माझा परिचय

Thursday 22 December 2022

वेदविज्ञानरंजन - १८ : ध्वनीशास्त्र भाग - २

 वेदविज्ञानरंजन- १८ - ध्वनीशास्त्र भाग - २

आपण  ध्वनीशास्त्र अभ्यासत आहोत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्यांचा अजून विस्तृत अभ्यास करू.

पंडित शारंगदेव (देवगिरी राजाच्या दरबारात ते राजगायक होते ) यांनी साधारण इ. स. १३ व्या शतकात संगीत रत्नाकर हा ग्रंथ लिहिला होता. त्यात नादोत्पत्तिक्रमः अध्यायात ते म्हणतात :

आत्मा विवक्षमाणोयं मनः प्रेरयते |
मनः नाभिस्थं वह्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम् |
ब्रह्मग्रंथीस्थितो नादः क्रमादूर्ध्वपथे चरन् |
नाभिहृत्कण्ठमूर्धास्येष्वाविर्भवति स ध्वनिः |


ह्याचे विवेचन पाहू :

आत्मा विवक्षमाणोयं मनः प्रेरयते म्हणजे आत्मा (inner person ) आपल्या मनाला प्रेरणा देतो, उद्युक्त करतो. कशासाठी? तर ध्वनी निर्मितीसाठी.

मनः नाभिस्थं वह्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम्

आणि हे मन काय करते? तर आपल्या नाभीजवळ असलेल्या अग्नीला उत्तेजित करते आणि आणि आल्या शरीरातील वायूला (श्वासोच्छ्वास ) प्रेरणा देते. आपण प्राधान्याने उच्छ्वास सोडताना बोलतो  तुम्ही प्रयोग करून पहा श्वास घेताना बोलणे कठीण असते. उच्छ्वास सोडताना बोलणे सोपे होते.

ब्रह्मग्रंथीस्थितो नादः क्रमादूर्ध्वपथे चरन्

आपल्या शरीरातील अवयवांद्वारे अग्नी आणि वायू यांचा संयोग झालेला नाद उर्ध्व दिशेने येतो आणि स्वरयंत्राशी संयोग पावतो.

नाभिहृत्कण्ठमूर्धास्येष्वाविर्भवति स ध्वनिः

अशाप्रकारे नाभी, हृदय, कण्ठ, मुख यांद्वारे ध्वनीची निर्मिती होते. म्हणजेच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्या चार पायऱ्यांतून ध्वनी उत्पन्न होतो.

आता आपण ह्याच वाणीच्या चार प्रकारांचा उलट्या क्रमाने अभ्यास करू म्हणजेच वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा

वैखरी शब्दनिष्पत्तिः मध्यमा स्मृतिगोचरा
द्योतिकार्थस्य पश्यंती  सूक्ष्मा ब्रह्मैव केवलम्


वैखरी ही शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होते. पण हे शब्द जे मध्यमा वाणीतून येतात त्यांचे उत्पत्तीस्थान काय? तर आपली शब्दसंपदा (Vocabulary) आपली भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द हवे ते आपल्या मेंदूतून, स्मृतीतून येतात म्हणून मध्यमा स्मृतिगोचरा असे म्हटले आहे. आणि कुठले शब्द योजून वाक्य बोलायचे ह्यासाठी योग्य विचार आवश्यक असतो तो विचार म्हणजे द्योतिकार्थस्य पश्यंती. त्यानंतर येणारी परा वाणी जी अत्यंत सूक्ष्म रुपात आपल्या नाभीतून उत्पन्न होते.  थोडक्यात सांगायचे तर शब्द बोलताना शरीरशास्त्र (Biology ) आणि मानसशास्त्र (Psychology) यांचा मेळ जमावयास हवा. तर योग्य प्रकारे आपण बोलू शकतो.

समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या दासबोध ह्या ग्रंथात ह्याच वाणीचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे.


नाभीपासून उन्मेषवृत्ती |
तेचि परा जाणिजे श्रोती |
ध्वनीरूप पश्यंती हृदयी वसे ||
नाभिस्थानी परावाचा |
तोचि ठाव अंतःकरणाचा |
अंतःकरणपंचकाचा |
निवाडा ऐसा ||


नाभिस्थानी मणिपूर चक्र आहे. तेथे परावाणी प्रगट होते.  हृदयात अनाहत चक्रामध्ये पश्यंती वाणी प्रगट होते. कंठात विशुद्ध चक्रात मध्यमा वाणी प्रगट होते. शेवटी मुखातून वैखरी वाणी प्रगट होते.

पहा किती सुंदर आणि शास्त्रीय पद्धतीने आपल्या पुरातन वाङ्मयात ध्वनीच्या उत्पत्तीचे वर्णन केले आहे. कुठल्याही परदेशी वैज्ञानिकांनी अश्या प्रकारचे विवेचन ७००-८०० वर्षांपूर्वी केलेली नाही असे मी आवर्जून नमूद करतो.

🚩 जयतु वेदविज्ञानम् 🚩

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...