माझा परिचय

Sunday 25 December 2022

वेदविज्ञानरंजन - ३३ : रामायणातील वैज्ञानिक संदर्भ - भाग - १

 वेदविज्ञानरंजन - ३३ : भाग - १

रामायणातील वैज्ञानिक संदर्भ - भाग - १

आज आपण सूर्याच्या पृष्ठभागावरील सौरडाग (सौरकलंक ) (Sunspot) आणि सौरज्वाला (Solar flares ) ह्याबद्दल पुरातन वैदिक ग्रंथांतील माहिती घेऊ. 

आधी सौरडाग कसे तयार होतात हे पाहू :

सूर्याच्या पृष्ठभागावरील काही विवक्षित ठिकाणी होणाऱ्या चुंबकीय घडामोडींमुळे त्या ठिकाणच्या तापमानात घट होते. अशा ठिकाणाचे तापमान आजूबाजूच्या भागापेक्षा कमी झाल्यामुळे तो भाग आपल्याला डागांच्या रूपात काळ्या रंगाचा दिसतो.

आता ह्या सौरडागांचे निरीक्षण सर्वप्रथम प्रभूश्रीरामचंद्रांनी केले आणि त्याचा स्पष्ट उल्लेख रामायणात महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी केला आहे. रामायण युद्धकांड सर्ग ४१, श्लोक १८ मध्ये ह्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.


ह्रस्वो रूक्षोऽप्रशस्तश्च परिवेषः सुलोहितः

आदित्यमण्डले नीलं लक्ष्म लक्ष्मण दृश्यते ||१८||

ह्याचा अर्थ पाहू :

हे लक्ष्मणा! सूर्यमंडलात (आदित्यमण्डले ) लहान (ऱ्हस्वः ), रूक्ष (रूक्ष ), अमंगलकारी (अप्रशस्तः ) आणि अत्यंत लाल वर्तुळ (परिवेषः सुलोहितः) दिसून येत आहे. त्याचबरोबर तेथे काळे (नीलम् ) डाग म्हणजे चिह्न (लक्ष्म ) दृष्टिगोचर आहे.

सौरज्वाला :

रक्तचंदन्दनसंकाशा संध्या परमदारुणा ।

ज्वलच्च निपतत्येतदाद् आदित्यादग्निमण्डलम् ॥

अत्यंत दारूण संध्या रक्तचंदनाप्रमाणे लाल दिसून येत आहे. सूर्यापासून हा जळत्या आगीचा पुंज खाली कोसळत आहे. येथे सौरज्वालेचा स्पष्ट उल्लेख आहे. 

रावणाशी युद्ध करण्याच्या आधी काही अशुभ सूचक संकेत श्रीराम देत आहेत. त्यामुळे राक्षसकुळाचा नाश होणार हे निश्चित आहे. ह्यात श्रीरामांनी सौरडाग म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावरील काळे डाग पाहिले असा स्पष्ट उल्लेख आहे. येथे नीलम् असा शब्द जरी असला तरी त्याचा एक अर्थ निळा आणि दुसरा अर्थ सावळा, काळा असाही आहे. आपल्याला जर मार लागला तर अंगावर काळेनिळे डाग पडून ते प्रचंड दुखतात. त्यामुळे येथे नीलम् ह्याचा अर्थ निळा नसून काळा असाच आहे आणि तसेच स्पष्टपणे महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले आहे.  आता जे महाभाग रामायण ही कविकल्पना आहे, राम जन्मलाच नव्हता अशी पोरकट विधाने करता त्यांना किती समजवणार? 

सौरडाग नुसत्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही.  मुळात सूर्याकडेच नुसत्या डोळ्यांनी पाहणे शक्य नाही (उगवत्या - मावळत्या सूर्याकडे पाहता येते. पण त्यावेळी डाग दिसू शकत नाहीत ) श्रीराम हा साक्षात श्रीविष्णूंचा अवतार असल्याने तेही अनंतकोटी ब्रह्मांडनायक आहेत त्यामुळे हे सौरडाग त्यांना सहज दिसले असणार. आता त्यांना सामान्य माणूस मानले तर त्याकाळी निश्चित प्रगत दुर्बिणी (telescope ) असणार ज्यायोगे त्यांनी सौरडागांचे अवलोकन केले असेल.दुर्बीण कशी तयार करावी ह्याचे वर्णन भृगुशिल्पसंहितेत दिले आहे. ह्याबाबत माझ्या आधीच्या लेखात सर्व माहिती दिलेली आहेच. रामायण ही कविकल्पना नाही तर घडून गेलेला इतिहास आहे. त्याचे पुरावे निश्चित आहेत.महर्षी वाल्मिकी अत्यंत ज्ञानी होते त्यामुळे सर्व बारीकसारीक घडामोडी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. रामायण अभ्यासकांनी रामायणातील वैज्ञानिक आणि खगोलीय घटनांकडेसुद्धा लक्ष देऊन शास्त्रीय दृष्टीने त्यांचा अभ्यास करावा असे माझे मत आहे. 

ह्याचा अजून एक उल्लेख ऋग्वेदात सापडतो. 

ऋग्वेद मंडल १, सूक्त १६४, मंत्र १४

सूर्यस्य चक्षु रजसैत्यावृतम् |

सूर्याचे डोळे (सौरडाग ) धुळीने व्यापलेले  (आवृत्त असतात ) येथे सौरवादळ किंवा सूर्यावरील हेलियम वायू यासंबंधी उल्लेख असावा असे वाटते. 

नेहमीप्रमाणे सौरडाग अवलोकन करण्याचे श्रेय आपण परदेशी वैज्ञानिकांना दिले. सौरडाग पाहिल्याची नोंद (I Ching ) ह्या चिनी शास्त्रज्ञाने साधारण इ. स. पू. ३६४ मध्ये केली आहे.  परंतु, त्याच्या हजारो वर्षे आधीच त्रेतायुगात प्रभू श्री रामचंद्र यांनी सौरडाग पाहिल्याचे उल्लेख असून सुद्धा त्याचे श्रेय श्रीरामांना, रामायणाला नाही. माझी सर्वांना विनंती आहे की महर्षी वाल्मिकी ह्यांनी लिहिलेले रामायण मुळातून वाचावे आणि शास्त्रीयदृष्ट्या त्याचा अर्थ समजून घ्यावा.रामायण, महाभारत, श्रीमद्भागवत, श्रीमद्भगवद्गीता हे ग्रंथ फक्त देवाची स्तुती करण्यासाठी लिहिलेले नसून त्यात शास्त्रीय ज्ञान आणि वैज्ञानिक सिद्धांत आहेत हेसुद्धा लक्षात घ्यावे.

🚩जयतु वेदविज्ञानम् 🚩

No comments:

Post a Comment

वेदविज्ञानरंजन - ७९

  #वेदविज्ञानरंजन_७९ *प्राचीन भारतातील यंत्रविज्ञान भाग - ३* समरांगण सूत्रधार हा ग्रंथ भोजराजा यांनी लिहिलेला आहे. त्यात विविध यंत्रांची थ...