माझा परिचय

Thursday 22 December 2022

वेदविज्ञानरंजन - १९ : ध्वनीशास्त्र भाग - ३

 वेदविज्ञानरंजन - १९ : ध्वनीशास्त्र भाग - ३

समर्थ रामदास स्वामी दासबोध १२-२५-८ मध्ये वाणीच्या प्रकाराचे वर्णन करताना म्हणतात -

उन्मेष परा ध्वनि पश्यन्ती | नाद मध्यमा शब्द* *चौथी | वैखरीपासून उमटती नाना शब्दरत्ने ||

परा वाणी हे सर्वांत सूक्ष्म असे ॐ काराचे स्फुरण आहे. ते वायुरूप आहे. मणिपूर चक्र हे परावाणीचे उगमस्थान आहे आणि उदान वायू हा त्याच परावाणीचा कारक आहे. उदान वायू हा उर्ध्वदिशेने जाणारा वायू असून त्यापासून अतिसूक्ष्म अशी परावाणी उत्पन्न होते. जेव्हढे सूक्ष्म तेव्हढा त्याचा परिणाम अधिक असतो. हे आपल्याला अणुऊर्जा अभ्यासल्यावर लक्षात येते. ही अतिसूक्ष्म परावाणी सर्वोच्च घोषात परावर्तित होते त्यालाच आपण बेंबीच्या देठापासून ओरडणे असे म्हणतो. बेंबी म्हणजे नाभी जे परावाणीचे उगमस्थान आहे.

आपण वैखरीने जितके बोलतो त्यापेक्षा कितीतरी जास्त संभाषण आतल्या आत करीत असतो आणि त्याची आपल्याला जाणीवही नसते. समर्थ रामदास स्वामी सांगतात -

पुढे वैखरी राम आधी वदावा

म्हणजे काय? तर वैखरीतून बोलण्याआधी राम शब्दांचा उगम तीन वाणींमधून होतो त्यालाच अजपा असेही म्हणतात. अजपाजप हा शास्त्रातील एक प्रकार आहे. परावाणीद्वारे आपला आत्माच जप करू लागतो म्हणजेच जप करण्याचा विचार मनांत येण्याआधीच जप सुरु होतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की

नमूं शारदा मूळ चत्वार वाचा |

तसेच अथर्वशीर्षात म्हटले आहे की -

त्वं चत्वारि वाक्पदानि

म्हणजे चारही वाणीचे मूळ तूच (गणपती )आहेस.

श्रीदेवीच्या आरतीत संत नरहरी महाराज म्हणतात - 

चारी श्रमले परंतु न बोलवे काही

ह्यातील चारी श्रमले म्हणजे देवीची स्तुती करून चारही वेद दमले, श्रमले त्याचप्रमाणे परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी ह्या चारही वाणी निःशब्द झाल्या आहेत इतका देवीचा महिमा अगाध आहे. 

सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा महाविस्फोट झाला (Big Bang Theory - नासदीय सूक्त ) त्यावेळी *ॐकारनाद उत्पन्न झाला. मांडूक्य उपनिषदात ॐकारनादाचे वर्णन केले आहे.

ओमित्येतदक्षरमिदं सर्वम् । तस्योपव्याख्यानं* *भूतं भवद् भविष्यदिति ॥

सर्वमोङ्कार एव । यच्चान्यत् त्रिकालातीतं* *तदप्योङ्कार एव ॥ १ ॥

भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेत  ८ व्या अध्यायात १३ व्या श्लोकात सांगितले आहे की 

ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्।

यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ||

जो माझे नित्य ध्यान करतो आणि मृत्यूसमयी ॐ कार उच्चारण करतो तो *उत्तम गतीला प्राप्त* होतो म्हणजेच त्याला उत्तम गती मिळते. 

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 

अ- कार चरणयुगल। उ-कार उदर विशाल।

म-कार महामंडल। मस्तका-कारे॥११॥

हे तिन्ही एकवटले। तेच शब्दव्रह्म कवत्तल।

ते मियां गुरुकृपा नमिले। आदि बीज ॥२०॥

जसे सूर्य किरणांपासून सात रंग तयार होतात तसेच ॐकारनादातून सात स्वर तयार होतात. हाच ॐकारनाद आपल्या नाभीतून म्हणजेच परावाणीतून प्रगट होतो. नाद हा चैतन्यस्वरुप आहे

चैतन्यं सर्वभूतानां विवृतं जग्दात्मना 

नादो ब्रह्म तदानंदंमन्दिली यमुपास्म्हे ।।

नादोपास्नयादेवा ब्रह्मा विष्णु महेश्वरा:

भवन्त्युपासितानूनं यस्मादेते तादात्मका: ।।

नादब्रह्म हे सर्व प्राणिमात्रांमध्ये चैतन्यस्वरुपात वास करते. ते अतिशय आनंदमय असून ह्याच्या उपासनेने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची उपासना केल्याचे फळ मिळते. 

संपूर्ण विश्वात नाद, कंपने भरुन राहिली आहेत. 

संगीतरत्नाकर ग्रंथात नादाची महती सांगितलेली आहे. 

न नादेन विना गीतं न नादेन विना स्वरः |

न नादेन विना नृत्यं तस्मान्नादात्मकं जगत् ||

नादाशिवाय गीत नाही, स्वर नाही, नादाशिवाय नृत्यसुद्धा नाही. संपूर्ण जगात नाद व्यापून राहिला आहे. 

पाणिनीयशिक्षा* ह्या ग्रंथात खालील श्लोक वाचावयास मिळतो. 

आत्मा बुद्ध्या समेत्यर्थान् मनो युङ्क्ते विवक्षया ।

मनः कायाग्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम् ॥

मारुतस्तूरसि चरन् मन्द्र्ं जनयति स्वरम् ॥

अष्टौ स्थानानि वर्णानामुरः कण्ठः शिरस्तथा ।

जिह्वामूलं च दन्ताश्च नासिकौष्टौ च तालु च ॥


आता ह्याचा अर्थ पाहू :

आपल्या शरीरातील आत्मा बुद्धीचा उपयोग करून अर्थाची संगती लावतो आणि आपल्या मनाला बोलण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यानंतर जठरामधील अग्नी म्हणजे मणिपूर चक्र असलेला भाग वायूला म्हणजे उदान वायूला प्रेरणा देतो. हा वायू अनाहत चक्र आणि विशुद्ध चक्र असलेल्या भागात म्हणजे हृदय, कंठ ह्या भागात पसरतो आणि मंद स्वर उत्पन्न करतो. 

उच्चारांची स्थाने आठ आहेत. ती खालीलप्रमाणे :

१. उरः, २. कण्ठः, ३. शिरः (मूर्धा), ४. जिह्वामूलम्, ५. दन्ता, ६. नासिका, ७. ओष्ठौ, ८. तालुः

ध्वनीलहरींच्या ठिकाणी सृजनशक्ती असते. ह्या ध्वनीलहरींचा योग्य तो उपयोग मंत्रशास्त्रात करण्यात येतो. विशिष्ट मंत्र विशिष्ट आघात करून म्हटले असता त्याचे योग्य ते परिणाम दिसून येतात. आपल्या संस्कृतीत मौखिक परंपरा आहे. गुरू कडून शिष्याला सर्व ज्ञान मौखिक परंपरेने देण्यात येत असे. त्यामुळे बारकाव्यासहित सर्व गोष्टी समजण्यास मदत होई. गुरूने शिकवलेले प्रत्येक वाक्य अन् वाक्य लिहून ठेवणे शक्य नसे त्यामुळे मौखिक परंपरा अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या जुन्या शिक्षण पद्धतीत सुद्धा पाठांतराला खूप महत्व होते. विद्यार्थ्यांनी सुरुवातीला काही प्रमाणात घोकंपट्टी - पाठांतर करणे आवश्यक आहे. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण बोलू शकतो, ध्वनीमुद्रण ऐकू शकतो. 

आपल्या संस्कृतीत गुरु जेव्हा शिष्याला ज्ञान देत असत तेव्हा सर्व पुस्तके, ग्रंथ वाचण्यास सांगत नसत. संक्षिप्त स्वरुपात मंत्र तयार करून त्यांची संथा देत जेणेकरून शिष्याच्या मेंदूतील ज्ञान - आकलनक्षमतेची वृद्धी होत असे. एखाद्या ठिकाणी दडलेल्या खजिन्याची चावी मिळाली तर हव्या त्या वस्तू घेता येतात त्याप्रमाणेच *मंत्रशक्तीने कार्य साधत* असे. ह्या सर्वाचा परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी ह्या वाणींशी संबंध आहे.


 🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩


प्रस्तुत *लेख तुमच्या सर्व ग्रुप्स वर पाठवावा* ही नम्र विनंती. 

ज्यांना ही *लेखमालिका*  हवी असेल त्यांनी माझ्याशी ( *श्री. वैभव दातार*  ) पुढील what's app number वर संपर्क साधावा *8898482382* 

संकलन आणि लेखन : श्री. वैभव दातार, कल्याण

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...