माझा परिचय

Sunday 25 December 2022

वेदविज्ञानरंजन - ३६ : रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ४

 वेदविज्ञानरंजन- ३६

रामायणातील भौगोलिक आणि वैज्ञानिक संदर्भ भाग - ४

वानरराज सुग्रीव यांनी जनकनंदिनी सीतेच्या शोधार्थ वानरसेनेला पूर्व दिशेस जायला सांगितले आणि त्या अनुषंगाने कोणकोणते देश, पर्वत, समुद्र पार करावे लागतील ह्याची संपूर्ण माहिती दिली. 

किष्किंधा कांड ४० श्लोक ५३,५४ आणि ५५

त्रिशिराः काञ्चनः केतुः तालस्तस्य महात्मनः |

स्थापितः पर्वतस्याग्रे विराजति सवेदिकः ||

पर्वाच्या वर त्या महात्म्यांची ताडाच्या चिह्नांनी युक्त सुवर्णमय ध्वजा फडकत आहे. त्या ध्वजेच्या तीन शिखा (त्रिशिराः ) आहेत आणि खालच्या आधार भूमीवर वेदी बनवलेली आहे. अशा प्रकारे त्या ध्वजाला खूप शोभा प्राप्त झाली आहे. 

पूर्वस्यां दिशि निर्माणं कृतं तत् त्रिदशेश्वरैः |

ततः परं हेममयः श्रीमानुदयपर्वतः ||५४ ||

हाच तालध्वज पूर्व दिशेच्या सीमेचे सूचक चिह्न ह्या रुपात देवतांच्या द्वारे स्थापित केला गेला आहे. त्यानंतर सुवर्णमय पर्वत आहे, जो दिव्य शोभेने संपन्न आहे. 

भारताच्या पूर्वेकडे भ्रमण करीत गेले असता सध्याचा पेरु देश लागतो. त्या देशात अँडीज (मूळ संस्कृत शब्द - अद्री) नावाचा पर्वत आहे त्यावर तीन शिखांनी युक्त असा मोठा त्रिशूल खोदलेला (कोरलेला ) आहे. त्याच्या तळाशी आयताकृती वेदी आहे जी आजही स्पष्ट दिसू शकते त्याला आजच्या भाषेत The Paracas Candelabra किंवा Candelabra of the Andes असे नाव आहे. आत्ताच्या भूगोलानुसार पेरु हा देश दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. 

वरील श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे हा त्रिशूल - तालध्वज पूर्व सीमेचे चिह्न आहे कारण त्यानंतर भूभाग नाही. आकाशातून उडणाऱ्या विमानांसाठी पूर्व दिशा दर्शविणारे चिह्न तयार केले गेले असावे. रामायणकाळी विमाने अस्तित्वात होती. अर्थात ह्याची माहिती आपण पुढे कधीतरी घेऊ. सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या तालध्वजाचे वर्णन वानरराज सुग्रीव यांनी केले आहे तो आजही अस्तित्वात आहे. हा तालध्वज त्यांनी स्वतः पाहिलेला असल्याने त्याचे हुबेहुब वर्णन त्यांनी केले आहे. मग भारतातून पूर्वेकडील पेरू देशापर्यंत सुग्रीव कसे गेले असतील? समुद्रमार्गे गेले असतील का आकाशमार्गे गेले असतील?  मागच्या लेखात मी म्हटल्याप्रमाणे वानरराज सुग्रीव यांनी पृथ्वीची प्रदक्षिणा केली असल्याने त्यांना पृथ्वी गोल आहे हे सुद्धा ज्ञात होते. 

अरण्यकांडातील सर्ग क्र. २३ मध्ये सूर्यग्रहण पाहिल्याचे वर्णन आहे. जेव्हा श्रीराम आणि खर राक्षस यांचे युद्ध झाले त्यावेळी सूर्यग्रहण होते त्याचा उल्लेख खालील प्रमाणे :

श्यामं रुधिरपर्यन्तं बभूव परिवेषणम् ।

अलातचक्रप्रतिमं परिगृह्य दिवाकरम् ॥ ३ ॥

सूर्यमण्डलाच्या चारी बाजूस अलात चक्राप्रमाणे गोलाकार घेरा दिसून येऊ लागला, ज्याचा रंग काळा आणि कडेचा रंग लाल होता. ॥३॥

येथे अलात चक्र ह्याचा अर्थ fire ring. साहसी खेळांमध्ये ज्वालांनी वेढलेल्या गोलातून आरपार उड्या मारतात तो गोल होय. सूर्यबिंब काळे (झाकोळलेले ) आणि कडेचा रंग लाल होता म्हणजे हे निश्चित खग्रास सूर्यग्रहण किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण असावे

बभूव तिमिरं घोरं उद्धतं रोमहर्षणम् ।

दिशो वा प्रदिशो वापि न च व्यक्तं चकाशिरे ॥८॥

सर्वत्र अत्यंत भयंकर तसेच रोमांचकारी दाट अंधकार पसरला. दिशांचे अथवा कोनांचे स्पष्ट रूपाने भान होत नाहीसे झाले होते. ॥८॥

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी अंधःकार होतो हे आपल्याला माहिती आहेच. 


कबन्धः परिघाभासो दृश्यते भास्करान्तिके ॥११॥

जग्राह सूर्यं स्वर्भानुरपर्वणि महाग्रहः ।

प्रवाति मारुतः शीघ्रं निष्प्रभोऽभूद् दिवाकरः ॥१२ ॥

सूर्याच्या जवळ परिधा प्रमाणे कबंध (शिरकापलेले धड) दिसून येऊ लागले. महान ग्रह राहु अमावस्या नसतांनाच सूर्याला ग्रासू लागला. वारा तीव्र गतीने वाहू लागला तसेच सूर्यदेवाची प्रभा फिकी पडली. ॥११-१२॥

उत्पेतुश्च विना रात्रिं ताराः खद्योतसप्रभाः ।

संलीनमीनविहगा नलिन्यः शुष्कपङ्‌कजाः ॥१३॥

रात्र नसतांनाच काजव्यांप्रमाणे चमकणारे तारे आकाशात उदित झाले.  सरोवरात मासे आणि जलपक्षी विलीन होऊन गेले. त्यांतील कमळे सुकून गेली. ॥१३॥

तस्मिन् क्षणे बभूवुश्च विना पुष्पफलैर्द्रुमाः ।

उद्धूतश्च विना वातं रेणुर्जलधरारुणः ॥ १४ ॥

फुले आणि फळे गळून गेली. वारा नसतांनाही ढगांप्रमाणे धूसर रंगाची धूळ उंच जाऊन आकाशात पसरली गेली. ॥१४॥

प्रस्तुत सर्व श्लोकांमध्ये सूर्यग्रहणाचे वर्णन केले आहे असे स्पष्टपणे दिसून येते. सर्वांत पहिले सूर्यग्रहण पाहिल्याचे श्रेय Bruce Masse ह्याला ( नेहमीप्रमाणे परदेशी लोकांना श्रेय देण्यात आले आहे) देण्यात आहे आहे. 

Archaeologist Bruce Masse, who putative links an eclipse that occurred on May 10, 2807, BC

रामायणाचा काळ अंदाजे इ. स. पू. १२ हजार वर्षे - त्रेतायुगातील आहे म्हणजे सर्वांत पहिले सूर्यग्रहण पाहिल्याचे श्रेय रामायणाकार महर्षी वाल्मिकी किंवा प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांना द्यावयास हवे. सूर्यग्रहणे झाल्याचा उल्लेख वेदांमध्ये सुद्धा आहे. परंतु, रामायणात त्याचे अधिक विस्तृत वर्णन दिले आहे.

रामायणातील प्रवचनांमध्ये फक्त रामकथा सांगितली जाते. त्यातील विज्ञान सांगितले जात नाही त्यामुळे रामायणातील वैज्ञानिक संदर्भ प्रकाशात येत नाहीत ही आपली शोकांतिका आहे.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...