वेदविज्ञानरंजन - ५
भारतीय प्राचीन गणिती भास्कराचार्य यांनी त्यांच्या लीलावती ग्रंथात नमूद केलेली
काही सोपी सूत्रे आपण पाहू.
भास्कराचार्य यांनी काही ठराविक संख्यांना काही ठराविक शब्दांची योजनांची केली
आहे. त्यातील निवडकच उदाहरणे पाहू. ह्या पद्धतीला शब्द कूटांक असे म्हणतात.
0 = शून्यम्, पूर्ण, आकाशाची नावे (ख, नभ, गगन.. )
म्हणजे जिथे जिथे ज्या श्लोकांत वरील शब्द आले आहेत तिथे तिथे 0 ही संख्या घ्यावी. अशी
यादी बरीच मोठी आहे. आपण ठराविक संख्या पाहू.
1 = एकम्, पृथ्वीची नावे (भू, अवनि, महि...), चंद्राची नावे (चंद्र, इंदु, शशि, )
2 = द्वौ, युग्म, डोळ्यांची नावे (नेत्र, अक्ष, नयन, लोचन...) (डोळे दोन असतात म्हणून
डोळ्यांसाठी 2 हा अंक योजला आहे ), हातांची नावे (हस्त, कर, बाहू.. ), आश्विनौ (देवांचे
वैद्य - आश्विनीकुमार )
3 = त्रीणि, लोक, गुण, क्रम, अग्नीची नावे (हुताशन, अग्नी, पावक...)
4 = चत्वारि, युग, वेद, समुद्राची नावे (सागर, जलधि, अर्णव...)
5 = पञ्च, प्राण, इंद्रिय, तत्व, भूत, बाणांची नावे (शर, इषु, सायक...)
6 = षट्, रस, अंग, ऋतू , शत्रूंची नावे (अरि, रिपु.. )
7 = सप्त, स्वर, ऋषि, पर्वतांची नावे (शैल, अचल, नग...)
8 = अष्ट, वसु, हत्तींची नावे (गज, दन्ति, कुंजर.. ) सापांची नावे (नाग, अहि, भुजंग.. )
9= नव, नन्द, अंक, ग्रह, छिद्रांची नावे (छिद्र, रन्ध्र...)
10 = दश, पंक्ति, दिशांची नावे (दिक्, काष्ठा...)
12 = द्वादश, सूर्याची नावे (सूर्य, आदित्य, रवि, अर्क...)
27 = सप्तविंशति, नक्षत्रांची नावे (भ. नक्षत्र, तारा...)
32 = द्वात्रिंशत, दातांची नावे (दंत, रदन...)
आता खालील श्लोक पाहू:
व्यासे भनन्दाग्नि हते विभक्ते खबाणसूर्येः परिधिः स सूक्ष्मः |
द्वाविंशतिघ्ने विह्रृते अथ शैले स्थूलो अथवा स्यात् व्यवहारोग्यः ||
आता वरील श्लोकाचा अर्थ पाहू :
व्यासे भनन्दाग्नि : शब्दकूटांकातील संख्या आणि शब्द यांच्या वर लिहिलेल्या
कोष्टकानुसार, भनन्दाग्नि ज्या शब्दातून खालील अंक मिळतात :
भ = 27, नन्द = 9, अग्नि = 3
त्याचप्रमाणे वरील कोष्टकानुसार खबाणसूर्येः ह्या शब्दातील अंक खालीलप्रमाणे मिळतात
ख=0, बाण =5, सूर्य =12
अंकानां वामतो गतिः ह्या नियमाप्रमाणे (अंक उजवीकडून डावीकडे वाचायचे असतात)
भनन्दाग्नि = 3927
खाबाणसूर्येः = 1250
ह्याचा अर्थ भनन्दाग्नि ह्या परीघाला
खाबाणसूर्येः ह्या व्यासाने भागले असता पाय (Pi) चे मूल्य मिळते
पाय (Pi) = भनन्दाग्नि / खाबाणसूर्येः
पाय (Pi) = 3927/ 1250
पाय (Pi) = 3.1416
त्याचप्रमाणे द्वाविंशती 22 ह्या संख्येला शैले म्हणजे 7 (सुरुवातीला दिलेल्या कोष्टकानुसार
)
भागले असता Pi ची किंमत मिळते
Pi = 22/7
अशाप्रकारे वैदिक गणित शब्दकूटांक पद्धतीने आपल्याला पाय (Pi) चे मूल्य काढता येते.
भास्कराचार्य यांनी सिद्धांत शिरोमणी ह्या ग्रंथात कालमापन करताना चार युगांची वर्षे
सांगितली आहेत. तो श्लोक पाहू:
खखाभ्रदन्तसागरैर्युगाग्नियुग्मभूगुणैः |
क्रमेण सूर्यवत्सरैः कृतादयो युगाडघ्रयः ||
शब्दकूटांकातील संख्या आणि शब्द यांच्या वर लिहिलेल्या कोष्टकानुसार,
*ख =0, ख =0, अभ्र = 0, दन्त =32, सागर = 4
अंकानां वामतो गतिः या नियमानुसार,
खखाभ्रदन्तसागर= 432000
युगाग्निभूगुणैः म्हणजे युग = 4, अग्नि =3, युग्म =2
ह्याचा अर्थ असा की खखाभ्रदन्तसागर ह्यातील संख्येला युगाग्निभू ह्यातील संख्येने गुणले
असता अनुक्रमे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग यांची वर्षे मिळतात.
सत्ययुग = 432000 x 4= 1728000 वर्षे
त्रेतायुग = 432000 x 3 = 1296000 वर्षे
द्वापारयुग = 432000 x 2 = 864009 वर्षे
कलियुग = 432000 x 1 = 432000 वर्षे
भारतीय वैदिक गणितामध्ये प्रचंड ज्ञान सामावलेले आहे ह्याची छोटीसी झलक आपण
पाहिली. संस्कृत भाषेची विनाकारण असलेली भीती, सरकारची अनास्था यामुळे हे
ज्ञान सर्वसामान्यांपासून वंचित राहिले. शालेय अभ्यासक्रमात ह्याचा कुठेही उल्लेख
नसल्याने विद्यार्थ्यांना ह्याची माहीती होत नाही त्यामुळे पुढिल पिढीपर्यंत हा वारसा
पोहोचत नाही. ह्यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी सरकार दरबारी सामूहिक प्रयत्न करायला
हवेत. अभ्यासक्रमात असे विषय समाविष्ट करून घ्यायला हवेत. माझी सर्वांना विनंती
आहे की सामूहिक प्रयत्न केल्यास हे अमूल्य ज्ञान आपल्याला पुढच्या पिढीला देणे शक्य
होईल.
No comments:
Post a Comment