलापूर
संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...